अंतिम परिस्थिती-२
राष्ट्रवाद विरुध्द साम्राज्यवाद
मध्यम वर्गाची अगतिकता : गांधीजींचे आगमन
पहिले जागतिक युध्द आले. राजकारण ओहटले होते. कारण राष्ट्रसभेचे नेमस्त आणि जहाल असे दोन तुकडे झाले होते. तसेच युध्दकालीन नाना बंधनांमुळे, कायदेकानूंमुळेही सारे गाडे रेंगाळत चालले होते. परंतु एक प्रवृत्ती विशेषेकरुन दिसून येत होती. मुसलमानांतील वाढता मध्यमवर्ग अधिकाधिक राष्ट्रीय वृत्तीचा बनून मुस्लिम लीगला राष्ट्रसभेकडे ढकलीत होता. राष्ट्रसभा आणि मुस्लिम लीग यांनी हातात हातही घेतले.
युध्दकाळात उद्योगधंदे भरभराटले. बंगालमधील तागाच्या गिरण्यांतून आणि मुंबई, अहमदाबाद वगैरे ठिकाणच्या कापसाच्या गिरण्यांतून शेकडा शंभर, दोनशे अशा प्रकारे नफा वाटण्यात आला. यातील काही फायदा डंडी आणि लंडन येथील परकी भांडवलदारांच्या खिशात गेला, काही हिंदी लक्षाधीशांच्या; परंतु ज्या कामगारांच्या घामातून हे भरमसाट नफे होत होते त्यांची दुर्दशाच होती. त्यांचे जीवन कल्पनातीत कष्टाचे होते. त्यांच्या राहणीचे मान अपरंपार कमी. गलिच्छ, रोगट अशा खुराड्यातून ते राहात होते. प्रकाशासाठी खिडकी नाही, धूर जायला चिमणी नाही; उजेड नाही, पाणी नाही; आरोग्याची काही व्यवस्था नाही. ब्रिटिश भांडवलाचे जेथे प्रभुत्व त्या कलकत्त्याजवळ ही स्थिती. आणि कलकत्ता म्हणजे प्रासादांची, राजवाड्यांची नगरी असे म्हणण्यात येत असते. मुंबई हिंदी भांडवलाचा अधिक पसारा. तेथे तरी काय स्थिती होती ? चौकशी समितीला १५ × १२ च्या खोलीत सहा कुटुंबे आढळली; मोठी-छोटी मिळून ३० माणसे त्या एका खोलीत राहात. त्यातील तीन बायका लौकरच बाळंत व्हायच्या होत्या. त्या एकाच खोलीत प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र चूल होती. केवळ अपवादात्मकच ही उदाहरणे असतील असे नाही. विसाव्या शतकाच्या दुसर्या तिसर्या शतकातील थोड्याफार सुधारणा ज्या काळात झाल्या त्या काळातील ही स्थिती. मग त्या सुधारणा होण्यापूर्वी काय स्थिती असेल त्याची कल्पनाही करता येणार नाही. अंगावर शहारेच येतील.*
-----------------------------
* बी. शिवराव यांच्या ''दी इंडियन वर्कर इन् इंडिया'' (अॅलन अॅण्ड अन्विन, लंडन १९३९) या पुस्तकातून ही माहिती आणि आकडे घेतले आहेत. हिंदी मजूर आणि कामगारांच्या स्थितीचे आणि प्रश्नांचे यात वर्णन आहे.
अशा काही वस्तीतून मीही हिंडलो आहे. उद्योगधंद्यातील कामगारांच्या या खोल्यांतून गेलो आहे. मला तेथे हवाही मिळेना. मी थक्क होऊन त्या खोल्यांतून बाहेर आलो. मी स्तंभित झालो, अवाक् झालो. मला संताप आला. काय ही दुर्दशा असे वाटले. झारिया येथील कोळशाच्या खाणीतही मी एकदा खाली गेलो होतो. येथील कामगार बायका कोणत्या परिस्थितीत कामे करीत होत्या ते मी पाहायला गेलो होतो. मला सारे आठवते आहे. ते चित्र मी कधीही विसरणार नाही. मानवी प्राण्यांनी अशा तर्हेने काम करावे याचा जबर आघात माझ्यावर झाला. पुढे खाली खाणीत काम करणे बायकांना बंद करण्यात आले. पुन्हा आज युध्दात अधिक उत्पादन हवे म्हणून त्यांना खाली काम करण्यास धाडण्यात येऊ लागले आहे. परंतु पुरुषांची वाण का आहे ? लाखो, कोट्यवधी लोक बेकार आहेत, अर्धपोटी आहेत. परंतु मजुरी इतकी कमी देण्यात येते, तसेच ज्या परिस्थितीत तेथे काम करावे लागते ती परिस्थिती इतकी भेसूर आहे की पुरुषवर्ग फारसा तिकडे येत नाही.
ब्रिटिश ट्रेड युनियन काँग्रेसने पाठविलेले एक शिष्टमंडळ १९२२ मध्ये हिंदुस्थानात आले होते. ते आपल्या अहवालात म्हणते, ''आसाममधील चहात दहा लाख हिंदी कामगारांची निराशा, घाम, उपासमार यांचे मिश्रण सालोसाल होत आहे.'' बंगालमधील सार्वजनिक आरोग्याचे अधिकारी १९२७-२८ च्या आपल्या अहवालात लिहितात, ''बंगाली शेतकरी इतके कमी अन्न खातात की तेवढ्यावर उंदीर-घुशीही पाच आठवड्यांहून अधिक जगू शकणार नाहीत.''