मध्य व पश्चिम आशियातील विख्यात शहरांप्रमाणे आपले गझनी शहरही सुंदर व प्रसिध्द व्हावे असे त्याला फार वाटे.  हिंदुस्थानातून त्याने कितीतरी कारागीर व शिल्पज्ञ गझनीला नेले.  सुंदर इमारतींकडे त्याचे लक्ष होते.  दिल्लीजवळील मथुरा शहर पाहून तो चकित झाला.  तो स्वत: लिहितो, ''इस्लामवरच्या मुसलमानांच्या श्रध्देप्रमाणे अभंग अशा हजारावर तरी इमारती येथे असतील.  कोट्यवधी दिनार असे सुंदर शहर निर्माण करताना खर्च झाले असतील.  असे दुसरे शहर वसवायचे मनात आणले तर त्याला दोनशे वर्षे लागतील.''

ज्या वेळेस स्वार्‍या, लढाया, नसत त्या वेळेस महमूद सांस्कृतिक उद्योगांना उत्तेजन देताना दिसे.  त्याने आपल्याभोवती कलावान व विद्वान गोळा केले होते.  शहानामा या प्रसिध्द महाकाव्याचा कर्ता कवी फिर्दोशी हा त्यांपैकी एक होता.  त्याचे व सुलतानाचे पुढे फिस्कटले.  अल्बेरुणी हाही समकालीन पंडित व प्रवासीही होता.  त्या वेळच्या मध्य आशियातील जीवनाचे चित्र त्याने आपल्या ग्रंथात दिले आहे.

अल्बेरुणी मूळचा पर्शियन; परंतु त्याचा जन्म खिवाजवळ झाला.  हिंदुस्थानात येऊन त्याने पुष्कळ प्रवास केला.  दक्षिणेकडील चोलांच्या राज्यातील मोठमोठ्या कालव्यांविषयी त्याने लिहिले आहे.  परंतु तो स्वत: त्या बाजूला गेला हाता की ऐकून लिहिले आहे ते नक्की    सांगता येत नाही.  काश्मीरमध्ये त्याने संस्कृतचा अभ्यास केला.  हिंदुस्थानातील धर्म, कला, तत्त्वज्ञान, विज्ञान यांचाही त्याने अभ्यास केला.  ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याआधी त्याने ग्रीक भाषेचाही अभ्यास केला होता.  त्याची पुस्तके माहितीची भांडारे आहेत, एवढेच नाही, तर लढाया, लुटालुटी, मारामार्‍या यांच्यापलीकडे विद्वान लोक शांतपणे, धिमेपणे कसे अभ्यास करीत होते, एका देशातील लोक दुसर्‍या देशातील लोकांना समजावून घेण्याचा कसा प्रयत्न करीत होते, परस्परांचे संबंध द्वेष-मत्सरांनी कटू झाले असताही हे काम कसे काही लोक करीत होते, तेही या पुस्तकावरून दिसून येते.  क्रोध आणि नाना वासना-भावना यांमुळे दुसर्‍याविषयीचे मत निर्मळपणे बनविणे त्या काळात कठीण होते.  उभयपक्षी चूक होई, कठोर मते बनविली जात.  जो तो स्वत:ला उच्च, श्रेष्ठ समजून, दुसर्‍याला कमी ठरवी.  अल्बेरुणी हिंदी लोकांविषयी म्हणतो, ''ते घमेंडखोर, व्यर्थ फुशारकी मारणारे, स्वयंतृप्त आणि भावनाहीन, मंद असे आहेत.  आमच्या देशासारखा दुसरा देश नाही, आमच्यासारखे दुसरे लोक नाहीत, आमच्यासारखे विज्ञान कोठे नाही, आमच्या राजांसारखे राजे कोठे नाहीत, असे आपल्या वर्तनाने ते दाखवीत असतात.''  भारतीय जनतेच्या स्वभावाचे बरेचसे बरोबर वर्णन आहे.

हिंदी इतिहासात महमुदाच्या स्वार्‍या ही एक महत्त्वाची घटना आहे.  जरी त्यामुळे देशाच्या मर्मस्थानाला धक्का लागला नाही, राजकीय दृष्ट्या अखिल देशावर जरी फारसा परिणाम झाला नसला तरीही या स्वार्‍यांना एक महत्त्व आहे.  उत्तर हिंदुस्थानची शक्ती किती क्षीण झाली होती, किती अवनती झाली होती हे त्यामुळे दिसून आले.  उत्तर व पश्चिम हिंदुस्थानात त्या वेळेस राजकीय दृष्ट्या किती विस्कळितपणा होता यावर अल्बेरुणीच्या हकीकतींनी चांगलाच प्रकाश पडतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel