धर्माचा व्यापक अर्थ घेतला तर धर्म अशा क्षेत्रात वावरतो की जेथे रूढ सत्ता नाही.  जेथे शास्त्राची विज्ञानाची गती नसते.  विज्ञानवेष्टित क्षेत्रापलीकडे धर्म वावरत असतो.  विज्ञानांकित प्रदेशाचे, ज्ञात प्रदेशाचे सीमावर्धन धर्म करीत असतो.  धर्म विज्ञानाला ज्ञात असलेल्या मर्यादांपलीकडे जातो.  परंतु विज्ञानपध्दती नि धर्मपध्दती या मात्र परस्परांपासून अगदी भिन्न आहेत.  ज्या प्रांतात ते काम करतात, ज्या गोष्टींमध्ये वावरतात, ज्या साधनांचा ते उपयोग करतात ती अगदी वेगळी.  आपल्या सभोवती अज्ञात असा अनंत प्रदेश उभा आहे ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे.  आणि विज्ञानाची प्रचंड आणि आश्चर्यकारक वाढ झाली असली तरी त्याला या अज्ञानाचे फारसे ज्ञान आहे असे म्हणता येणार नाही.  त्या बाजूने विज्ञान हळूहळू भीत भीत पावले टाकीत होते ही गोष्ट खरी.  परंतु सारे प्रायोगिक आहे.  शिवाय विज्ञानाची पध्दती म्हणजे प्रत्यक्ष पध्दती.  त्या प्रत्यक्ष जगाचा, जीवनाच्या रीतिगतींचा ते शास्त्र अभ्यास करते; अदृश्य सृष्टीतील कलात्मक अतींद्रिय आध्यात्मिक गोष्टींचा अभ्यास करायला या शास्त्राची पध्दती कितीशी उपयोगी पडणार ?  आपण पाहतो, अनुभवतो, भावतो ते दिक् व काल या सापेक्ष कल्पनेनुरूप पदोपदी बदलणारे असे जग म्हणजे संपूर्ण विश्व नव्हे.  अदृश्य असेही एक जगत आहे.  ते कदाचित अधिक स्थिर असेल किंवा या दृश्य जगाप्रमाणेच बदलणारे असेल.  त्या अदृश्य जगाला ह्या आपल्या लहान दृश्य जगाचा पदोपदी स्पर्श होत असतो.  कोणीही विचारी मनुष्य या अदृश्य जगाची उपेक्षा करू शकत नाही.

जीवनाचा हेतू काय याविषयी शास्त्र फारसे काही सांगू शकत नाही, काहीच सांगू शकत नाही म्हणाना.  विज्ञान स्वत:च्या मर्यादा वाढवीत आहे आणि लौकरच अदृश्य व अज्ञात जगावरही ते स्वारी करील असा संभव आहे.  व्यापक अर्थाने जीवनाचा हेतू समजून घ्यायला कदाचित विज्ञानशास्त्र आपणास पुढेमागे केव्हातरी साहाय्य करील.  मानवी जीवनाच्या प्रश्नावर प्रकाश पाडणार्‍या काही गोष्टींचे अंधुक दर्शन तरी ते शास्त्र आपणास घडवील.  विज्ञान व धर्म यांच्यात चाललेला तो सनातन वाद—त्याला निराळेच स्वरूप प्राप्त झाले आहे.  त्यामुळे भावनात्मक अनुभव, धार्मिक अनुभव यांना विज्ञानशास्त्राची पध्दती लावून बघण्यात येते.

धर्म शेवटी गुढवाद, अध्यात्म, तत्वज्ञान यांत जाऊन मिसळतो.  जगात असे काही मोठेमोठे गुढवादी लोक होऊन गेले की त्यांच्याकडे हटकून लक्ष जाते.  त्यांनी आत्मवंचना केली, ते वेडे होते असा शेरा मारून त्यांची वासलात आपणास लावता येणार नाही.  परंतु गुढवादाची मला चीड आहे.  हा गूढवाद म्हणजे सारा भोंगळपणा, सारा अस्पष्टपणा, सारे मऊ मऊ, गोडगोड.  सारा शरणागतीचा, दुबळेपणाचा प्रकार आहे.  विचारशक्तीला काटेकोरपणे श्रम देण्याऐवजी ती शक्ती, ती बुध्दीच टाकून देऊन, स्वत्व सोडून देऊन उचंबळलेल्या भावनांनिशी त्या समुद्रात मारलेली ही बुडी आहे.  सहजासहजी न समजणार्‍या काही गूढ मनोव्यापारांचे ज्ञान या अनुभवाने क्वचितप्रसंगी होत असेल, पण त्याप्रमाणे असाही संभव आहे की, त्या अनुभवात साधकाची दिशाभूल होऊन तो सर्व त्याचा भ्रम ठरेल.

अध्यात्म व तत्त्वज्ञान किंवा आध्यात्मिक तत्वज्ञान यांकडे मनाची अधिक ओढ असते ही गोष्ट खरी.  परंतु त्या शास्त्राचा अभ्यास करायला खूप खोल विचार करण्याची जरूरी असते.  तर्कशास्त्र नि बुध्दिवाद यांचा तेथे उपयोग केला पाहिजे.  परंतु तर्कबुध्दी चालविली तरी या अध्यात्म तत्त्वज्ञानात काही सिध्दान्त स्वयंसिध्द गृहीत धरून मग तर्क व बुध्दी चालवावी लागते.  मग असा संभव निर्माण होतो की हे सिध्दान्तच खरे नसले तर पुढचे काहीच निश्चित नाही.  सारेच विचारवंत पुरुष कमी अधिक प्रमाणात अध्यात्मात, तत्त्वज्ञानात मधून मधून शिरतात.  कारण तसे न करणे म्हणजे आपल्या या विश्वाच्या बर्‍याचशा भागांकडे दुर्लक्ष केल्याप्रमाणे होते.  काहींना इतरांपेक्षा या अध्यात्माची अधिक गोडी, अधिक आकर्षकता असते.  त्या त्या युगाप्रमाणे त्याच्यावर कमी अधिक जोर दिला जात असतो.  प्राचीन काळी युरोपात काय किंवा आशियात काय, दृश्य जगापेक्षा त्याच्या पलीकडील अदृश्य जगाला अधिक महत्व देण्यात येत असे.  त्यामुळे अध्यात्म व तत्त्वज्ञान इकडेच बुध्दी वळली.  अर्वाचीन मनुष्य बाह्य वस्तु-जगातच अधिक गुरफटलेला असतो.  तथापि तोही आणीबाणीच्या वेळेस, मानसिक अशान्ततेच्या क्षणी तत्त्वज्ञानाकडे वळतो व आध्यात्मिक चिंतनात रमतो.

आपणा सर्वांजवळ जीवनाचे तत्त्वज्ञान असते.  कोणाजवळ अस्पष्ट असते, कोणाजवळ अधिक स्पष्ट असते.  आपण ज्या काळात असतो, त्या काळातील जीवनाकडे पाहण्याची अशी जी दृष्टी असते.  तीच आपण, साधारणपणे विचार न करता घेत असतो.  तसेच ज्या धर्मात आपण वाढतो, त्या धर्मातील काही आध्यात्मिक कल्पना आपल्या जीवनात आलेल्या असतात.  अध्यात्माकडे माझा मुळीच ओढा नाही. अस्पष्ट, अंधुक अशा चिंतनात राहायला मला मुळीच आवडत नाही.  तरीही प्राचीनांच्या किंवा अर्वाचीनांच्या आध्यात्मिक नि तात्त्विक विचारांच्या पाठोपाठ कधी कधी जाण्यात माझ्या बुध्दीला एक प्रकारचा आनंद वाटतो, एक प्रकारची मोहिनी पडते.  परंतु तेथे मोकळेपणा मला कधीच वाटला नाही, आपल्या प्रांतात असल्याची जाणीव कधी झाली नाही.  त्या मोहिनीतून कसा तरी निघालो की मला सुटलो एकदाचा असे समाधान वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel