पहिले जागतिक युध्द शेवटी संपले; परंतु तहामुळे आम्हाला सुखशांतीचे, प्रगतीचे दिवस येण्याऐवजी जुलमी कायदे मिळू लागले; पंजाबात लष्करी कायदा सुरू झाला.  सार्‍या राष्ट्राला अपमान झाल्यासारखे वाटले, सर्वांनाच संताप आला.  घटनात्मक सुधारणांची आणि हिंदी लोकांस अधिक नोकर्‍या देण्याची कधीही न संपणारी भाषा म्हणजे आमची केवळ टवाळी होती.  एकीकडे सर्व राष्ट्राची खच्ची होत असता, अखंड चालणार्‍या पिळवणुकीमुळे दारिद्र्य अपरंपार वाढत असता, आमच्यातील सर्व प्राणमयता नष्ट होत असता सरकारची पोकळ तोंडपाटीलकी म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होते.  या राष्ट्राची केवळ उपेक्षा चालली होती.  सारे राष्ट्र एक प्रकारे अगतिक आणि निराधार झाले होते.

परंतु करायचे काय ? कशा रीतीने यातून मार्ग काढायचा ?  कोणा सर्वसामर्थ्यसंपन्न राक्षसाने आपल्या मगरमिठीत आम्हांला धरून ठेवले आहे असे वाटले.  आमचे अवयव जणू बधीर झाले होते; मने मृतवत झाली होती.  शेतकर्‍यांत अपार भय होते.  सरकारी अधिकार्‍यांची हांजी करण्याची गुलामी वृत्ती होती.  कारखान्यांतील कामगारांचीही तीच दशा.  या सर्वव्यापी अंधारात येऊन जाऊन मध्यमवर्ग, बुध्दिमान वर्ग काय तो प्रकाश दाखविणार, परंतु तेच या विराट निराशेत आणि खिन्नतेत बुडून नेले होते.  काही बाबतींत शेतकर्‍यांहूनही त्यांची स्थिती अधिक करुणास्पद होती.  हा सुशिक्षित वर्ग कोणतेही शारीरिक श्रमाचे काम करू शकत नव्हता.  जमिनीपासून ते तुटलेले होते.  त्यांना धंद्याचे ज्ञान नव्हते.  अगतिक अशा बेकारांच्या सैन्यात त्यांची भरती होऊ लागली.  ते अधिकाधिक निराशेच्या गर्तेत खोल जाऊ लागले.  मूठभर यशस्वी वकील किंवा डॉक्टर, इंजिनीअर किंवा कारकून, यामुळे जनतेच्या एकंदर स्थितीत फारसा फरक पडत नव्हता.  शेतकरीही अर्धपोटी होता.  परंतु शतकानुशतके असमान लढा तो लढवीत आला होता.  त्याच्यात सहनशक्ती होती.  दारिद्र्यात आणि उपासमारीतही तो एक प्रकारची शांती दाखवी, प्रतिष्ठा राखी; 'ठेविले अनन्ते तैसेचि राहावे' या वृत्तीने तो धीमा राही.  परंतु मध्यमवर्गाजवळ ही निष्ठाही नव्हती.  हा जो नवीन लघु पंतवृत्तीचा वर्ग निर्माण झाला होता, त्याला ती पार्श्वभूमी नव्हती.  अर्धवट वाढ झालेली आणि विफल मनोरथ असा हा वर्ग होता.  कोठे पाहावे ते त्यांना कळेना.  ना जुन्याची आशा ना नव्याची.  सामाजिक ध्येयांशी मिळतेजुळते घेता येईना; हालअपेष्टा जरी भोगाव्या लागल्या तरी काहीतरी केल्याचे समाधान मिळणेही मुष्किलीचे.  जुन्या रूढींचा त्यांच्यावर पगडा होता; परंतु जुनी संस्कृती त्यांच्याजवळ नव्हती.  अर्वाचीन विचार त्यांना आकर्षीत, परंतु त्या विचारांतील गाभा त्यांना कळत नसे.  अर्वाचीन विचारातील सामाजिक आणि शास्त्रीय दृष्टी त्यांच्याजवळ नसे.  आजची दुर्दशा विसरण्यासाठी काहीजण भूतकाळातील जड जरठ गोष्टींनाच चिकाटीने चिकटून राहायची खटपट करीत.  परंतु त्या मृतवत गोष्टी उराशी बाळगून कोठले समाधान मिळणार ?  रवीन्द्रनाथांनी म्हटले आहे, ''जे मेलेले आहे त्याला धरून ठेवण्यात अर्थ नाही.  कारण तेही मरणाकडे नेणारे असते.''  काहीजण पाश्चिमात्यांची निर्जीव नक्कल करू लागले.  ते गावठी साहेब झाले.  अशा रीतीने निराधार झालेले हे लोक मनाच्या आणि शरीराच्या सुरक्षिततेसाठी कोठे काही आधार मिळतो का म्हणून भरमसाट धडपड करीत होते.  परंतु आधार न मिळाल्यामुळे हिंदी संसाराच्या, हिंदही जीवनाच्या कृष्णसागरात ते इतस्तत: हेतुहीन तरंगत राहिले.

काय करणे शक्य होते ?  दारिद्र्याच्या चिखलातून देशाला वर कसे काढायचे ?  निर्जीव करणार्‍या पराभूत वृत्तीपासून राष्ट्राचा बचाव कसा करायचा ?  किती दिवस वाट पाहायची ?  थोडीथोडकी का वर्षे आम्ही हाल सहन करीत आलो, प्रक्षोभ सहन करीत आलो, दु:ख वेदना सहन करीत आलो ? पिढ्यानपिढ्या आमच्या राष्ट्राने रक्त, अश्रू, घाम, कष्ट यांचे जीवन चालविले आहे.  आणि सतत चालणार्‍या या शोषणाने हिंदी राष्ट्राचे शरीर आणि आत्मा यांतील त्राण जणू नाहीसे झाले आहे.  आमच्या सार्‍या राष्ट्रीय जीवनाचा भडका उडाला आहे.  सारे सामुदायिक नागरी जीवन विषग्रस्त झाले आहे.  रोगजंतू फुफुसात शिरावेत आणि सारे शरीर जर्जर व्हावे तद्वत आमची स्थिती झाली आहे.  कधीकधी वाटे की पटकी किंवा ग्रन्थिज्वर यांच्यासारख्या तडकाफडकी मरणाची पध्दती अधिक बरी.  काही सोक्षमोक्ष तरी लावून घेऊ.  हे भिजत घोंगडे किती दिवस ठेवायचे ?  परंतु तो क्षणिक विचार होता.  काहीतरी तात्पुरते भव्य दिवस करून प्रश्न सुटणार नव्हता.  आणि जुनाट रोग तात्पुरत्या मलमपट्टीने नष्टही होत नसतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel