ही जी दु:खदशा, तिचा अंत होणे म्हणजेच निर्वाण.  निर्वाणातील खरा अर्थ काय, याविषयी मतभोद आहेत, कारण अतींद्रिय स्थितीचे वर्णन करायला आपली वाणी अपुरी पडते व आपल्याला मर्यादित मनातील विचारांच्या संज्ञांत ती अतींद्रिय स्थिती मांडता येत नाही.  कोणी म्हणतात की, निर्वाण म्हणजे केवळ विझून जाणे, मालविणे; परंतु हा अर्थ स्वत: बुध्दाला मान्य नव्हता, असे सांगतात.  बुध्द तर म्हणत की, निर्वाण म्हणजे अत्यंत उत्कट अशी कृती.  निर्वाणात सर्वच विझून जात नाही.  जे जे असत् असते ते नष्ट होते, खोट्या भ्रामक वासना, नाना विकार यांची येथे राख होते; परंतु निर्वाण म्हणजे संपूर्ण विनाश नव्हे.  तथापि निर्वाणाची कल्पना नेतिनेति रीतीनेच द्यावी लागते. 

बुध्दाच्या मार्गाला '' मध्यम मार्ग '' असे म्हणतात.  अति सर्वत्र वर्जून केवळ सुखविलास किंवा केवळ आत्मक्लेश यांतील मधला मार्ग घ्या असे ते सांगतात.  उपवास करुन त्यांनी स्वत: शरीरशोषण अनुभवले होते म्हणून त्यांचे सांगणे हे की, जो स्वत:ची शक्ती गमावून बसला आहे, तो योग्य मार्गाने या इष्ट मार्गावर प्रगती करण्यास असमर्थ होतो.  हा बुध्दाचा मध्यम मार्ग म्हणजेच अष्टविध आर्यमार्ग होय.  सम्यक निष्ठा, सम्यक आकांक्षा, सम्यक उच्चार, सम्यक आचार, सम्यक जीवनवृत्ती, सम्यक प्रयत्न, सम्यक विचार, सम्यक आनंद (समाधी) असा हा अष्टविध मार्ग आहे.  त्यात कोणाच्या कृपेचा, अनुग्रहाचा प्रश्न नाही.  आपणच यत्नपूर्वक आत्मविकास, आत्मविकास, आत्मोन्नती करुन घ्यायची आहे.  या मार्गाने जाऊन मनुष्याने जर आपला योग्य विकास करून घेऊन, स्वत:ला जिंकून घेतले तर मग त्याला कोठेही पराभव नाही.  ''ज्याने स्वत:ला जिंकून घेतले आहे, त्याच्या विजयाचे पराजयात रूपांतर देवालाही करता येणार नाही.''

शिष्यांना जे समजेल व जे ते आचरणात आणू शकतील तेवढेच बुध्द यांना सांगत.  सर्व शंकांचे उत्तर देण्याच्या हेतूने किंवा विश्वाचे रहस्य उघडे करण्याच्या आकांक्षेने त्यांनी उपदेश केला नव्हता.  असे सांगतात की, एकदा हातात वाढलेली पाने घेऊन त्यांनी आपल्या आनंद नावाच्या प्रिय शिष्याला विचारले की, हातातल्या पानाहून वेगळी आणखी पाने जगात आहेत का ?  आनंद म्हणाला, ''शरद ॠतू आहे.  जिकडे तिकडे पाने गळून पडत आहेत.  त्यांची गणती होणार नाही.''  तेव्हा बुध्द म्हणाले, ''त्याप्रमाणेच मी तुम्हाला मूठभर सत्ये सांगितली.  त्याखेरीज अनंत, अगणित सत्यांच्या राशी पडल्या आहेत.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel