या शास्त्रात अशी समजूत आहे की योगमार्गाने जाता जाता आपण अशा काही स्थितीत जातो की, एक प्रकारची स्वयंस्फूर्ती अंतर्दृष्टी एकदम येते; आणि गूढवादी सांगतात तशा प्रकारची समाधी लागते.  मनाची ही एखादी उच्चतर दशा असून अतींद्रिय वस्तूंचे ज्ञान व्हायला तेथे दरवाजे उघडत असतील किंवा एक प्रकारची ती स्वत:ची वंचनाच असेल.  ते मला काही एक माहीत नाही.  योगामुळे मानसिक अवस्था वरच्या पातळीवर जाते की नाही ते निश्चित नसले तरी एवढे मात्र निश्चित की पुष्कळ वेळा आत्मवंचनाही होते.  आणि असंयमी, अनियंत्रित योगामुळे त्या त्या प्रयोग करणार्‍यांची मने विकृत झाल्याचीही उदाहरणे पुष्कळ आढळतात ही गोष्ट सुप्रसिध्द आहे.

परंतु ध्यानाची व चिंतनाची ही अंतिम अवस्था प्राप्त होण्यापूर्वी शरीराला व मनाला अनेक प्रकारचे यमनियम पाळावे लागतात.  शरीर निरोगी, सुक्षम, लवचिक, डौलदार दणकट, काटक असले पाहिजे.  त्यासाठी नाना आसने सांगितले आहेत व आपल्या इच्छेनुरूप श्वासोच्छ्वास करता यावा व नेहमी श्वास घेताना व सोडताना खूप वेळ भरपूर हवा घेता व सोडता येण्याची सवय व्हावी या हेतूने प्राणायामाचेही नाना प्रकार दिलेले आहेत.  या आसनांना आणि प्राणायामाच्या प्रकारांना व्यायाम हा शब्द लावता येणार नाही.  कारण ह्या आसन व प्राणायामात अवयवांची जोराने हालचाल करावी लागत नाही.  व्यायाम म्हणण्यापेक्षा या प्रकाराला शरीरावयवांची वेगवेगळ्या प्रकाराने मांडणी म्हणणेच बरोबर ठरेल.  ही आसने व प्राणायाम नीट केला तर थकवा न वाटता उलट सारे अंग मोकळे होऊन हुशारी वाटते.  शरीर सुदृढ राखण्याची ही यौगिक पध्दती मोठी नमुनेदार आहे.  कारण शरीर सुदृढ राखण्याच्या इतर पध्दतींत धावफळ, हिसके, उड्या असतात, त्यामुळे माणूस धापा टाकू लागून, गळून जातो व थकल्यासारखे वाटते.  हे प्रकारही भारतात होतेच.  कुस्ती, मलखांब, पोहणे, अश्वारोहण, भालाफेक, तिरंदाजी, करेला, मुद्गल, जुजुत्सुचेही काही प्रकार, तसेच नानाविध खेळ व करमणुकीचे नाना प्रकार हे सारे होते.  परंतु ही प्राचीन आसनपध्दती भारताच्या वृत्तीला शोभेशी आहे, भारतीय तत्त्वज्ञानातील दृष्टीला जुळती आहे; शरीराला व्यायाम होत असताना अगदी संथपणाने व तोल संभाळून होतो.  उत्साह वाया न दवडता वृत्ती थंड राहून ताकद व दम वाढतो आणि त्यामुळेच आसने कोणत्याही वयात केली तरी चालतात.  वृध्दांनाही त्यातील काही करता येण्यासारखी आहेत.

आसनांचे पुष्कळ प्रकार आहेत.  काही निवडक आसने कित्येक वर्षे मी करीत आलो आहे.  जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, संधी मिळते तेव्हा मी ती करतो.  शरीराला आणि मनाला प्रतिकूल अशा परिस्थितीत जेव्हा मला पुष्कळ वेळ राहावे लागते आहे तेव्हा या आसनांमुळे माझा पुष्कळ फायदा झाला आहे यात शंका नाही.  योगशास्त्रातील काही प्राणायामांचे प्रकार आणि काही आसने मी करीत असतो.  येवढाच माझ योगशास्त्राशी परिचय आहे.  या शास्त्रात नुसते शरीरापुरते व तेही अगदी जुजबी ज्ञान होण्यापुरतेच मला आतापावेतो जमले आहे, मानसिक काही जमत नाही.  मत पूर्वीसारखेच बंडखोर आहे, फार वेळा अगदी मोकाट सुटते.  शरीराने संयम पाळणे यात योग्य मानलेले आहे.  तेच खाणे पिणे व वर्ज्य मानलेले आहे ते टाळणे यात यमनियमांचा अंतर्भाव होतो; हा शरीरसंयम चालू असतानाच, ज्याला योगमार्गात नैतिक अभ्यास म्हणतात तोही केला पाहिजे.  या नैतिक अभ्यासातच अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य यांचे पालन येते.  अहिंसापालनात शारीरिक अहिंसेपेक्षा जास्त व्यापक अहिंसा म्हणजे द्वेषमत्सर टाळणे येते.

योगशास्त्राच्या विवेचनात असे म्हणतात की, या सर्व शारीरिक व मानसिक अभ्यासाने इंद्रियनिग्रह होतो; त्यानंतर धारणा, ध्यान सांगितली आहेत व त्यामुळे शेवटी चित्त एकाग्र झाले म्हणजे अनेक प्रकारची सहज स्फूर्ती होते असे मानले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel