देशाचे तुकडे पाडण्याची कसलीही योजना पुढे आली की ती विचारात घेणेसुध्दा मोठे दु:खदायक वाटे.  हिंदी जनतेच्या उत्साहाला ज्यामुळे भरती यावयाची त्या सार्‍या गहन भावना, ज्यावर त्यांची अपार श्रध्दा होती त्या सार्‍या कल्पना, ह्या वाटणीच्या विचाराच्या अगदी उलट होत्या.  हिंदुस्थानातील सारी राष्ट्रीय चळवळ, सारा देश एक राष्ट्र आहे या श्रध्देच्या आधारावर बसवलेली होतीच, पण ही श्रध्दा, ही भावना, हल्लीच्या राष्ट्रीय चळवळीपेक्षा कितीतरी मागच्या काळापासूनची व कितीतरी अधिक गहन होती.  तिचा उगम हिंदुस्थानच्या इतिहासाच्या फार प्राचीन काळात झालेला होता.  अर्वाचीन काळात घडलेल्या अनेक घटनांनी ह्या श्रध्देला, या भावनेला असा काही विलक्षण जोर आला होता की, असंख्य लोकांची एकराष्ट्रीयत्वावर धर्माप्रमाणे निष्ठा बसली होती, हिंदुस्थान देश साराच्या सारा मिळून एक राष्ट्र आहे या तत्त्वाबद्दल वाद काढणे किंवा त्या तत्त्वाला विरोध करणे अशक्य होते.  मुस्लिम लीगने तसा वाद काढला होता, पण तशी शंका खरोखर त्यांना मनापासून आहे असे फारसे कोणीच मानले नाही, आणि मुस्लिम लीगप्रमाणे या बाबतीत ज्यांचे मत नव्हते असेही मुसलमान होते, व त्यांची संख्या फार मोठी होती हे खास.  मुस्लिम लीगनेसुध्दा हा वाद सुरू केला तेव्हा आपल्या सिध्दान्ताला आधार म्हणून विशिष्ट प्रदेश आमचा आहे असे त्यांनी म्हटले नव्हते.  नुसते मोघमपणे काही प्रदेश आम्हाला तोडून मिळावा एवढीच त्यांची सूचना होती.  त्यांचा हा व्दिराष्ट्रवाद, धर्मभेदाप्रमाणे राष्ट्रे वेगवेगळी मानावी अशा जुनाट मध्ययुगीन विचारसरणीच्या आधारावर बसवलेला होता, आणि म्हणून, तेच तत्त्व पुढे चालवून मुस्लिम लीगचे म्हणणे असे होते की, हिंदुस्थानातल्या प्रत्येक गावात दोन किंवा दोनाहून अधिक राष्ट्रे आहेत.  धर्मभेद देशभर सर्वत्र पसरलेले होते, एकेका गावात अनेक धर्मांचे लोक राहात होते, तेव्हा देशाची फाळणी करूनही ही धर्मभेदाची अडचण नाहीशी होण्यासारखी नव्हती.  खरोखर पाहिले तर वाटणीमुळे ही अडचण वाढणारच होती, भानगडीवर उपाय म्हणून या काढलेल्या या वाटणीच्या योजनेने भानगडीत भर मात्र पडणार होती.

नुसत्या भावनेची बाब सोडून दिली तरी देशाची फाळणी करण्याविरुध्द इतरही सबळ कारणे होतीच.  विशेषत: ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळे देशातील आर्थिक व सामाजिक अडचणी अशा काही निकरावर आलेल्या होत्या की, त्यामुळे होणारा देशाचा सत्यानाश टाळावयाचा झाला तर देशाची सर्वांगीण प्रगती त्वरेने घडवून आणणे प्राप्त झाले होते.  सबंध देश एक आहे असे धरून जर काही व्यवहार्य व परिणामकारक योजना आखण्यात आली तरच अशी प्रगती होणे शक्य होते, कारण देशातील वेगवेगळे भाग कोठे काही कमी असेल ते एकमेकांना पुरवीत होते.  हिंदुस्थान देश सारा एक धरला तर तो सबळ व स्वयंपूर्ण होता, पण त्यातले वेगवेगळे प्रादेशिक भाग पाहिले तर ते वेगळे पाडले म्हणजे ते दुबळे व परावलंबी व्हावयाचे.  सारा हिंदुस्थान मिळून एकच राष्ट्र आहे असे धरावयाला ही व इतर अनेक सबळ व पुरेशी कारणे आजपर्यंत पाहिले तर होतीच, पण अर्वाचीन जगात ज्या राजकीय व आर्थिक घटना घडत होत्या त्या विचारात घेतल्या म्हणजे या सार्‍या कारणांना दुप्पट महत्त्व आले होते.  आधुनिक जगात जिकडे पाहावे तिकडे लहान लहान राष्ट्रे स्वतंत्र घटक म्हणून अस्तित्वात न राहता मोठ्या राष्ट्रात विलीन होण्याची किंवा आर्थिक दृष्ट्या मोठ्या राष्ट्रांचे मांडलिक होण्याची क्रिया मोठ्या झपाट्याने चालली होती.  विशाल राष्ट्रसंघ, अनेक राष्ट्रांनी आपले कार्य सामुदायिक पध्दतीने चालविल्यामुळे त्यांचे बनलेले राष्ट्र-समूह, असले प्रकार अस्तित्वात आणण्याकडे जगाची प्रवृत्ती अनिवार होत चालली होती.  प्रत्येक राष्ट्राची त्या राष्ट्रपुरती एक स्वतंत्र शासनसंस्था असावयाची ही कल्पना हळूहळू जात चाली होती व त्याऐवजी अनेक राष्ट्रांची मिळून एक शासनसंस्था असावी अशी कल्पना येत होती आणि दूरवरच्या भविष्यकाळात कधीतरी पृथ्वीच्या पाठीवरच्या सार्‍या राष्ट्रांचा मिळून एक राष्ट्रसंघ होईल असा दृष्टान्त जगाला होऊ लागला होता. जगाची मजल या पायरीपर्यंत पोचली असताना हिंदुस्थानची फाळणी करून एका राष्ट्राची दोन राष्ट्रे करण्याचा विचार, जगाचा सारा इतिहास, सारे अर्थकारण आधुनिक काळात ज्या ओघाने चालले होते त्याच्या सर्वस्वी विरुध्द होता.  देशाची फाळणी करण्याची कल्पना भलतीच विचित्र व वेडगळपणाची वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel