रविंद्रनाथ हे विवेकानंदांचेच समकालीन.  परंतु जरा पुढच्या पिढीचे होते.  एकोणिसाव्या शतकात बंगालमधील नानाविध सुधारणांच्या चळवळीत या ठाकूर (टागोर) घराण्याने महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.  उच्च आध्यात्मिक प्रवृत्तीची माणसे, उत्कृष्ट लेखक, कलावान या कुटुंबात निर्माण झाले.  परंतु रवींद्रनाथ हे त्या सर्वाचे मुकुटमणी होते आणि उत्तरोत्तर सर्वत्र हिंदुस्थानभर वाढता वाढता त्यांचा मान सर्वांत मोठा त्याबद्दल काही शंका उरली नाही.  दोन सबंध पिढ्यांइतके दीर्घायुष्य त्यांना लाभले, व जन्मभर त्यांचे नवेनवे उद्योग चाललेच होते. त्यांच्या ह्या दीर्घायुष्यामुळे ते आपल्याला समकालीन वाटतात.  ते राजकारणात पडण्याच्या वृत्तीचे नव्हते पण मनाने फार कोमल असल्यामुळे व आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा त्यांनी ध्यास घेतल्यामुळे नुसते आपल्या काव्यगीतांच्या कुंजात त्यांना बसून राहवेना.  जेव्हा जेव्हा एखादी घटना त्यांना असह्य होई, तेव्हा तेव्हा बाहेर येऊन ब्रिटिश सरकारला किंवा हिंदी जनतेला या घटनेमुळे काय संकट ओढवेल याची आपल्या ॠषितुल्य वाणीने जाणीव करून देत.  विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बंगालभर स्वदेशीची लाट उसळली.  त्या वेळेस व तसेच अमृतसरच्या कत्तलीच्या वेळेस त्यांनी आपली 'सर' ही पदवी परत केली.  तेव्हाही त्यांनी मोठा पुढाकार घेतला.  गाजावाजा न करता शांतिनिकेतन येथे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विधायक कार्य सुरू केले.  ते शांतिनिकेतन सांस्कृतिक जीवनाचे आज एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.  भारतीयांच्या व त्यातल्या त्यात नव्या नव्या पिढीच्या लोकांच्या मनावर त्यांची बसलेली छाप विलक्षण आहे.  त्यांनी केलेली वाङ्मयनिर्मिती बंगाली भाषेत केली, त्या भाषेलाच नव्हे, तर अंशत: सर्वच देशी भाषांना त्यांचे वळण लागले आहे.  पौर्वात्य व पाश्चात्य ध्येयांची एकवाक्यता करण्यात त्यांची सर आजवर कोणाला आलेली नाही.  या एकवाक्यतेमुळे भारतीय व्यक्ती म्हणून तेच ओळखले जातात.  त्यांची आंतरराष्ट्रीय सहकार्यावर श्रध्दा आहे.  भारताने इतर राष्ट्रला जो संदेश देण्यासारखा आहे तो त्यांनी त्या राष्ट्रापर्यंत पोचवून व त्या राष्ट्रकडून भारताने घेण्यासारखे संदेश स्वदेशात आणून त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य सतत चालविले आहे.  इतकी आंतरराष्ट्रीय विशाल दृष्टी असूनही त्यांची दृढ श्रध्दा मात्र भारतावरच अचल आहे व त्यांची बुध्दी उपनिषदांच्या तत्त्वज्ञानात पूर्ण रंगून गेली आहे.  त्यांच्या जीवनात असा उलटा क्रम झाला की वयाने ते जसजसे म्हातारे होत गेले, तसतशी त्यांची मन:प्रवृत्ती व मते जास्त क्रांतिप्रवण होत गेली.  व्यक्तिस्वातंत्र्याचे ते कट्टे पुरस्कर्ते होते.  पण रशियन क्रांतीचे, विशेषत: शिक्षण, संस्कृती, आरोग्य व समता याबाबत त्या क्रांतीने केलेल्या प्रसाराचे त्यांना मोठे कौतुक वाटू लागले होते.  राष्ट्रभक्तीने माणसाची निष्ठा एकांगी होत जाते व अशा राष्ट्रभक्तीचा अरेरावी साम्राज्यशाहीशी संघर्ष झाला म्हणजे त्यातून वैताग, अनेक मनोविकृती निर्माण होतातच.  रवींद्रनाथांची त्याचप्रमाणे गांधीजींचीही—परंतु निराळ्या पातळीवरून-मोठी देशसेवा ही की त्यांनी त्याच त्या विचारांच्या चिंचाळ्या चाकोरीतून लोकांना थोडेफार बाहेर खेचून अखिल मानवजातीला व्यापणार्‍या विशाल प्रश्नांकडे वळविले.  मानवतेचे भारतातील सर्वांत थोर पुरस्कर्ते म्हणजे रवीन्द्रनाथ होत.

विसाव्या शतकाच्या या पूर्वार्धातील हिंदुस्थानात अतिप्रभावी आणि ठळक अशा दोन व्यक्ती म्हणजे रविन्द्रनाथ आणि गांधी होत.  त्यांच्यातील साम्य व विराधे पाहणे मोठे उद्बोधक आहे.  स्वभावाने आणि मनोरचनेने इतक्या परस्परविरुध्द अशा दुसर्‍या दोन व्यक्ती क्वचितच सापडतील.  मूळचे खानदानी, सरदारी रुबाबाचे नबाबी रीतिरिवाजाचे कलाकार, परंतु नंतर सामान्य मोलमजुरी करणार्‍या ग्राम्य वृत्तीच्या बहुजनसमाजाच्या ओढ्याने लोकशाही वृत्तीचे बनलेले रवीन्द्रनाथ म्हणजे आहे त्या जीवनाचा समाधानाने स्वीकार करून जन्मभर नाचत खेळत, गाणे गुणगुणत व अवघा संसार सुखाचा करण्याची जी एक भारतीय संस्कृतीची परंपरा त्या प्रवृत्तिपरंपरेचे प्रतिनिधी होते.  याच भारतीय संस्कृतीची जी त्यागवृत्तीची कठोर तपश्चर्येची जी दुसरी परंपरा त्या निवृत्तिमार्गाचे प्रतिनिधी म्हणजे सामान्य जनाशी जवळजवळ एकरूप झालेले, हिंदी शेतकर्‍यांच्या मूर्तिमंत अवतार व्हायला निघालेले गांधी.  तसेच पाहू गेले तर टागोर म्हणजे मूलत: विचारप्रधान प्रवृत्तीचे तर गांधी अविश्रांत एकाग्र कर्मप्रधान प्रवृत्तीचे.  दोघांचीही निरनिराळ्या रीतीने का होईना परंतु जागतिक दृष्टी असूनही दोघे संपूर्णपणे भारतीय होते.  भारतीय संस्कृतीतील भिन्न परंतु परस्पर संवादी, परस्पर पूरक अशा स्वरूपाचे ते प्रतिनिधी आहेत असे वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel