प्राचीन काळी मानवी व्यक्तित्वात अधिक एकदा व सुसंवादिता होती असे वाटते. परंतु त्या काळचे मानवी व्यक्तित्व आजच्यापेक्षा विकासाच्या खालाच्या पायरीवरचे होते. ही गोष्टही खरी. काही अपवादात्मक थोर विभूती अर्थात सोडून द्यायला हव्यात. ज्या या प्रदीर्घ कालखंडातून मानवप्राणी स्थित्यंतर पावत चालला आहे, त्या या कालखंडात ती प्राचीन एकता व तो मेठ आपण नष्ट केला, परंतु नवीन एकता, नवे सुसंवादित्व मात्र अद्याप आपण मिळवले नाही. अजूनही आपण कडव्या धर्मप्रकारांना मिठी घालून बसलो आहोत, निरुपयोगी झालेल्या नाना समजुती व आचार पाळतो आहोत व इतके करूनही पुन्हा अर्वाचीन बुध्दिप्रधान शास्त्रीय युगात वावरत असल्याची भाषा बोलून शेखी फुकट मिरवतो आहोत, कदाचित असेही असेल की विज्ञानाची, शास्त्रांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच संकुचित आहे, जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची त्यांच्याकडून उपेक्षाच केली गेली आहे. आणि त्यामुळे नवीन ऐक्य, नवीन सुसंवादित्व यांचा पायाच त्यांना घालता आला नाही. परंतु अलीकडे विज्ञानांची, शास्त्रांची दृष्टीही जरा व्यापक व खोल होत आहे असे वाटते. आणि प्राचीनांच्यापेक्षा अधिक वरच्या दर्जाच्या पातळीवरच्या जीवनातील ऐक्य अधिक प्रगल्भ व समुन्नत अशा मानवी व्यक्तिमत्त्वातील मेळ व सुसंवादित्व आपल्याला साधेल अशी आशा आहे.
परंतु हा प्रश्नही आज अधिक गुंतागुंतीचा आणि कठीण होऊन बसला आहे; कारण मानवी व्यक्तिमत्त्वाच्या आवाक्याबाहेर तो गेला आहे, प्राचीन आणि मध्यकालीन युगात मानवी व्यक्तिमत्त्वही मर्यादित होते. त्या वेळचे जग लहान होते. लहान लहान शहरांचे व खेड्यांचे ते युग सामाजिक संघटनेच्या व वागणुकीच्या काही ठराविक कल्पना, बाहेरच्या वादळांपासून व्यक्तींचे व समाजाचे स्वयंतृत्प जीवन सुरक्षित; असा तो काळ होता. आज साध्या व्यक्तीचे जीवनही जागतिक झाले आहे. सामाजिक संघटनेच्या नाना नवीन नवीन कल्पनांचे खटके उडत आहेत आणि त्या कल्पनांच्या पाठीमागे जीवनासंबंधीची भिन्नभिन्न तत्त्वज्ञाने उभी आहेत. कोठेतरी प्रबळ वारा वाहू लागतो व वादळ उठते, तर तद्विरोधी वारे दुसरीकडे उठून विरोधी वादळ तिकडेही सुरू होते. आज व्यक्तीच्या जीवनात सुसंवादित्व हवे असेल तर सार्या जगातील त्याच प्रकारच्या सुसंवादित्वाचा त्याला आधार लागेल.
परंतु इतर देशांतल्यापेक्षा हिंदुस्थानात जीवनाकडे पाहण्याची प्राचीन दृष्टी अजूनही बरीच दिसून येते. सामाजिक संघटनेचे प्राचीन विचारही अद्याप तग धरून आहेत. समाजाला स्थैर्य देण्याची त्याचप्रमाणे जीवनाच्या परिस्थितीशी समाजाचे जुळवून देण्याची काही विशेष शक्ती त्या प्राचीन दृष्टीत, त्या प्राचीन तत्त्वज्ञानात असली पाहिजे. नाहीतर ती दृष्टी टिकती ना. ते विचार दिसते ना. परंतु त्यातील गुणांवर जेव्हा या मारक अवगुणांचा पगडा बसला तेव्हाच ते गुण प्रेरणाहीन, शक्तिहीन झाले व केवळ जड ओझे मात्र उरले. ते काही असो, ती प्राचीन दृष्टी, ते प्राचीन तत्त्वज्ञान यांचा आज स्वतंत्र विचार करून भागणार नाही. जागतिक संदर्भात त्यांचा विचार करायला हवा, आणि जागतिक संदर्भाशी त्यांचे सुसंवादित्व निर्मायला हवे.
हॅवेलने म्हटले आहे की, ''भारतीय हिंदुधर्म म्हणजे नुसत्या आंधळ्या कडव्या श्रध्देचा विषय नसून आध्यात्मिक विकासाच्या वेगवेगळ्या पायर्या व जीवनाची वेगवेगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याशी मेळ बसण्याकरता व्यक्तीचे वर्तनात प्रत्यक्ष आचरणाचा तो एक सिध्दान्त आहे.'' जीवनाशी संबंध न येणारे एखादे तत्त्व नुसते तात्त्विक दृष्ट्या आंधळ्या कडव्या श्रध्देचा विषय असू शकेल. पण प्रत्यक्ष आचाराकरता सांगितलेला धर्म जीवनात आचरता येण्याजोगा, जीवनबध्दतीशी जुळणारा असला पाहिजे. नाहीतर अशा धर्माचा जीवनाला अडथळा होत राहतो. तो धर्म आचरणीय असेल, बदलत्या परिस्थितीशी मिळते घेण्याची त्याच्यात शक्ती असेल, जीवनाला अनुरूप असेल तरच त्या धर्माचे अस्तित्व सार्थ, सकारण ठरते. जोपर्यंत ही शक्यता त्याच्यात असेल तोपर्यंतच तो आले नियुक्त कार्य करील, हेतुसिध्दी करील. परंतु जीवनचक्राच्या गतिमार्गातून सुटून त्याचा मार्ग वेगळा झाला व जीवनाच्या सामाजिक गरजांशी त्याचा संबंध सुटून जीवनचक्राशी त्याचे अंतर वाढत गेले की वाढत्या अंतरामुळे त्या धर्मातही चेतना व अर्थ निघून जातात.