आर्यांचे आगमन

सिंधूच्या खोर्‍यातील संस्कृतींचे निर्माते कोण ?  ते कोठून आले होते, आपणाला अद्याप माहीत नाही.  हे लोक बहुधा येथलेच असावेत.  ही संस्कृती येथलीच असण्याचा बराचसा संभव आहे.  या संस्कृतीची काही मुळे, या संस्कृतीच्या काही पारंब्या दक्षिण हिंदुस्थानातही सापडण्याची शक्यता आहे.  सिंधूच्या खोर्‍यातील ही संस्कृती व लोक आणि दक्षिण हिंदुस्थानातील द्राविडी लोक व त्यांची संस्कृती यांत महत्त्वाचे साम्य आहे असे काही विद्वानांचे म्हणणे आहे.  कोणी परदेशातून लोक हिंदुस्थानात आलेच असले तर ते मोहेंजो-दारो येथील संस्कृतीच्यापूर्वी हजार वर्षे तरी आधी आले असले पाहिजेत.  म्हणूनच सामान्यत: असे समजायला प्रत्यवाय नाही की, मोहेंजो-दारो येथील हे लोक हिंदीच होते, हिंदुस्थानचेच रहिवासी होते; येथल्या भूमीशी एकरूप झालेले होते.

या सिंधुखोर्‍यातील संस्कृतीचे पुढे काय झाले ?  तिचा अंत कसा झाला ?  काही पंडितांचे (गॉर्डन चाईल्डही त्यात आहे) असे म्हणणे आहे की, काही अज्ञात अशा उत्पातामुळे या संस्कृतीचा नाश झाला.  सिंधू नदीला प्रचंड पूर येतात ही गोष्ट सुप्रसिध्द आहे.  सभोवतालची पुरे, ग्रामे सर्व त्या पुरात सापडतात हा नेहमीचा अनुभव आहे; तसे काही झाले असेल, किंवा हे घडण्याचा दुसरा एक प्रकार संभवतो.  बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी जमिनीचा कस व ओलावा हळूहळू जात राहून जमीन कोरडी रखरखीत बनते व अशा रीतीने लागवडीच्या जमिनीचे शेवटी उजाड वाळवंट होते.  मोहेंजो-दारोचे अवशेष पाहिले तर वाळूचे थरावर थर बसत गेलेले दिसतात, व त्यामुळे शहराचा तळच उंच होऊन घरांच्या जुन्या पायावर उंचउंच तळ घेत घरे बांधणे भाग झालेले दिसते.  खणून काढलेली काही काही घरे तर चांगली दुमजली, तिमजली दिसतात.  परंतु तळाच्या चढत्या उंचीमुळे उत्तरोत्तर भिंती अधिक उंच कराव्या लागत होत्या असे दिसते.  प्राचीन काळी सिंधप्रांत श्रीमंत व सुपीक होता हे आपल्याला माहीत आहे.  परंतु मध्ययुगापासून पुढे तो जवळ जवळ वाळवंट झालेला दिसतो.

तेव्हा हवामानाच्या फरकामुळे या प्रदेशातील लोकांवर, त्यांच्या राहणीवर चांगलाच परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.  परंतु हा परिणाम हळूहळू झाला असता, एकदम उत्पातासारखा झाला नसता, आणि काही झाले असले तरी हे असे हवामानाचे फरक थोड्या काही मर्यादित प्रदेशावर झाले असते; पण या संस्कृतीचा विस्तार मोठा होता.  म्हणून उत्पाताचे कोणते स्वरूप होते, ही संस्कृती कशी लोपली, कशी गडप झाली ते समजावून घ्यायला निश्चित असा पुरावा आपल्याजवळ नाही.  येथल्या काही प्राचीन शहरांना वाळूने गडप केले, आणि पोटात त्यांना संभाळूनही ठेवले; परंतु इतर पुरे, पट्टणे आणि तेथल्या प्राचीन संस्कृतीची सारी चिन्हे काळाच्या ओघात विलीन झाली, मातीत मिळून गेली.  भावी पुराणवस्तुसंशोधन खात्याला कदाचित काही अवशेष सापडतील व नंतरच्या काळाशी जोडणारे दुवे मिळतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel