वडील बर्‍याच उशीरा आमच्यामध्ये नैनी तुरुंगात आले.  आम्हाला न कळलेल्या कितीतरी गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या.  कायदेभंगाच्या चळवळीचे ते मुख्य सूत्रधार होते.  देशभर स्त्रियांनी हा जो पुढाकार घेतला होता, ही जी नि:शस्त्र लढाई सुरू केली होती, त्या गोष्टीला वडिलांनी कोणत्याही प्रकारे मुद्दाम उत्तेजन असे दिले नव्हते.  त्यांना त्या गोष्टी तितक्याशा आवडतही नसत.  त्यांचे पितृहृदय होते आणि या बाबतीत जरा ते जुन्या वळणाचेच होते.  तरुण नि वृध्द स्त्रिया भर उन्हात रस्त्यारस्त्यांतून गोंधळ माजवीत आहेत, पोलिसांशी त्यांच्या झटापटी होत आहेत, ही गोष्ट त्यांच्या मनाला फारशी रुचत नव्हती.  परंतु जनतेची मनोवृत्ती, भावना त्यांनी ओळखली होती, आणि त्यांनी कुणालाही निरुत्साही केले नाही.  स्वत:ची पत्नी, स्वत:च्या मुली, स्वत:ची सून यांच्याही आड ते आले नाहीत.  देशभर स्त्रियांनी जो उत्साह, जे धैर्य, जी कार्यक्षमता दाखविली त्यामुळे आपण आश्चर्यचकित झालो, बरेही वाटले असे ते म्हणाले.  स्वत:च्या घरातील, कुटुंबातील मुलांविषयी तर ते अधिकच प्रेमाने नि अभिमानाने बोलले.

२६ जानेवारीला स्वातंत्र्यदिन येतो.  वडिलांनी सांगितल्याप्रमाणे १९३१ च्या २६ जानेवारीला देशभर हजारो सभा झाल्या.  त्या त्या प्रांतीय भाषांतून ठराव वाचला व स्वीकारला गेला.  हा ठराव हजारो सभांतून मंजूर झाल्यावर दहाच दिवसांनी वडील वारले.

तो ठराव बराच मोठा होता.  परंतु त्यातील काही भाग हिंदी स्त्रियांसंबंधी होता.  ''भारतीय स्त्रियांविषयी वाटणारा आदर नि कौतुक येथे आम्ही नमूद करून ठेवतो.  मातृभूमीच्या संकटकाळी घरे-दारे सोडून त्या बाहेर पडल्या; हिंदी राष्ट्रीय सैन्यातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर त्याही उभ्या राहिल्या; त्यांचे धैर्य कधी खचले नाही, सहनशीलता संपली नाही; या लढ्यात, त्यागात नि विजयश्रीत भाग घ्यायला त्या पुरुषांच्या बरोबरीने आल्या ही केवढी धन्यतेची गोष्ट...''

या स्वातंत्र्ययुध्दात कमलाने केलेली कामगिरी बहाद्दुरीची, डोळ्यांत भरण्यासारखी होती.  अलाहाबाद शहरातील कामाची नीट आखणी करणे, संघटना करणे ही जबाबदारी अननुभवी अशा तिच्या खांद्यावर येऊन पडली होती.  जाणता असा, सर्वांना माहीत असा प्रत्येक कार्यकर्ता तुरुंगात होता.  परंतु कमला उभी राहिली.  अनुभवाची उणीव स्वत:च्या तेजाने, स्फूर्तीने नि उत्साहाने तिने भरून काढली.  थोड्याच अवधीत सार्‍या अलाहाबाद शहराच्या अभिमानाची ती मूर्ती बनली.  सार्‍या शहराला तिच्याविषयी अभिमान वाटू लागला.

माझ्या पित्याच्या आजारीपणाच्या नि मरणाच्या छायेत आम्ही पुन्हा एकमेकांस भेटलो.  एका नवीन भूमिकेवरून आम्ही एकमेकांस भेटत होतो.  एकाच कार्यात भाग घेतलेले, एकमेकांचे समजून घेतलेले आम्ही झालो होतो.  पुढे थोड्या दिवसांनी काही विश्रांती मिळावी म्हणून आम्ही सिलोनला गेलो.  बरोबर इंदिरा होती.  सुखविश्रांतीसाठी आम्ही एकत्र गेल्याची ती पहिलीच नि शेवटचीच वेळ !  सिलोनमध्ये असताना आपण एकमेकांस ओळखले असे आम्हाला वाटले, एकमेकांचे स्वरूप शोधले असे वाटले.  आता जो एक नवीन अती जवळचा असा संबंध निर्माण झाला होता त्याच्यासाठी इतकी वर्षे जणू आम्ही तयारी करीत होतो.

फार लौकर आम्ही परतलो.  मी कामात गुंतलो.  आणि नंतर पुन्हा तुरुंग.  आता पुन्हा एकत्र विश्रांतीसाठी जाणे नाही, किंवा एकत्र काम करणे नाही; एकत्र राहणेही नाही.  एकापाठोपाठ दोन दोन वर्षांच्या दोन शिक्षा आल्या.  त्या दोन शिक्षांच्या दरम्यान असा थोडासा वेळ जेमतेम मिळाला.  दुसरी सजा संपण्यापूर्वीच तिकडे कमला मरणशय्येवर पडली.

१९३४ च्या फेब्रुवारीत कलकत्ता येथील वॉरंटावरून जेव्हा मला अटक करण्यात आली त्या वेळेस कमला वरती आमच्या खोल्यांत गेली.  माझ्यासाठी कपडे गोळा करायला ती गेली होती.  तिचा निरोप घेण्यासाठी मीही तिच्या पाठोपाठ गेलो.  एकदम तिने मला मिठी मारली.  आणि तिला घेरी आली, ती पडली.  तिच्या बाबतीत पूर्वी असे कधी झाले नव्हते.  तुरुंगाच्या यात्रेकडे आनंदाने बघायला, एक रोजची गोष्ट अशा रीतीने बघायला आम्ही स्वत:ला शिकविले होते; त्याचा फारसा गाजावाजा आम्ही करीत नसू ; किंवा कसले प्रदर्शन करीत नसू.  परंतु आता असे का बरे झाले ?  आपली ही नित्याची, सर्वसाधारण अशी शेवटचीच भेट असे तिला भविष्य दिसले का काय ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel