रणजितसिंग आणि जयसिंग

हिंदुस्थान परकीयांच्या भक्ष्यस्थानी पडला याचे कारण हिंदी लोक पुरे पडत नव्हते आणि ब्रिटिशांची अधिक वरचढ व प्रगतिशील अशी समाजव्यवस्था होती हे होय.  त्यांच्या मानाने आम्ही मागासलेले होतो.  दोन्ही बाजूंच्या नेत्यांतील फरक स्पष्ट दिसे.  हिंदी पुढारी जरी समर्थ असले तरी विचाराच्या व कृतीच्या संकुचित, मर्यादित वर्तुळात फिरणारे ते असत.  अन्यत्र काय घडत आहे याची त्यांना जाणीव नसे; त्यामुळे बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना जमेना.  कधी कोणाची जिज्ञासा जागी झाली तरीही चाकोरी सोडून बाहेर पडण्याचे, त्यांच्या लोकांच्याभोवती बसलेले यांना कवच फोडून मुक्त होण्याचे धैर्य नसे.  त्याच्या उलट इंग्रजांना जगाचे अधिक ज्ञान होते.  स्वत:च्या देशातील त्याचप्रमाणे फ्रान्स, अमेरिका या देशांतील घडामोडींनी ते जागे झाले होते; विचार करू लागले होते.  दोन मोठ्या क्रांत्या झाल्या होत्या. फ्रेंचांच्या क्रांतिकारक सेन्याच्या स्वार्‍यांनी, नेपोलियनच्या युध्दांनी युध्दाचे सारे तंत्र पार बदलून गेले होते.  हिंदुस्थानात आलेल्या अडाण्यातील अडाणी इंग्रजानेही आपल्या प्रवासात जगाचे अनेक भाग पाहिलेले असत.  खुद्द इंग्लंडातही मोठमोठे शोधबोध होऊ लागले होते आणि औद्योगिक क्रांतीची चिन्हे दिसू लागली होती.  त्या क्रांतीचे भावी, दूरगामी परिणाम अद्याप फारसे कोणाच्या लक्षात मात्र आलेले नव्हते.  परंतु स्थित्यंतराच्या जडीबुटीचा प्रभाव जोरात चालता होता आणि लोकांवर त्याचा परिणाम होत होता. आणि या सर्वांच्या पाठीशी ब्रिटिशांची वाढती उत्साहशक्ती होती, ती त्यांना दूरदूरच्या देशांत नेत होती.

हिंदुस्थानचे इतिहास ज्यांनी लिहिले त्यांनी त्यात युध्दे, बंडे, मोठमोठे राजे, सेनापती यांच्याच इतक्या हकीकती दिल्या आहेत की, बहुजनसमाजाच्या मनात काय चालले होते, सामाजिक आणि आर्थिक शक्ती कशा कामे करीत होत्या, यासंबंधी त्यात अगदी थोडे आढळेल.  नीरस कंटाळवाण्या अशा त्या बाडातून क्वचितच कोठे प्रकाशाचा किरण दिसतो.  त्या भीषण काळात जनता मेटाकुटीला आली होती, अगदी गळून गेली होती असे दिसते.  दुर्दैवाच्या फेर्‍याला निमूटपणे शरण जाण्यापलीकडे काही उरले नव्हते.  लोक किंकर्तव्यमूढ झाले होते, जिज्ञासाहीन झाले होते, परंतु, त्या काळातही ज्यांना जिज्ञासा होती, ज्यांची चौकस बुध्दी विचार करीत होती, नवीन शक्तीचे स्वरूप समजावून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, असे पुष्कळ लोक असलेच पाहिजेत.  परंतु परिस्थितीच्या लोढ्यापुढे ते टिकले नाहीत.  परिस्थितीवर ते मात करू शकले नाहीत.

अशा चौकस व जिज्ञासाप्रधान व्यक्तींपैकी महाराजा रणजितसिंग हे एक होते.  रणजितसिंग जाट होता.  धर्माने तो शीख होता.  पंजाबात त्याने राज्य स्थापिले आणि पुढे ते वर काश्मीरपर्यंत व इकडे वायव्यसरहद्दीपर्यंत पसरले.  रणजितसिंगात दोष होते, दुर्गण होते, तथापि तो एक विशेष पुरुष होता यात शंका नाही.  जॅके माँट हा फ्रेंच लिहितो, ''रणजितसगिं अती शूर होता.  मला भेटलेला चौकस आणि जिज्ञासू असा हा पहिलाच हिंदी मनुष्य.  सारे राष्ट्र उदासीन होते.  परंतु या एकाची जिज्ञासा पुरून उरली होती.  त्याच्याजवळ बोलण्याची भीती वाटत असे.''*  हिंदी लोक सामान्यत: तितके मोकळे नसतात आणि त्यांच्यातील बुध्दिप्रधान लोक जरा अधिकच आतल्या गाठीचे असतात.  हिंदुस्थानात आलेल्या या परदेशी लष्करी नेत्यांशी किंवा साहसी लोकांशी मनमोकळेपणे जाऊन बसायला, बोलायला क्वचितच कोणी तयार झाले असतील, आणि पुन्हा या विदेशी लोकांच्या कृत्यांशी लोकांना आधीच शिसारीही आली होती.  म्हणून हिंदुस्थानातील बुध्दिमान लोक परकीयांपासून शक्यतो दूर राहून आपली प्रतिष्ठा सांभाळू पाहात.  अगदी जरूरच पडली तर प्रसंगविशेषी ते भेटीगाठीला जात.  परंतु ते सारे करणे औपचारिक असे.  इंग्रजांची किंवा परकीयांची ज्या हिंदी लोकांशी गाठ पडे ते बहुधा संधिसाधू किंवा लाळघोटे असत.  असेच लोक त्यांच्याभोवती असत.  कधी हिंदी राजेरजवाड्यांकडचे फितुरी करणारे-कारस्थाने करणारे लाचखाऊ दिवाण वगैरे भेटत.''
-----------------------
*  एडवर्ड थॉम्प्सनच्या ''The Making of the Indian Princes''-'भारतीय संस्थानांची निर्मिती' (१९४३) या पुस्तकातील उतारा, पृष्ठ १५८.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel