विज्ञानशास्त्राचे लक्ष प्रत्यक्षात वस्तुस्थिती म्हणून ज्या गोष्टी सिध्द करता येतील त्यांच्याकडेच काय ते लागले होते, अंतिम उद्देशांचा विषय त्या शास्त्राने दृष्टिआड केला.  विज्ञानशास्त्राने जगाला असे काही पुढे ढकलले की, स्वत: संभाळण्याकरता जगाला उडीच घ्यावी लागली, व त्या शास्त्रामुळे जगात कलाकौशल्य, सुखसोयी, यांनी नटलेल्या, झगझगीत झिलईने लकाकणार्‍या एका संस्कृतीची उभारणी झाली.  ज्ञानाची वाढ होण्याला असंख्य वाटा खुल्या होऊन मानवाचे सामर्थ्य इतके काही वाढले की, मानवाला भोवतालच्या जड सृष्टीवर मात करता येईल.  निसर्गाला आपल्या इच्छेनुरूप वाकवून कामाला जुंपता येईल असा विचार मनात येणे मानवाच्या इतिहासात प्रथमच शक्य झाले.  कोठे पृथ्वीच्या पाठीवरच्या जमिनीतील रसायने बदलून तर कोठे त्या पृष्ठभागाची घडण बदलून, आणि अशाच आणखी कैक मार्गांनी या पृथ्वीग्रहाच्या रूपात पालट घडवून आणता आणता मानव इतर निसर्गशक्तींच्या जवळ जवळ तोडीची एक निसर्गशक्ती होऊन बसला.  पण निसर्गाचे हे चमत्कारिक त्रांगडे अगदी पूर्णपणे आपल्या आटोक्यात आले आहे, आपल्याला तळमळत ठेवणारी जी आपली एकमेव इच्छा आहे तिला अधिक अनुरूप असा आकार आता आपल्याला ह्या निसर्गव्यवस्थेला देता येतील असे मानवाला वाटू लागल्यावर त्याला असे उमगले की, या खटाटोपात काहीतरी न्यून उरले आहे, कोणती तरी अत्यंत महत्त्वाची मूलभूत गोष्ट आपल्या योजनेत आलेली नाही.  ह्या सार्‍या विश्वसंसारातील विविध विषयांचे ज्ञान झाले, पण त्या विश्वसंसाराचे उद्देश कोणते, इतके दूरवरचे ज्ञान सोडून दिले तरी जवळच्या म्हणजे मानवी जीवनाचा उद्देश काय तेही मानवाला नीट समजले नव्हते, कारण विज्ञानशास्त्राच्या शिकवणीत या मानवी जीवनाला काही उद्देश आहे की काय याबद्दल काहीच आलेले नव्हते.  आणि निसर्गाचे नियंत्रण करण्याइतके सामर्थ्य अंगी आलेल्या मानवाला स्वत:चे नियंत्रण करता आले नाही त्यामुळे मानवाने निर्माण केलेला हा विज्ञानाचा राक्षस जिकडे तिकडे संहाराचे थैमान घालू लागला.  कदाचित प्राणिशास्त्र आणि पदार्थविज्ञानशास्त्र यांचा स्वरूपनिर्णय करताना त्यांचे जे अर्थ लागत आहेत त्यांच्या साहाय्याने मनुष्याला स्वत:चे ज्ञान अधिकाधिक होत जाऊन मानव कसा आहे व त्याने स्वत:वर कसे नियंत्रण घातले पाहिजे ते अधिक समजण्याचा संभव आहे.  किंवा असेही होईल की, या विषयाच्या ज्ञानात मानवाशी पुरेशी प्रगती होऊन मानवी जीवनावर तिचा काही उपयुक्त परिणाम होण्याच्या आत मानवाच्या हातून त्याने स्वत:निर्माण केलेल्या ह्या सार्‍या संस्कृतीचा विध्वंस होऊन त्याला पुन्हा नव्याने प्रारंभ करावा लागेल.

विज्ञानशास्त्राची प्रगती होण्याला संधी मिळत राहिली तर त्या प्रगतीची सीमा कोठवर आहे ते सांगता येत नाही.  ती प्रगती अनंत आहे असे वाटते.  पण कदाचित असेही असेल की, विज्ञानशास्त्राची अनुभवाकरिता निरीक्षण करीत राहण्याची जी पध्दती आहे ती मानवाला येणार्‍या विविध प्रकारच्या अनुभवांपैकी प्रत्येक प्रकारात नेहमीच उपयोगी पडेल असे नाही, मानवाभोवती पसरलेल्या अज्ञाताच्या अथांग महासागराचे परतीत ह्या पध्दतीने गाठता येणार नाही.  विज्ञानशास्त्राला तत्त्वज्ञानाची जोड दिली तर विज्ञानशास्त्राला त्या शोधाच्या मार्गावर थोडे आणखी पुढे जाता येईल, त्या अज्ञाताच्या महासागराच्या ज्या भागावरून कोणताच किनारा दिसत नाही त्या भागावरून संचार करण्याचे धाडस ह्या जोडीला करता येईल.  आणि विज्ञानशास्त्र व तत्त्वज्ञान ह्यांची ही जोड वापरूनही मानवाची मती कुंठित झाली तर ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता या जोडीखेरीज आणखी काही इतर शक्ती मानवाच्या ठायी असतील तर त्यांचा आधार मानवाला घ्यावा लागेल.  कारण मानवी मनोरचना, मानवाच्या बुध्दीचा स्वभावधर्म आतापर्यंत जो आहे तो लक्षात घेतला तर एका निश्चित मर्यादेपर्यंतच मानवाच्या बुध्दीची, त्याच्या तर्कशक्तीची धाव जाऊ शकते, त्या मर्यादेपलीकडे तिला जाताच येत नाही असे नि:संशय दिसते.  पास्कल म्हणतात, ''बुध्दीचा विकास होऊन तिला पूर्णावस्था प्राप्त झाल्याची खूण ही की, त्या बुध्दीला अगम्य असे अज्ञात अनंत आहे याची जाणी तिला व्हावी.  तशी जाणीव तिला होईपर्यंत ती खरोखर कच्चीच मानली पाहिजे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel