भारताचा परदेशीय व्यापार
ख्रिस्ती सनाची पहिली हजार वर्षे हिंदुस्थानचा व्यापार दूरवर पसरलेला होता, कितीतरी विदेशी व्यापारपेठा हिंदी व्यापारीवर्गाच्या हातात होत्या. पूर्वेकडील समुद्रातच नव्हे, तर भूमध्यसमुद्राकडेही भारतीय वर्चस्व पसरले होते. मिरी आणि इतर मसाल्याचे पदार्थ हिंदुस्थानातून किंवा हिंदुस्थानमार्गे पश्चिमेकडे जात. त्यांची वाहतुकीची गलबते कधी चिनी असत, कधी हिंदी असत. रोमवर गॉर्थिक स्वारी आली असता अलॅरिकने (जो गॉथ होता) रोममधून तीन हजार पौण्ड मिरी नेली असे वर्णन आहे. अनेक ऐषारामाच्या वस्तूंसाठी रोममधून सारे सोने हिंदुस्थानकडे आणि पूर्वेकडे सारखे जात आहे अशी रोमन लेखकांनी कळवळून तक्रार केली आहे.
त्या काळी हिंदुस्थानात काय किंवा कोठेही काय हा व्यापार अदलाबदली स्वरूपाचा होता. जे जेथे होई, तयार केले जाई ते देऊन, जे होत नसे ते घ्यावयाचे. हिंदुस्थान समुध्द, सुपीक देश होता. इतर देशांत नसणार्या पुष्कळशा गोष्टी येथे विपुल होत्या, आणि समुद्रावर दुसर्या कोणा देशाची धास्ती नसल्यामुळे, या वस्तू समुद्रमार्गे बाहेर पाठविल्या जात. पूर्वेकडील बेटांतून माल घेऊन हिंदी व्यापारी तो पश्चिमेकडे पाठवीत आणि अशा रीतीनेही फायदा मिळवीत. हिंदुस्थानला आणखीही विशेष अनुकूलता होती. इतर देशांना कापड विणणे माहीत होण्यापूर्वी फार प्राचीन काळापासून या देशात तो धंदा सुरू झालेला होता. कापडाचा धंदा त्यामुळे येथे फारच भरभराटला होता. हिंदी कापड दूरदूरच्या देशांना जाई. रेशीमही येथे फार पुरातन काळापासून तयार होई. परंतु चिनी रेशमाच्या मानाने ते कमी प्रतीचे होते. चिनी रेशीम ख्रिस्त शकापूर्वी चौथ्या शतकापासून तरी हिंदुस्थानात येऊ लागले. हिंदी रेशमाचा धंदा पुढे वाढला असेल; परंतु फारशी प्रगती झाली होती असे म्हणता येणार नाही. कापड रंगविण्याच्या बाबतीत मात्र निरनिराळ्या पध्दती शोधून काढण्यात आल्या. पक्के रंग तयार केले जाऊ लागले. निळीच्या रंगाचा विशेष उल्लेख केला पाहिजे. इंग्रजीत त्याला इंडिगो म्हणतात, त्याचे मूळ ग्रीक लोकांनी इंडियापासून बनविलेल्या शब्दाशी आहे. परदेशाशी हिंदी कापडाचा व्यापार अधिकच भरभराटला, त्याला रंगज्ञान अधिक कारणीभूत झाले असावे.
हिंदुस्थानात काही शतकांपर्यंत तरी इतर राष्ट्रांपेक्षा रसायनशास्त्र अधिक प्रगत झाले होते. मला रसायनशास्त्राची फारशी माहिती नाही, परंतु सर प्रफुल्लचंद्र राय, हिंदी शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ यांचे अध्वर्यू, पहिले नवयुगप्रवर्तक, हिंदी शास्त्रज्ञांच्या अनेक पिढ्या ज्यांच्या हाताखाली शिकून तयार झाल्या, त्यांनी एक हिंदी रसायनशास्त्राचा इतिहास लिहिला आहे. त्या काळातील रसायनशास्त्र धातूंपासून सोने करू पाहणे, निरनिराळी धातुकामे यांच्याशीच अधिक संबध्द होते. नागार्जुन नावाचा एक प्रसिध्द हिंदी रसायनशास्त्रज्ञ आणि धातुविद्याविशारद होऊन गेला. तत्त्वज्ञानी नागार्जुन आणि हा एकच असे काहींचे म्हणणे आहे, परंतु ते संशयास्पद आहे.