परंतु प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात प्रगतीचा एवढा बोलबाला नव्हता.  जुन्यात फरक करायला हवा, नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे ही जाणीवमात्र सदैव होती, आणि म्हणूनच तर समन्वयाचा छंद लागला होता.  हिंदुस्थानात केवळ बाहेरून आलेल्यांशीच समन्वय करावयाचा नव्हता, तर व्यक्तीच्या अंतर्बाह्य जीवनातही समन्वय आणावयाचा, मनुष्य आणि निसर्ग यांच्यातही मेळ घालावयाचा अशी दृष्टी होती.  व्यक्तिगत अंतर्बाह्य जीवनात आणि मानवी जीवन व निसर्ग यांच्यात आजच्यासारखे प्रचंड विरोध आणि भेद त्या काळी नव्हते.  ही संस्कृती सबंध हिंदुस्थान देशभर एकच असल्यामुळे ह्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ऐक्य निर्माण होऊन देशातल्या विविधतेवरही एकराष्ट्रीयत्वाची मुद्रा आली.  राजकीय व्यवस्थेच्या मुळाशी स्वायत्त ग्रामपंचायतींची संख्या होती.  त्यामुळे वरचे राजे कोणीही आले गेले तरी ही तळची पध्दत सदैव टिकून राहिली.  बाहेरून येणारे नवीननवीन लोक किंवा येणार्‍या स्वार्‍या यांचा राज्याला फारतर वरवर स्पर्श होई.  परंतु ग्रामपंचायतीची मुळे सदैव शाबूत राहिली.  राज्यसत्ता दिसायला कितीतरी अनियंत्रित असली तरी परंपरेचे आणि सनदशीर असे शेकडो मर्यादाबंध तिला असत.  आणि कोणाही राजाला सहजासहजी आणि सुखासुखी ग्रामसंस्थांच्या हक्कांवर आणि अधिकारांवर अतिक्रमण करता येत नसे.  या परंपरागत हक्कांमुळे, अधिकारांमुळे सर्व गावांतील लोकांना आणि व्यक्तीलाही एक प्रकारचे स्वातंत्र्य असे.

आजच्या हिंदी लोकांत प्राचीन भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे उत्तर नमुने व त्या संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान बाळगणारे रजपुतांइतके दुसरे कोणी आढळणार नाहीत.  भूतकाळातील त्यांची शौर्य, धैर्य, पराक्रमाची कृत्ये ह्या आर्य परंपरेचा एक जिवंत भाग झाली आहेत.  परंतु काही रजपूत इंडो-सिथियनांचे वंशज आहेत असे म्हणतात व काही तर हूणांचे वंशज आहेत.  आपल्या जमिनीशी एकजीव झालेला, आपल्या शेतीभातीत काडीमात्र ढवळाढवळ सहन न करणारा हिंदी जाट शेतकरी, त्याच्याहून अधिक धट्टीकट्टी जात हिंदुस्थानात नाही, त्याच्याहून अधिक चांगला शेतकरी नाही.  परंतु जाटही मूळचे सिथियन व काठेवाडातले उंच सुंदर काठी शेतकरीही सिथियनच.  आपल्या लोकांतील काहींचा मूळवंश काहीशा निश्चितपणे सांगता येतो, काहींचा नाही.  परंतु मूळ कोणतेही असो, सारे आमूलाग्र हिंदी बनून गेले आहेत.  हिंदी हेच त्यांचे विशिष्ट रूप, हिंदी संस्कृतीत इतरांप्रमाणे त्यांचाही भाग आहे व ते प्राचीन भारतीय परंपराच स्वत:ची परंपरा मानतात.

हिंदुस्थानाप्रमाणे इराणी संस्कृती भक्कम पायावर उभी होती; त्यामुळे स्वार्‍या करणार्‍यावर तिचीच छाप पडून तेच इराणी बनत इ. सनाच्या सातव्या शतकात अरबांनी इराण जिंकला, परंतु इराणी संस्कृतीचा पगडा त्यांच्यावर बसून, वाळवंटातील त्यांची साधी राहणी जाऊन इराणी संस्कृती बडेजावाची व कृत्रिम अशी त्यांनी स्वीकारली.  युरोपातील फ्रेंच भाषेप्रमाणे पर्शियन भाषाही आशियातील विस्तृत प्रदेशातील संस्कृत लोकांची भाषा बनली.  इराणी कला व संस्कृती यांचा प्रसार पश्चिमेकडे इस्तंबूलपासून तो पूर्वेकडे गोबीच्या वाळवंटापर्यंत झाला.

परंतु जे परकीय अलग राहिले, किंवा ज्यांना ह्या देशाच्या जीवनात व समृध्द विविध संस्कृतीत भाग घेता आला नाही व वाटा हिस्सा मागता आला नाही, त्या त्या परकीयांचे या देशात फार काळ वर्चस्व राहिले नाही, ते शेवटी नाहीसे होत गेले.  मात्र केव्हा केव्हा या प्रकाराने त्यांची स्वत:ची व हिंदुस्थानाचीही थोडीफार हानी झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel