सरकारने केलेल्या सार्वत्रिक धरपकडीची ही दंगे होण्याची प्रतिक्रिया देशभर, शहरोशहरी, खेड्यापाड्यांतून विशेषच विस्तृत झाली. हिंदुस्थानातल्या सार्या प्रांतांतून व काही संस्थानांमध्येही सरकारी बंदी धाब्यावर बसवून लोकांनी असंख्य निदर्शने केली. देशभर जिकडे तिकडे हरताळ पडले, दुकाने, बाजार, नित्याचे व्यवहारदेखील बंद पडले, आणि त्यांची कालमर्यादा काही ठिकाणी काही दिवस तर काही ठिकाणी काही आठवडे व क्वचित महिन्यावर सुध्दा झाली. तसेच मजूरवर्गाचेही संप झाले. मजूरवर्ग अधिक संघटित होता, त्यांना सामुदायिक पध्दतीने चळवळ चालविण्याची शिस्त अधिक लागली होती. मोठमोठ्या केंद्रांतून असलेल्या महत्त्वाच्या कारखान्यांतील मजूरवर्गाने राष्ट्रीय पुढार्यांना अटक करणार्या सरकारचा निषेध करण्याकरिता स्वयंस्फूर्तीने अनेक संप पुकारले. यांपैकी एक विशेष लक्षात येण्याजोगे उदाहरण म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या पोलादी कारखान्यापैकी जमशेदपूर येथील प्रचंड वसाहतीत सार्या हिंदुस्थानातून निवडक कारागीर भरलेले होते त्यांनी पंधरा दिवस काम सोडले, आणि तेथील व्यवस्थापकांनी काँग्रेस पुढार्यांची सुटका करण्याकरिता व राष्ट्रीय सरकारची स्थापना होण्याकरिता आपल्याकडून होईल तितकी खटपट करण्याचे वचन या कारागिरांना दिल्यानंतरच ते पुन्हा कामावर आले. अहमदाबाद म्हणजे कापड गिरण्यांचे एक मोठेच केंद्र; तेथे ट्रेड युनियन (कामगार संघटना) या संस्थेने तसा विशेष आदेश दिला नसतानाही एकदम तेथील इतक्या सार्या गिरण्यांतून हरएक प्रकारचे काम सर्वस्वी बंद पडले* हा अहमदाबादचा सार्वत्रिक संप मोडून काढण्याचे अनेक प्रयत्न होऊनही तो संपूर्णपणे तीन महिने चालला. सरकारी धोरणाला कामगारांकडून हे जे उत्तर मिळाले ते केवळ राजकीय स्वरूपाचे स्वयंस्फूर्ती होते, त्यामुळेत्यांचे फार नुकसान झाले, कारण त्या वेळी मजुरीचे दर खूपच होते. ह्या दीर्घ अवधीत त्यांना बाहेरून काहीही मदत मिळाली नाही. ह्याखेरीज बाकीच्या उद्योगकेंद्रांतून जे संप झाले ते कमी काळ चालले, काही तर काही दिवसांपुरतेच होते. कानपूर हेही अहमदाबादप्रमाणेच कापड गिरण्यांचे मोठे केंद्र आहे. तेथे माझ्या माहितीप्रमाणे मुळीच संप झाला नाही, कारण तेथील कामगार पुढारी कम्युनिस्ट होते. त्यांनी तेथे संप होऊ न देण्यात यश मिळवले. सरकारी मालकीच्या रेल्वे खात्यातल्या नोकरांनी आपल्या कामात विशेष लक्षात येण्याजोगा किंवा सामान्यही खंड पाडला नाही. जो काय खंड पडला असेल तो आपसात दंगे झाले म्हणून पडला, पण तो मात्र बराच काळ होता.
-------------------------
* सरकारी अधिकार्यांनी व त्याच्यानंतर इतर अनेक लोकांनी त्यांची पुनरावृत्ती करून वारंवार असे विधान केले आहे की हे संप विशेषत: जमशेदपूर आणि अहमदाबाद येथील, मजुरांच्या मालकांनी, गिरणीवाल्यांनी घडवून आणले. ह्या विधानावर विश्वास ठेवणे मोठे कठीण आहे, कारण ह्या संपामुळे मालकांना फारच मोठे नुकसान सोसावे लागणार, व अशा रीतीने आपल्या हिताविरुध्द कार्य करण्याला तत्पर असलेला धनकनकसंपन्न उद्योगपती निदान मला तरी आतापर्यंत कधी भेटली नाही. हे खरी की, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे अशी अनेक उद्योगपतींची इच्छा असून स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल त्यांना सहानुभूती वाटते. पण ह्या स्वातंत्र्याची त्यांची कल्पना अर्थातच अशी आहे की, स्वतंत्र हिंदुस्थानात त्यांचे हल्लीचे स्थान पुढेही अढळच राहणार. त्यांना कोणतीही क्रांतिकारक चळवळ किंवा समाजव्यवस्थेत काही महत्त्वाचे स्थित्यंतर मुळीच आवडत नाही. परंतु असे एक घडले असल्याचा संभव आहे की, १९४२ च्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जिकडे तिकडे लोकांत पसरलेल्या भावनेचे गांभीर्य व विस्तार लक्षात घेऊन त्यांनी आपली नेहमीची, म्हणजे संप म्हटला की, मालकाने पोलिसांच्या साहय्याने मजुरांवर कुरघोडी करून त्यांनाच शिक्षा करण्याची वृत्ती आवरून धरली.
ब्रिटिश गोटातून व ब्रिटिश वर्तमानपत्रांतून सत्य समजून गृहीत धरून दुसरे एक असे विधान नेहमी करण्यात येते की, मोठमोठ्या उद्योगपतींकडून काँग्रेसला फार मोठे पैशाचे साहाय्य मिळते. हे विधान सर्वस्वी खोटे आहे, आणि मी असे म्हणतो, कारण मी अनेक वर्षे काँग्रेसचा मुख्य कार्यवाहक व अनेकदा अध्यक्ष होतो आणि मला ती माहिती अर्थातच आहे. खेडेगावातून चालविता येण्याजोगे लहानसहान धंदे काढणे, अस्पृश्यतेचे उच्चाटन करून दलित वर्गांचा उध्दर करणे, मूलोद्योग शिक्षण, या व असल्याच सामाजिक सुधारणेचे जे कार्य गांधीजी व काँग्रेस यांनी चालविले त्याल क्वचित कोणी कारखानदाराने मधून केव्हातरी आर्थिक साहाय्य दिले आहे. पण नेहमीच्या काळातसुध्दा काँग्रेसच्या राजकीय कार्यापासून ते अगदी कटाक्षाने अलिप्त राहिले आहेत, आणि सरकारशी काँग्रेसने लढा करण्याचे जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तर त्यांनी त्यांचे हे धोरण विशेषच काळजीपूर्वक पाळले आहे. मधूनमधून कधीकाळी त्यांनी काँग्रेसबद्दल काही सहानुभूती दाखविली असली तरी एकंदरीत जगातल्या बहुतेक व सुज्ञ व सुप्रतिष्ठित माणसाप्रमाणे, आहे ते सांभाळावे, साहस करू नये या तत्त्वावर त्यांचीही श्रध्दा आहे. आतापर्यंत काँग्रेसचे कार्य चालले आहे ते काँग्रेसचे जे खूपसे सभासद आहेत त्यांच्या किरकोळ वर्गणीवर व त्यांच्या देणग्यांवर चालले आहे. बहुतक कार्य स्वयंस्फूर्तीने, विनामूल्य काम करणारांच्या द्वारेच झालेले आहे.