आरंभीच्या बौध्दधर्माला हीनयान असे नाव आहे; नंतर पुढे महायान संप्रदाय निघाला.  या महायान संप्रदायाने बुध्दांना देवत्व दिले व देव म्हणून बुध्ददेवांची भक्ती सुरू झाली.  हिंदुस्थानच्या वायव्य भागात ग्रीक वर्चस्व होते.  तेथे बुध्दांची मूर्ती तयार झाली.  याच वेळेस संस्कृत विद्येचे आणि सनातन ब्राह्मणी धर्माचे भारतवर्षात पुनरुज्जीवन सुरू झाले.  हीनयान आणि महायान यांच्यात सारखी भांडणे होत व वादविवाद विकोपाला जात.  पुढचा सारा इतिहास या भांडणांनी भरलेला आहे.  सीलोन, ब्रह्मदेश, सयाम या देशांत हीनयान पंथ आहे.  हे देश ज्या देशांत महायान पंथ चालू आहे त्या चीन, जपान देशांना कमी लेखतात आणि चीन, जपानही या देशांना कमी मानतात अशी माझी समजूत आहे.

हीनयान पंथ प्राचीन विशुध्दतेला चिकटून राहिला.  पाली भाषेत बुध्दांचे म्हणून जे काही संग्रहित करण्यात आले, त्याच्याशी तो निष्ठेने राहिला.  परंतु महायान पंथ सर्वत्र पसरला असताना त्याच्या मूल तत्त्वांना विरोधी अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश झाला व प्रत्येक देशाच्या विशिष्ट दृष्टीने त्या त्या देशापुरते त्याचे सोयीने वेगळे रूप झाले.  हिंदुस्थानात बहुजनसमाजाच्या धर्माप्रमाणे त्याने रूप घेतले.  चीन, जपान, तिबेट या देशांमध्ये त्याने आपला स्वतंत्र विकास करून घेतला.  बुध्दाने आत्म्यासंबंधी जी तटस्थवृत्ती स्वीकारली होती, तिच्यापासून बौध्दधर्मातील काही काही थोर पहिले विचारवंत बरेच दूर गेले.  त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अजिबातच नाकारले.  थोर बुध्दिमत्तेची जी अनेक माणसे या सुमारास चमकली त्यांच्यातील नागार्जुन हा मुकुटमणी होय.  हिंदुस्थानात अतिथोर बुध्दिमत्तेची जी काही माणसे झाली, त्यांच्यात नागार्जुनाची गणना आहे.  कनिष्काच्या कारकीर्दीत, ख्रिस्त शकाच्या आरंभी तो झाला.  महायान पंथाची तत्त्वे प्रामुख्याने त्यानेच बनविली.  त्याचे विचारसामर्थ्य अलौकिक आहे.  विचार करताना तो सरळ थेट जातो, वैचारिक साहस करताना डगमगत नाही.  जी अनुमाने इतरांना पाखंडी वाटून ती काढायला दुसरे भ्यायले असते, तसली अनुमाने काढायला नागार्जुन कचरत नाही.  सिध्दान्त काढताना त्याने असा निष्ठुर तर्कवाद चालविला आहे की आरंभी त्याने जे सत्य ठरविले असेल ते सुध्दा अखेरीस त्याला स्वत:ला असत्य मानावे लागते.  विचारशक्तीला स्वत:चे स्वत्व समजणे शक्य नाही म्हणून स्वत:व्यतिरिक्त बाहेरचे काय ते समजणे शक्य नाही व म्हणून इतरांचे ज्ञान शक्य नाही.  या विश्वविरहित दुसरा विश्वंभर नाही, विश्वंभराशिवाय विश्व नाही; आणि दोन्हीही आभास आहेत, मृगजलवत आहेत.  अशा प्रकारे नागार्जुन विध्वंस करीत पुढे जातो; आणि शेवटी काहीच उरत नाही.  सत्य किंवा असत्य, यांच्यात फरक नाही.  कोठल्याही वस्तूचे यथार्थ किंवा अयथार्थ ज्ञान शक्य नाही.  कारण जे आभासरूप आहो ते चुकीचे समजण्याची तरी कोठे शक्यता आहे ? या जगात सत्य असे काहीच नाही.  जगाचे अस्तित्व हा एक आभास आहे.  गुण व संबंध या कल्पनांमुळे भासणारी ती एक काल्पनिक रचना आहे.  ही रचना आपल्याला खरीखुरी वाटते, पण तिचा अर्थ लावणे आपल्याला अशक्य आहे.  परंतु या सर्व अनुभवाच्या पसार्‍याच्या पाठीमागे काहीतरी असावे, असे नागार्जुन ध्वनित करीत आहे असे वाटते.  सर्वतंत्र-स्वतंत्र असे काहीतरी असावे परंतु ते तर्कातीत आहे; ते बुध्दिगम्य नाही, कारण ते विचाराच्या प्रक्रियेत आले की लगेच सोपाधिक होणार, कशाशी तरी संबध्द होणार !*

स्ट्चर बात्स्कीने बौध्दधर्मीय तत्त्वज्ञान आणि अर्वाचीन विज्ञानाची दृष्टी यांच्यातही काही साधर्म्य दाखविले आहे.  विश्वाची अखेरची स्थिती काय होईल या बाबतीत अर्वाचीन शास्त्रांचे जे म्हणणे आहे, तसेच काही बौध्दधर्मीय तत्त्वज्ञानातही सांगितलेले आहे.  स्ट्चरबात्स्कीने एक गंमतीची गोष्ट दिली आहे,  सोव्हिएत रशियात बैकलसरोवराच्या पलीकडचे बुरिएत रिपब्लिक जेव्हा नव्यानेच स्थापण्यात आले, तेव्हा त्यातील शिक्षणाधिकार्‍यांनी धर्म वगैरे सर्व झूट आहे; अर्वाचीन शास्त्रे या विश्वाकडे जडवादी दृष्टीने पाहतात इत्यादी प्रचार सुरू केला.  त्या रिपब्लिकमध्ये महायानपंथी काही बौध्द भिक्षू होते.
-----------------------------
*  सोव्हिएट रशियातील विज्ञानमंदिरातील प्राध्यापक स्ट्चर बात्स्की हे 'बौध्द धर्मीय निर्वाणाची कल्पना' या आपल्या पुस्तकात नागार्जुनाला मानवजातीच्या थोर तत्त्ववेत्त्यांत गणले पाहिजे असे म्हणतात.  नागार्जुनाची विवेचनशैलीही आश्चर्यकारक आहे, चित्ताकर्षक, निर्भय, निरुत्तर करणारी, काही वेळा उध्दट भासणारी आहे, असे ते नमूद करतात.  नागार्जुनाच्या मतांची ब्रॅडले आणि हेगेल यांच्या मतांशी त्यांनी तुलना केली आहे.  ते लिहितात, ''नागार्जुनाचा अभाववाद आणि आपल्या दैनंदिन जगासंबंधीच्या सर्व कल्पनांचा ब्रॅडलेने केलेला निषेध यांत आश्चर्यकारक साम्य आहे.  वस्तू आणि त्यांचे गुण, संबंध, दिक् आणि काल, स्थित्यंतर, कार्यकारणभाव, गती, स्व कशालाच सत्यता नाही असे ब्रॅडले म्हणतो.  हिंदी तत्त्वज्ञानाच्या भाषेत म्हणायचे झाले तर ब्रॅडलेला यथार्थ 'माध्यमिक' असे म्हटले पाहिजे.  परंतु ही सारी साम्ये बाजूला ठेवली तरी, आणखीही एक दुसरी आश्चर्यकारक गोष्ट दिसते ती ही की, हेगेलची विरोधविकासी पध्दती आणि नागार्जुनाची रीती यांत अधिकच साम्य आढळते.  जणू एकाच घरातील ते दोघे इतके ते साम्य आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel