वेद

पुष्कळ हिंदू वेदांना अपौरुषेय मानतात हे मी दुर्दैव समजतो.  कारण असे मानण्यामुळे त्यांचा खरा विशेषसूचक अर्थ आपल्या ध्यानात येत नाही; आणि तो हा की, विचाराच्या प्रथमावस्थेत मानवी मनाची एकेक पाकळी कशी उकलत होती हे या वेदामध्ये पाहावे; आणि ते वेदात दिसणारे मानवी मन पाहिले की आपण थक्क होतो.  विद् म्हणजे जाणणे.  या विद् धातूपासून वेद शब्द बनला.  वेद म्हणजे त्या काळी असणार्‍या ज्ञानाचा संग्रह, म्हणून वेद झाले.  त्यात काय काय अस्ताव्यस्त पसरलेले आहे.  सूक्ते, स्तोत्रे, यज्ञार्थविधी, जादूटोणा आणि निसर्गवर्णनाचे उदात्त काव्य हे सारे काही त्यात आहे.  वेदात मूर्तिपूजा नाही, देवालये नाहीत.  जिवंत जिणे जगण्याची उत्कट वृत्ती या वेदातून सर्वत्र भरलेली आढळते.  ह्या वेदकालीन प्राचीन आर्यांना ऐहिक जीवनाची इतकी मनापासून हौस होती की, त्यांनी आत्म्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही.  मेल्यानंतरही मनुष्याचे काही एक प्रकारचे अस्तित्व आहे अशी त्यांची अस्पष्ट कल्पना दिसते.

हळूहळू ईश्वराची कल्पना वाढत चाललेली दिसते.  नंतर एकेश्वरवाद दिसतो आणि त्यानंतर त्याच्याशीच संमिश्र अशी होत असलेली अद्वैताची कल्पना आलेली दिसते. त्यांचे विचारचक्र फिरत फिरत एका अनोळखी, नव्याच प्रदेशात गेलेले दिसते, आणि मग निसर्गाचे, सृष्टीचे हे गूढ काय आहे याचे एकाग्र चिंतन करण्याची व ते जाणण्याची जिज्ञासू वृत्ती आलेली आढळते.  ही विचाराची वाढ होत होत शतकेच्या शतके लोटलेली दिसतात, व वेदांच्या शेवटापर्यंत-वेदान्तापर्यंत आलो की आपल्याला उपनिषदांचे तत्त्वज्ञान लागते.

ॠग्वेद—पहिला वेद—मानवजातीजवळचा हा सर्वांत प्राचीन ग्रंथ आहे.  मानवी मनाचा पहिला पूर, पहिला आविष्कार निसर्गाच्या सौंदर्याने व गूढतेने वेडावलेली वृत्ती, काव्याची भव्य प्रभा या वेदात सापडतात.  डॉ. मॅनिकॉल म्हणतात त्याप्रमाणे या प्राचीन स्तोत्रातून, ''या जगाचे महत्व काय, त्यात मनुष्याच्या जीवनाचे स्थान काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणार्‍या त्या अतिप्राचीन काळातील आर्यांचे शूर, साहसी विचार या वेदांत नमूद केलेले आढळतात.  ॠग्वेदात हिंदुस्थान अशा एका शोधासाठी बाहेर पडलेला दिसतो की जो शोध अद्यापही त्याने चालू ठेवला आहे, थांबविला नाही.''

आणि या ॠग्वेदाच्याही आधी सुसंस्कृत जीवनाची आणि विचारांची कितीतरी युगे येऊन गेली होती; त्याच्याआधी सिंधूनदीच्या खोर्‍यातील तसेच मेसापोटेमिया व इतर देशांतील संस्कृती उदयाला येऊन जुन्या होऊन गेल्या होत्या.  आणि म्हणून वेदात जेव्हा  ''नम: पूर्वेभ्य: पथिकृद्भयो:'' असा त्या आपल्या प्राचीन पूर्वजांना, त्या द्रष्ट्या ॠषींना, त्या पहिल्या धाडशी मार्गदर्शक नेत्यांना केलेले ॠग्वेदग्रंथाचे अर्पण योग्यच होईल.

या वैदिक सूक्तांविषयी रवींद्रनाथ लिहितात, ''सृष्टीचे चैतन्य पाहून आर्यांना भय व आश्चर्य वाटून त्याचा त्यांच्या मनावर जो परिणाम झाला त्याचा काव्यमय वृत्तान्त म्हणजे हे वेद.''  त्या वैदिक लोकांची प्रतिभा रसरसलेली जिवंत होती, कृत्रिम नव्हती.  जीवनात मुळातच असलेली अनंत गूढतेची जाणीव संस्कृतीच्या अगदी उष:कालीच त्यांना कल्पनेने आली.  निसर्गाच्या (पृथ्वी, जल, वायू, तेज वगैरे) तत्वांना व शक्तीला त्यांनी साध्या सरळ श्रध्देने देव मानले.  परंतु ही श्रध्दा भेकड नसून पराक्रमी, आनंदी होती; चैतन्यातल्या अज्ञेय गूढाने गांगरून निष्क्रिय न होता जीवनगूढ म्हणून ते त्यांना मोहक वाटे.  या सभोवतालच्या विश्वातील परस्परविरोधी विविधतेचे चिंतन करणार्‍या बुध्दीचा बोजा त्या श्रध्देवर अद्याप पडलेला नव्हता.  उलट कधी कधी ''एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति'' (सत्य एक आहे, शहाणे लोक त्याला नाना नावांनी संबोधतात) अशा सहजस्फूर्त अनुभवाने मधून मधून ही श्रध्दा उजळलेली व प्रकाशमान झालेली दिसून येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel