बडे सरदार लोक आणि खेड्यापाड्यांतील हे शेतकरी, कारागीर यांच्यामध्ये आणखी एक वर्ग असे, तो म्हणजे व्यापार्‍यांचा, दुकानदारांचा.  हा वर्ग प्रामुख्याने हिंदू होता.  आणि राजकीय सत्ता जरी त्यांना नसे, तरी आर्थिक तंत्रावर त्यांचीच सत्ता असे.  इतर कोणत्याही वर्गापेक्षा वरचे अमीर-उमराव, सरदार किंवा खालच्या खेड्यातील बहुजनसमाज यापेक्षा या लोकांचे मुसलमानांशी फार कमी संबंध येत.  जवळचे निकट संबंध जवळजवळ नसत.  जे मुसलमान बाहेरून आलेले असत ते सरंजामशाही वृत्तीचे असल्यामुळे दुकानदारीकडे कमीपणाने बघत.  व्याज घेण्याला इस्लामी धर्माप्रमाणे बंदी असल्यामुळे व्यापारउदीम हाती घ्यायला अडचण येई.  हे बाहेरचे मुसलमान स्वत:ला सत्ताधारी वर्ग म्हणून समजत.  आपण सरदार, उमराव अशा रीतीने ते राहात.  राज्यकारभारातील बड्या बड्या जागांवर ते असत, लष्करात हुद्देदार असत, जमिनीचे वतनदार असत.  दरबारात पुष्कळसे मौलवी असत.  धार्मिक किंवा इतर विद्यापीठे त्यांच्या ताब्यात असत.

मोगल काळात पर्शियन ही सरकार-दरबारी भाषा होती.  त्या भाषेत कितीतरी हिंदूंनी ग्रंथ लिहिले.  त्यातील काही ग्रंथ तर अजरामर आहेत.  तसेच मुसलमान पंडितांनीही संस्कृत ग्रंथांचे पर्शियनमध्ये तर्जुमे केले आणि हिंदीतही ग्रंथरचना केली.  मलिक मोहम्मद जायसी आणि अब्दुल रहीम खानखाना हे दोन हिंदी कवी विख्यात आहेत.  मलिक मोहम्मदचे 'पद्मावत' प्रसिध्द आहे.  अब्दुल रहीम हा अकबराच्या दरबारातील एक नामवंत सरदार होता.  अकबराचा पालनकर्ता जो बहिरामखान-त्याचा हा मुलगा.  खानखाना हा अरबी, संस्कृत, पर्शियन या भाषांत पारंगत होता.  त्याने लिहिलेली हिंदी कविता उच्च दर्जाची आहे.  काही काळ बादशाही सैन्याचा तो मुख्य सेनापती होता.  असे असूनही अकबराशी सारखा झुंजत राहणार्‍या, त्याला कधीही शरण न जाणार्‍या मेवाडच्या राणा प्रतापच्या गौरवपर व स्तुतिपर काव्य त्याने केले आहे.  समरांगणातल्या या शत्रूची उज्ज्वल देशभक्ती, धर्माने लढण्याचा बाणा व दिलदारपणा या गुणांची खानखाना याने प्रशंसा करून राणा प्रताप याचा फार गौरव केला.

प्रेमाने, उदारतेने हिंदूंची मने जिंकून घ्यायची ही अकबराची राजनीती होती.  यामुळे त्याच्या अनेक मंत्र्यांनी, सल्लागारांनी तेच धोरण उचलले.  अकबराचे रजपुतांवर प्रेम होते.  स्वत:मध्ये असलेले बेदरकार हिम्मत, इज्जतीची चाड, दिलदारी, इमान हे गुण त्याला त्यांच्यात दिसत, त्याने रजपुतांना आपल्या पक्षाला ओढून घेतले.  परंतु रजपुतांच्या अंगी कितीही थोरथोर गुण असले तरी त्यांची दृष्टी मध्ययुगीन होती.  मध्ययुगाचे ते प्रतिनिधी होते.  परंतु हे मध्ययुग भूतकालीन होत होते आणि नवीन शक्ती उदयाला येत होत्या. या नवीन शक्तींची जाणीव स्वत: अकबरालाही नव्हती.  कारण तो ज्या समाजात जन्मून लहानाचा मोठा झाला, त्या समाजाच्या परंपरागत कल्पनांचा तो स्वत: कैदी होता.

अकबराला मिळालेले यश आश्चर्यकारक होते.  उत्तर व मध्य हिंदुस्थानातील विविध प्रकारच्या जनतेत त्याने एकत्वाची भावना निर्माण केली.  परकी जातकुळीचे विदेशी राज्यकर्ते हे आहेत.  हा एक अडथळा नव्हता असे नाही.  धर्म, जाती यांचेही अडथळे या ऐक्याच्या मार्गात होते.  मुसलमानी धर्म इतरांना स्वधर्मात ओढणारा आणि हिंदुधर्म स्थाणुवत परंतु जोरदार प्रतिकार करणारा-असे हे अडथळे होते.  ते काही नाहीसे झाले नाहीत.  परंतु तरीही एकतेची भावना वाढली.  नुसते अकबराविषयीचे हे प्रेम नव्हते, ही वैयक्तिक आसक्ती नव्हती, तर त्याने जी टोलेजंग इमारत उभारली तिच्याविषयी लोकांना आपलेपणा वाटे.  जहांगीर व शहाजहान यांनी अकबराने निर्माण केलेले तंत्र मानले व त्याच्या मर्यादेतच ते वागले.  ते दोघेही काही मोठे अलौकिक पुरुष नव्हते.  तरीही त्यांच्या कारकीर्दी यशस्वी झाल्या; कारण अकबराने घालून दिलेल्या वाटेने ते गेले.  परंतु पुढें औरंगजेब आला.  तो या दोघांपेक्षा अधिक कर्तृत्ववान होता.  परंतु त्याच्या मनोरचनेचा साचा निराळाच होता.  अकबराचा रस्ता त्याने सोडून दिला व अकबराचे कार्य त्याने नाहीसे केले, परंतु संपूर्णपणे ते त्याला नाहीसे करता आले नाही.  औरंगजेब आणि त्याच्या मागून येणारे दुबळे, दीनवाणे बादशहा अशांच्या कारकीर्दी झाल्या, तरीही अकबराने उभारलेल्या त्या इमारतीविषयी लोकांना आदर व पूज्यभाव वाटे ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे.  ही भावना उत्तर व मध्य हिंदुस्थानापुरतीच मर्यादित होती.  दक्षिण व पश्चिम हिंदुस्थानापर्यंत पसरली नव्हती आणि म्हणून पश्चिम हिंदुस्थानकडूनच आव्हान आले.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to श्याम


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल