खाजगी छापखान्यांना सरकार उत्तेजन देत नव्हते. परंतु सरकारी कामकाज छापखान्याशिवाय चालणार नाही म्हणून कलकत्ता, मद्रास आणि अन्यत्रही सरकारी छापखाने सुरू करण्यात आले.
पहिला खाजगी छापखाना श्रीरामपूर येथे बॅप्टिस्ट मिशनर्यांनी सुरू केली. आणि पहिले वृत्तपत्र एका इंग्रजाने १७८० मध्ये कलकत्त्यास सुरू केले.
ह्या व अशाच प्रकारच्या गोष्टींनी हळूहळू हिंदी लोकांवर परिणाम होऊ लागला आणि 'अर्वाचीन' जाणीव येऊ लागली. युरोपियन विचारांचा प्रत्यक्ष परिणाम फारच थोड्या लोकांवर झाला, कारण पाश्चिमात्यांच्या तत्त्वाज्ञानापेक्षा हिंदी तत्त्वज्ञानच श्रेष्ठ आहे अशा समजुतीने हिंदी जनता त्यालाच चिकटून होती. पाश्चिमात्यांचा खरा परिणाम जर कोठे झाला असेल तर तो जीवनाच्या प्रत्यक्ष अंगावर. या बाबतीत पौर्वात्यांपेक्षा ते उघड उघड श्रेष्ठ होते. आगगाडी, छापखाना, दुसरी यंत्रे, युध्दातील नवीन परिणामकारक पध्दती या सर्व नवीन तंत्राकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते, आणि जुन्या विचारसरणीवर न कळत या सर्व गोष्टींचा हल्ला सुरू झाला आणि हिंदी लोकांच्या मनात उलटसुलट विचारांची गर्दी झाली. सर्वांत उघड व दूरवर पसरणारा फरक जमिनीच्या बाबतीत झाला. जुनी शेतीची पध्दती मोडली व खाजगी मालकीच्या, जमिनदारीच्या नव्या कल्पना रूढ झाल्या. पैशाचे अर्थशास्त्र आले, ''जमीन खरेदी-विक्रीची बाब बनली. रूढीने जे कडक होते ते पैशाने वितळून टाकले.''
हिंदुस्थानातल्या दुसर्या कोणत्याही भागाच्या आधी बंगालामध्ये हे सारे नवे जमिनीबाबतचे तसेच यांत्रिक व तांत्रिक, शैक्षणिक आणि बौध्दिक नवे प्रकार अनुभवावे लागले, कारण जवळजवळ पन्नास वर्षे ब्रिटिशांची सत्ता केवळ बंगालवरच होती. त्यामुळे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बंगालने ब्रिटिश हिंदी जीवनात महत्त्वाचा भाग घेतलेला आहे. बंगाल ब्रिटिश कारभाराचे प्राणमय केंद्र होता इतकेच नव्हे, तर इंग्रजी शिक्षण घेतलेले पहिलेवहिले हिंदी लोक येथेच प्रथम उदयाला आले आणि ब्रिटिश सत्तेच्या देखरेखीखाली ते हिंदुस्थानच्या इतर भागात पसरले. एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये काही नामांकित माणसे जन्मली. सांस्कृतिक आणि राजकीय बाबतीत त्यांनी सर्व हिंदुस्थानचे नेतृत्व केले, व त्यांच्या प्रयत्नामुळेच नवीन राष्ट्रीय चळवळीला शेवटी रंगरूप आले. ब्रिटिश सत्तेची बंगालला फार वर्षांची ओळख होती, एवढेच नव्हे, तर ज्या आरंभीच्या काळात ब्रिटिश राज्यव्यवस्थेची चौकट पक्की झाली नव्हती, जास्त स्वैर होती व सरकारी अंमल निर्दयपणे मन मानेल तसा चाले त्या काळाचाही त्याला भरपूर अनुभव होता. उत्तर आणि मध्य हिंदुस्थान ब्रिटिशांना शरण जाण्यापूर्वी कितीतरी आधीपासून बंगालने ब्रिटिश हुकमत मान्य केली होती, तिच्याशी जुळवून घेतले होते. १८५७ च्या बंडाची पहिली ठिणगी कलकत्त्याच्या जवळ डमडम येथेच चुकून पडली हे खरे, पण बंगालवर त्याचा परिणाम झाला नाही.
ब्रिटिश सत्तेच्या आधी मोगल साम्राज्याचा बंगाल हा पूर्वसीमान्त प्रांत होता. हा सुभा महत्त्वाचा असला तरी मध्य सत्तेपासून फार दूर होता. मध्ययुगाच्या आरंभीच्या काळात बंगाली हिंदूत नाना प्रकारचे भ्रष्ट पूजाप्रकार, तांत्रिक आचारविचार व तत्त्वज्ञान, शात्तच्पंथ इत्यादी अघोरी गोष्टींचा बुजबुजाट झाला होता. नंतर अनेक सुधारणा, चळवळी झाल्या. सामाजिक चालीरीतींवर, कायद्यांवर, एवढेच नव्हे, तर अन्यत्र मानण्यात येणार्या वारसाहक्कांवरही या चळवळीचे परिणाम झाले. चैतन्य म्हणून एक मोठा पंडित होता, तो पुढे भावनाप्रधान भक्तिमार्गी संत झाला. श्रध्देवर उभारलेला वैष्णव संप्रदाय त्याने स्थापिला. त्याचा बंगाली जनतेवर अपार परिणाम झाला आहे. बंगाली लोकांत उच्च बुध्दिमत्ता आणि प्रबळ भावनाविवशता यांचा अपूर्व संयोग होऊन तो वाढू लागला. बंगाल्यात प्रेममय भक्तिमार्ग व सर्वांभूती दया ठेवून त्यांची सतत सेवा करणे याची जी परंपरा चैतन्यापासून चालली त्या परंपरेतले एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चैतन्यासारखेच साधुवृत्तीचे थोर पुरुष रामकृष्ण परमहंस झाले. त्यांच्या नावाने रामकृष्ण मिशन म्हणून एक सेवासंस्था स्थापन झाली. समाजसेवा, भूतदयेचे काम या बाबतीतील या संस्थेचे कार्य केवळ अतुलनीय आहे. या संस्थेच्या शिक्षणसंस्था, दवाखाने हिंदुस्थानभर आणि हिंदुस्थानच्या बाहेरही असून कोठेही संकट आले, प्रलय झाला तर ते सेवेसाठी तेथे जातात. या संस्थेचे सभासद प्रेममय सेवेच्या ध्येयाने भारलेले आहेत व ख्रिश्चन धर्मातील फ्रॅन्सिस्कन साधुपंथ किंवा क्वेकर धर्माप्रमाणे त्यांचे हे उपयुक्त उद्योग मुकाट्याने, चोखपणे, देखाव्याचा भपका न करता चाललेले आहेत.