कोणत्याही गोष्टीच्या कल्पनेचे मूलतत्त्व शोधण्याकरता तिचे पृथक्करण करून सूक्ष्म भेदावरून वर्ग पाडण्यात भारतीय बुध्दीचे प्रावीण्य असामान्य होते. निरनिराळ्या कल्पना, विचार एवढेच नव्हे, तर जीवनातील नानाविध कार्ये यांची वर्गवारी करून प्रत्येकाला वेगवेगळ्या खण ठरविण्याचा एक तर्हेचा नादीपणा बुध्दीला आला होता. आर्यांनी समाजाचे चार भाग पाडून चातुरर्वर्ण्य निर्माण केले; परंतु एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. व्यक्तीच्या जीवनाचेही चार भाग करून त्यांना आश्रम अशी संज्ञा त्यांनी दिली. पहिला ब्रह्मचर्याश्रम; यात व्यक्तीचे शरीर, मन, बुध्दी यांची वाढ होत असता ज्ञानार्जन करून संयम, मनोनिग्रह, ब्रह्मचर्य यांची जोपासना करावयाची. दुसरा गृहस्थाश्रम; यात कुटुंब चालवून व्यवहार पाळावयाचा व संसार करावयाचा. तिसरा वानप्रस्थाश्रम; यात चतुरस्त्र व समतोल बुध्दी झालेल्या प्रौढांनी कसलीही अभिलाषा न करता लोककल्याणार्थ जनसेवा करावयाची. चौथा संन्यास; यात जगाच्या उलाढालीपासून निवृत्त असे जीवन घालवावयाचे असे. या चार आश्रमांची योजना अशी झाली की, त्यामुळे मनुष्यमात्रात ज्या दोन परस्परविरोधी वृत्ती म्हणजे भोग व त्याग असतात त्यांचा नीट समन्वय झाला. चिनातल्याप्रमाणे हिंदुस्थानातही ज्ञान, विद्या यांना समाजात फार मान असे. कारण श्रेष्ठ प्रतीची विद्वत्ता असली म्हणजे नुसते ज्ञानच नव्हे, तर नीतीही असावयाचा पाहिजे अशी अपेक्षा असे. विद्वानासमोर राजे-महाराजे, वीर-योध्दे सदैव नम्र असत. जे सत्ताधारी असतील ते संपूर्णपणे नि:स्वार्थी, निरहंकारी असू शकरणार नाहीत अशी जुनी भारतीय समजूत होती. सत्ताधार्यांचे स्वार्थ, वैयक्तिक आशाआकांक्षा यांचा सार्वजनिक कर्तव्यांशी संघर्ष यावयाचाच म्हणून ज्यांना संसाराची चिंता नाही, जे जीवनातील अवघड प्रश्नांचा अनासक्तपणे विचार करू शकतील अशा स्वतंत्र विचारवंतांच्या एका वर्गाकडे अंतिम श्रेयस्कर काय ते ठरविणे व न्यायनीतीचे पालन होणे आहे की नाही यात सावधान ठेवून दक्ष राहणे ही कर्तव्ये नेमण्यात आली. ज्ञानधनांचा, तपोधनांचा, तत्त्वज्ञान्यांचा हा वर्ग समाजाच्या शिरोभागी मानण्यात आला व सारे त्यांना मान देत. त्यांच्या खालोखाल जीवनाच्या प्रत्यक्ष घडामोडीत गुंतलेल्या सत्ताधीश राजांना, योध्दयांना मान असे. परंतु त्यांची सत्ता कितीही प्रबल असली तरी ॠषिमुनींचा मान त्यांना मिळत नसे. धनिकवर्गाला या क्षत्रिय वर्गापेक्षा कमी मान होता क्षत्रियवर्ण शिरोभागी नसला तरी त्याला मान देत, चीन देशातल्याप्रमाणे तो तिरस्कारार्ह मानला जात नसे.
अशा प्रकारची ही वर्णाश्रमव्यवस्था होती. काही अंशी अशीच वर्णव्यवस्था इतरत्रही आपणास दिसून येते. मध्यकालीन युरोपातील ख्रिश्चन धर्मात अशीच व्यवस्था दिसते. त्या वेळेस सर्व आध्यात्मिक, नैतिक बाबतीत, इतकेच नव्हे, तर शासनसंस्थेची मूलतत्त्वे कोणती असावीत या बाबतीतही रोमन चर्च जे सांगेल ते प्रमाण मानले जाई. व्यवहारातही पुढे पुढे असे झाले की, रोमन कॅथॉलिक धर्माधिकारी भौतिक सत्तेचेही अभिलाषी बनले, आणि धर्माचार्य हे हक्काने सत्ताधारीही बनले. हिंदुस्थानातील ब्राह्मणवर्ग विचारवंतांचा व तत्त्वज्ञान्यांचा पुरवठा करीत, परंतु विशिष्ट हक्काची एक भिक्षुकशाही त्यांनी निर्माण केली. आपल्या या विशिष्ट हक्कांना ते फार जपत व त्यांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नसली तरी ते प्रबल होते. परंतु या वर्णव्यवस्थेच्या तत्त्वात क्वचित थोडा फेरफार कोठे कोठे होऊनही त्या मूळच्या तत्वाचा भारतीय जीवनावर फार खोल परिणाम झालेला आहे व ब्राह्मण्याचा आदर्श म्हणजे ज्ञानसंपन्न, दयाळू, मूळ स्वभावाचा चांगला, संयमी व लोककल्याणाकरता अवश्य तो त्याग करण्यास समर्थ असणारा असे अद्याप मानतात. विशिष्ट मिरासदारी असणारे वर्ग ज्याप्रमाणे पूर्वी भ्रष्ट झाले त्याप्रमाणे ब्राह्मणही झाल्याची उदाहरणे आहेत व मिरासदार वर्गाचे सारे दुर्गुण त्यांच्यातही भूतकाली होते. कितीतरी ब्राह्मणांना ज्ञानाचा गंध नसे व सद्गुणांची ओळख नसे, असे असूनही लोक अद्याप त्यांना मानतात. जनतेमध्ये त्यांना अद्यापही खूप मान राहिला आहे; तो सत्तेच्या किंवा संपत्तीच्या जोरावर नसून ब्राह्मणवर्गात बुध्दिमान लोकांची अखंड परंपरा चालत आलेली नजरेत भरते व लोककल्याणार्थ त्यांनी केलेल्या सेवेचा व त्यागाचा इतिहास उज्ज्वल आहे म्हणून आहे. शतकाशतकात निर्माण झालेल्या नेतृत्वशाली व कर्तृत्ववान व्यक्तींमुळे त्या वर्गातील सर्वांचाच फायदा होई, परंतु मान ठेवला जाई तो वर्गामुळे नव्हे, व्यक्तीच्या गुणामुळे. कोणत्याही ज्ञानी व सदाचारी माणसाला सन्मान द्यावा अशी परंपराच होती. ब्राह्मणेतरांतच नव्हे, तर अतिशूद्र वर्गातील सज्जनसुध्दा या गुणांमुळे वंदनीय झाल्याची व कधी कधी संतपदवीला पोचल्याची अगणित उदाहरणे आहेत. जे अधिकारपदावर असत, ज्यांच्या हातात लष्करी सत्ता असे, त्यांना लोक भीत, परंतु त्यांना इतका मान कधी मिळाला नाही.