युध्द हिंदुस्थानाच्या जवळ येत चालले तेव्हा गांधींच्या मनाची मोठी गडबड उडाली.  युध्दामुळे उद्‍भवलेल्या नव्या परिस्थितीशी त्यांना अहिंसेचे धोरण व कार्यक्रम यांचा मेळ बसवणे सोपे नव्हते.  शत्रुसैन्य देशावर चाल करून आले तर त्या सैन्याविरुध्द लोकांनी किंवासमोरासमोर लढायला तयार झालेल्या सैन्यांनी सविनय कायदेभंगाचा उपयोग करावा अशी कल्पनाही विचारात घेण्यासारखी नव्हती.  काहीही न करता जे घडेल ते घडू द्यावे, शत्रूंना देश जिंकू द्यावा, हाही विचार तितकाच निरर्थक होता.  आता काय करायचे ?  त्यांच्या अगदी जिवाभावाचे नेहमीचे सहकारी व एकंदरीने सर्व काँग्रेसच अशा प्रसंगी किंवा देशावर आक्रमण झाल्यास सशस्त्र प्रतिकाराऐवजी पर्याय म्हणून अहिंसा पाळायला मुळीच तयार नव्हती, त्यांनी तसे स्पष्ट सांगितले होतेच.  अहिंसा सोडून देण्याचा त्यांना अधिकार आहे हे गांधींनीही स्वत:च शेवटी मान्य केले होते.  परंतु गांधींना व्हायचातो मनस्ताप झालाच, व त्यांच्या स्वत:पुरते, व्यक्ती म्हणून, कोणत्याही सशस्त्र कार्यक्रमात भाग घेणे त्यांना शक्यच नव्हते.  पण वस्तुत: गांधी म्हणजे नुसती एक व्यक्ती नसून त्यांची व्याप्ती अधिक होती.  स्वातंत्र्य मिळविण्याच्या राष्ट्रीय चळवळीत काँग्रेसमध्ये त्यांच्याकडे विशिष्ट पदाधिकारी असोत वा नसोत, लोकांची दृष्टी त्यांच्याकडेच असे, त्यांची सत्ता सर्वत्र चाले व त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारे लोक लाखो होते.

आपल्या देशातील लोकांचे, विशेषत: सामान्य जनतेचे मनोगत गांधीजी जितके जाणीत तितके जाणणारे पूर्वी किंवा हल्लीच्या काळात फार थोडे निघतील, कदाचित एकही निघणार नाही.  हिंदुस्थानभर, अगदी कोनाकोपर्‍यातूनसुध्दा त्यांनी खूप प्रवास केला होता, त्या वेळी त्यांचा लाखो लोकांशी प्रत्यक्ष संबंध आला होता, परंतु तेवढ्यामुळेच नव्हे, तर दुसराच काही एक गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांना त्या अफाट पसरलेल्या जनमनाच्या भावनांना स्पर्श करण्याचे साधले होते.  गांधीजी जनतेशी समरस होऊ शकत, जनमनीच्या भावनेने त्यांचे स्वत:चे मनही भरलेले असे, व जनतेला हे उमजलेले असल्यामुळे जनतेची त्यांच्यावर भक्ती जडली होती, त्यांचा शब्द खरा करायला जनता तत्पर असे.  तसेच पाहिले तर असे आढळले की, गांधीजींचे पूर्वायुष्य गुजराथेत गेलेले असल्यामुळे त्यांनी गुजराथचा दृष्टिकोण उचलला होता व सबंध देशाबद्दलची त्यांची मते काही अंशी त्या गुजराथी दृष्टीची बनली होती.  वस्तुत: गुजराथी समाज म्हणजे सामोपचाराने सर्वांशी जुळते घेणारा, मुख्यत्वे व्यापारी लोकांचा नरम समाज, त्या समाजावर जैन धर्माच्या अहिंसातत्त्वाची मोठी छाप बसलेली होती.  देशातील इतर प्रांतांतून ह्या अहिंसातत्त्वाची छाप गुजराथच्या मानाने फार कमी होती, काही काही भागात तर मुळीच नव्हती.  पूर्वकाळी जिकडे तिकडे देशभर पसरलेल्या योध्दयांच्या क्षत्रिय वर्गाने युध्दाच्या व मृगयेच्या विरुध्द ह्या अहिंसातत्त्वाचे मुळीच चालू दिले नाही, त्यांनी त्यांच्या लढाया व शिकारी चालू ठेवल्या हे नक्की.  क्षत्रियाखेरीज इतर वर्गांवर, ब्राह्मणवर्गावरसुध्दा, या अहिंसातत्त्वाचा परिणाम एकंदरीत फारच थोडा झाला होता.  परंतु भारतीय इतिहास कसा घडत गेला, भारतीय तत्त्वज्ञानाची उत्क्रांती कशी होत गेली, हे पाहताना गांधीजींनी त्या घटनांतून व तत्त्वांतून काही तत्त्वे निवडून काढण्याची दृष्टी ठेवली होती, व त्यांचे मत असे होते की, या भारतीय इतिहासाचा व तत्त्वज्ञानाचा पाया, त्यातले मूलतत्त्व म्हणजे अहिंसा, ते तत्त्व अनेक वेळी सुटून दुसरे मार्ग निघाले असले तरी मूलतत्त्व अहिंसा.  गांधीजींचा हा सिध्दान्त मूळच्या साधनातून फार ओढाताण करून काढलेला आहे असे दिसे व हिंदुस्थानातील अनेक विचारवंत तत्त्वज्ञान्यांना व इतिहासकारांना तो अमान्य होता.  मानवी जीवनाच्या सध्याच्या अवस्थेत ह्या अहिंसातत्त्वाचे गुणावगुण काय आहेत हा प्रश्न अगदी वेगळा, त्याच्याशी ह्या वादाचा संबंध येत नाही, पण गांधींच्या ह्या मतावरून ते इतिहास एका विशिष्ट दृष्टिकोणातून पाहात होते असे मात्र दिसते हे नक्की.

एखाद्या राष्ट्राचा मनोधर्म, राष्ट्राची स्वभाव-रचना, राष्ट्राचा इतिहास, इत्यादी राष्ट्रीय गुणविशेष वाढत जाऊन त्यांना निश्चित रूप येण्याच्या कामी त्या राष्ट्राला केवळ योगायोगाने जी भौगोलिक परिस्थिती प्राप्त झालेली असते त्या परिस्थितीचा प्रभाव फार परिणामी ठरतो.  बाकीचे जग व हिंदुस्थान यांच्यामध्ये एका बाजूला हिमालयाची प्रचंड तटबंदी, तर बाकीच्या बाजूला पसरलेले महासागर आडवे येत असल्यामुळे या देशातील लोकांची भावना हा सारा अफाट पसरलेला देश म्हणजे एक अखंड राष्ट्र आहे अशी होऊन बसली, परंतु याच भौगोलिक परिस्थितीचा आणी एक परिणाम असा झाला की, बाहेरच्या जगाशी आपल्याला काही कर्तव्य नाही, अशी एकलकोंडी वृत्ती या देशात वाढली.  या प्रचंड विस्तार असलेल्या भूप्रदेशातले मानवी जीवन सुसंस्कृत आचारविचार व कलाकौशल्याने समृध्द होत गेले.  त्या जीवनाला नाना प्रकारांनी बहुरंगी शोभा येऊन ते वेगवेगळ्या बाजूंनी वेगवेगळे दिसत असले तरी अंतर्यामी ते एकसूत्रीच होते. या जीवनपध्दतीवर नवे नवे संस्कार होऊन तिची प्रगती करायला उदंड विचार-संपत्ती तिला या देशात लाभली, तिचा प्रसार व्हायला ऐसपैस क्षेत्रही मिळाले, व हे सारे घडत असताना मूळच्या एक-संस्कृतीचा धागा मात्र चांगला बळकट एकसूत्री अखंड राहात गेला.  परंतु ह्या एकाच एकसूत्री संस्कृतीला देशाच्या वेगवेगळ्या भागांतून असलेल्या प्रदेशातील जमीन, डोंगर, नद्या यांच्या विविध रचनेमुळे अनेक रूपे आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel