हिंदुस्थानातील प्रवास
१८३६ सालच्या अखेरीस आणि १९३७ सालच्या आरंभीच्या महिन्यांत माझ्या दौर्यांना प्रचंड वेग चढत जाता जाता अखेर सारे तुफानी काम सुरू झाले. या अफाट देशभर एखाद्या झंझावाताप्रमाणे मी अहोरात्र सारखा प्रवास करताना क्वचित कोठे थांबत सारखा गरगर फिरत होतो. मला सगळीकडून सारखी निकडीची बोलावणी येत, कारण निवडणुकीच्या तारखा जवळ आल्या होत्या व वेळ फार मोजका उरला होता व निवडणुक जिंकून देणारा अशी माझी ख्याती झाली होती. बहुत करून मोटारने मी प्रवास करीत असे. कधी विमानही वापरले; मधून मधून आगगाडी. प्रसंगविशेष हत्ती, उंट, घोडे यांचाही उपयोग करावा लागला; परंतु फार थोडा वेळ, थोड्या अंतरापुरता. आगबोट, नाव, होडी यांनाही मी वगळले नाही. दुचाकीचाही क्वचित उपयोग केला. काही मजल पायीही केली. नेहमीच्या दळणवळणाच्या ठरलेल्या मार्गापासून दूरवर आजूबाजूला पडलेल्या ठिकणी जाण्याकरता चित्रविचित्र नानाविध वाहनांचा उपयोग करणे कधीकधी भाग पडे. बरोबर ध्वनिक्षेपक दोन होते, कारण एक बिघडला तर दुसरा असावा; त्यांच्याशिवाय या विराट सभांतून मला बोलणे मुश्किलीचेच झाले असते, आणि त्यांच्याशिवाय माझा आवाज टिकलाही नसता. ते ध्वनिक्षेपक माझ्यासमोर तिबेटच्या सरहद्दीपासून तो बलुचिस्थानच्या सीमेपर्यंत कुठल्या कुठल्या ठिकाणी फिरत होते. तेथे तोपर्यंत असले यंत्र कोणी कधी पाहिले तर नव्हतेच, पण अशा यंत्राची कोणाला वार्तासुध्दा नव्हती.
पहाटेपासून तो रात्रीचे बारा वाजेपर्यंत मी एका ठिकाणाहून दुसरीकडे सारखा धावपळ करीत जात होतो. सगळीकडे प्रचंड समुदाय ताटकळत बसलेले असत. ठरलेल्या सभास्थानाशिवाय पुन्हा ठिकठिकाणी थांबावे लागे. कारण शेकडो लोक दुरून दुरून माझ्या स्वागातासाठी म्हणून येऊन वाट पाहात बसलेले असत. या मधल्या थांबण्यामुळे ठिकठिकाणच्या ठरलेल्या वेळा साधता येत नसत व पुढच्या कार्यक्रमांना उशीर होई. परंतु या ठिकठिकाणी जमलेल्या गरीब बिचार्या लोकांची उपेक्षा करून त्यांना ओलांडून जाणे कसे शक्य असेल ? उशिरावर उशीर वाढत जाई. प्रचंड जनसमूहातून वाट काढीत सभास्थानी पोचण्यातही काही मिनिटे जायची; आणि पुन्हा परत येताना असाच वेळ मोडायचा. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे होते. मिनिटामागून अशी मिनिटे जात आणि त्यांचे तास होत. सायंकाळच्या सभेला शेवटी कितीतरी उशिरा जाऊन मी पोचत असे. परंतु लोक शांतपणे तासनतास बसून राहात. हिवाळा होता. सभा उघड्यावर असायच्या, लोकांच्या अंगावर कपडे नसायचे. थंडीत कुडकुडत ते बसून राहात. अशा रीतीने दिवसाचा जवळजवळ १८ तासांचा कार्यक्रम होई. शेवटचा मुक्काम मध्यरात्रीला कोठेतरी होई. कधी कधी मध्यरात्रही उलटून जात असे. एकदा कर्नाटकात तर कमालच झाली. फेब्रुवारी महिन्याच्या मध्याचे ते दिवस होते. आम्ही त्या दिवशी सीमोल्लंघन केले, स्वत:चा उच्चांक स्वत:च मोडला. त्या दिवसाचा कार्यक्रम भरगच्च होता, गर्दीचा होता. अतिसुंदर अशा डोंगराळ जंगलातून रस्ता होता. रस्ता फारसा चांगला नव्हता. नागमोडी होता. सारखी वाकणे-वळणे होती. त्यामुळे फार हळूच जावे लागत होते. आधी प्रचंड सभा झाल्या, लहान सभा वाटोवाट किती झाल्या त्यांची गणतीच नव्हती. सकाळी आठला कार्यक्रमाला सुरूवात झाली होती आणि शेवटची सभा पहाटे चारला झाली ! (ती सात तास वास्तविक आधी झाली पाहिजे होती) आणि त्यानंतर पुन्हा ७० मैलांचा प्रवास करून उरलेल्या रात्रीच्या म्हणून मुक्कामी आम्हाला जाऊन पोचायचे होते. त्या मुक्कामाच्या जागी उजाडत सात वाजता आम्ही पोचलो. दिवस रात्र मिळून ४१५ मैलांचा प्रवास आम्ही केला; वाटेतील सभा निराळ्या. चोवीस तासांतील तेवीस तास कार्यक्रम व प्रवास यातच गेले व दुसर्या दिवसाचा कार्यक्रम सुरू व्हायचा होता, तो एका तासावर येऊन ठेपला.
कोणी एकाने गणित करण्याचे श्रम घेऊन असा हिशेब केला की, जवळजवळ एक कोटी लोकांनी सभांतून माझा संदेश ऐकला. या संख्येत वाटेवरच होणार्या अचानक छोट्या सभांतील लोकांची संख्या मिळवली पाहिजे. लाखालाखांच्या विराट सभा कोठे भरत, वीस हजार तर नेहमीच असायचे. एखाद्या गावातून जाताना सारा गाव सुनासुना दिसे. चिटपाखरू दिसत नसे; दुकाने बंद असत याचे मला आश्चर्य वाटे. परंतु त्याचा उलगडा पुढे होई. गावातील झाडून सारे आबालवृध्द स्त्री-पुरुष जवळपास किंवा जरा दूर असलेल्या सभेसाठी निघून गेलेले असत व तेथे ते माझी वाट बघत बसलेले असत.
या सगळ्या धमालीत माझी प्रकृती एकदम ढासळली नाही कशी ते मला समजत नाही. तसे म्हटले तर हा एकंदर कार्यक्रम पार पाडणे म्हणजे शरीराने टिकून राहण्याचा चमत्कार करून दाखविणेच होते. शारीरिक सहनशक्तीची ती कमाल होती. मला वाटते माझ्या देहाने हळूहळू त्या बेताल जीवनाची सवय करून घेतली. दोन सभांच्या दरम्यान मोटारीतच अर्धातास जो मिळे तेवढ्यात मला गाढ झोप लागे. जागे होणेही मुश्किलीचे होई. परंतु दुसर्या सभेचे स्थान येताच मला जागे तर व्हावेच लागे. जयजयकार करणार्या जनसंमर्दांच्या जयघोषांनी मला जाग येई. मी शक्य तितक्या कमी वेळा जेवू लागलो व मधून मधून एखादे (विशेषत: सायंकाळचे) जेवण टाळू लागलो व त्यामुळे मला बरे वाटू लागले. परंतु माझी शक्ती टिकली व मला पुरेशी हुशारी राहिली याचे खरे कारण मी जाईन तेथे तेथे माझ्याभोवती आसमंतात भरून राहिलेला लोकांचा उत्साह व त्यांचे माझ्यावरचे प्रेम. मी जाईन तेथे तोच प्रकार आढळे. परंतु मला त्याचा सराव असा कधीच झाला नाही व रोज नव्याने मला त्या प्रकारचे आश्चर्य वाटे.