डॉ. एच. जी. कारिच वेल्स, शैलेंद्र ह्या दिग्विजयी महापराक्रमी वीरपुरुषाबद्दल लिहितात, ''पाश्चिमात्यांच्या इतिहासात नावाजलेल्या उत्तम सेनापतींनी मिळविलेल्या विजयाखेरीज अन्यत्र कोठेही ज्याच्या यशाला तोड नाही, ज्याची कीर्ती त्याच्या काळात सुध्दा इराणपासून चीनपर्यंत दुमदुमत होती, अशा ह्या दिग्विजयी महापुरुषाने दहा-वीस वर्षांत असे काही एक प्रबळ दर्यावर्दी साम्राज्य उभे केले की जे पुढे पाच शतके टिकले आणि त्यामुळेच जावा, कंबोडिया इत्यादी भागात भारतीय कलेचा व संस्कृतीचा अपूर्व विकास व बहर शक्य झाला.  परंतु आपल्या ज्ञानकोशातून आणि आपल्या इतिहासातून त्या विशाल साम्राज्याचा किंवा त्याच्या थोर संस्थापकाचा उल्लेखही शोधायला जाऊ तर सापडणार नाही....... असे एक साम्राज्य होते ही गोष्टही मूठभर प्राच्यविद्याविशारद सोडले तर फारशी कोणाला माहिती नाही.''**  या प्राचीन हिंदी वसाहतवाल्यांचे लष्करी पराक्रमही महत्त्वाचे आहेत; कारण हिंदी चारित्र्य व बुध्दिमत्ता यांचे खरे स्वरूप पुष्कळांना नीट समजलेले नाही, ते या पराक्रमामुळे समजते.  परंतु या लष्करी पराक्रमांपेक्षा जी विपुल व समृध्द संस्कृती त्यांनी तेथे उभारली, जी संस्कृती त्या वसाहतींतून आणि प्रदेशांतून एक हजार वर्षे टिकून राहिली, तिच फारच महत्त्व आहे.

ज्याला बृहद् भारत म्हणून म्हणण्यात येते, अशा या आग्नेय आशियातील विस्तृत प्रदेशाच्या इतिहासावर गेल्या पंचवीस वर्षांत पुष्कळच नवा प्रकाश पडला आहे.  अद्यापही मधले दुवे सांधायचे आहेत; काही कालखंड अद्याप अज्ञात आहेत; परस्परविरोधी माहितीही पुढे येत आहे; पंडित लोक परस्परविरोधी नाना तर्क लढवीत आहेत; नाना कल्पना मांडीत आहेत.
--------------------------
**  'अंग्कोरकडे' या पुस्तकातून (हर्रप १९३७) डॉ. एच. जी. कारिच वेल्सकृत.

परंतु सर्वसाधारण रूपरेषा आता स्वच्छ व स्पष्ट झाली आहे आणि काही काही कालखंडांतील तर अगदी सविस्तर माहिती भरपूर मिळाली आहे.  साधनांचा तोटा नाही.  हिंदी ग्रंथांतून उल्लेख आहेत, तसेच जुने लेख आहेत, ताम्रपट वगैरे साधनेही आहेत.  जावा आणि बाली द्वीपकल्पांत भारतीय गोष्टींवर व कथांवर आधारलेले विपुल वाङ्मयही आहे.  या वाङ्मयात भारतीय रामायण-महाभारतांचे आणि अन्य दंतकथांचे जवळजवळ भाषांतरच आहे.  ग्रीक आणि लॅटिन ग्रंथांतूनही काही माहिती उपलब्ध झाली आहे.  परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्राचीन शिल्पकलेचे भग्न स्थितीतील भव्य नमुने अंग्कोर आणि बोरोबुदूर येथील ते अवशेष तर आहेतच आहेत.*

ख्रिस्त शकाच्या पहिल्या शतकापासून हिंदी वसाहतवाल्यांच्या लाटाच्या लाटा पूर्वेकडे आग्नेयेकडे पसरल्या. सीलोन, ब्रह्मदेश, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्नियो, सयाम, कांबोडिया, इंडोचायना इत्यादी देशांत हे साहसी लोक गेले.  काही तर फोर्मोसा, फिलिपाइन बेटे, सेलिबिस येथपर्यंत जाऊन पोचले.  काही इकडे पश्चिमेकडे मादागास्करपर्यंत गेले.  इंडोने शियातील भाषाच थेट मादागास्करमध्ये चालते, तिच्यात संस्कृत शब्दांचेही मिश्रण आहे.  अशा रीतीने पसरायला हिंदी लोकांना कित्येक शतके लागली असतील; या सर्व ठिकाणी ते प्रत्यक्ष हिंदुस्थानातूनच गेले असतील असे नाही, मध्यंतरीच्या प्रदेशांतून गेले असतील.  पहिल्या शतकापासून तो इ.स. ९०० पर्यंत वसाहती स्थापण्याच्या चार मुख्य लाटा येऊन गेल्या असे दिसते, आणि त्यांच्या दरम्यानही लोकांचे प्रवाह जातच असावेत.  अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या सार्‍या प्रयत्नांमागे राज्यसत्ता होती.  एकाच वेळेस दूरदूर पसरलेल्या वसाहती सुरू करण्यात आल्या.  पुन्हा या सर्व वसाहती मोक्याच्या व मार्‍याच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या व्यापारमार्गावर आहेत.  या वसाहतींना दिलेली नावे संस्कृत आहेत.  कांबोडियाचे नाव कांबोज असे होते.  कांबोज हे प्राचीन हिंदुस्थानातील प्रसिध्द शहर हल्लीच्या अफगाणिस्थानात म्हणजे त्या वेळच्या गांधार देशात काबूलच्या खोर्‍यात होते.  ज्या वेळेस ही वसाहत वसविण्यात आली त्या वेळेस गांधार आर्यदेशाचा, आर्यन भारताचा महत्त्वाचा घटक असला पाहिजे ही गोष्ट स्पष्ट होते.  यावरून वसाहतकाळाचा अंदाज करता येतो.
---------------------
*  डॉ. आर. सी. मजुमदार यांच्या 'अतिपूर्वेकडील प्राचीन हिंदी वसाहती' (कलकत्ता, १९२७) आणि 'स्वर्णद्वीप' (कलकत्ता, १९३७) या पुस्तकांतील हे संदर्भ आहेत.  तसेच ग्रेटर इंडिया सोसायटी (कलकत्ता) यांची प्रकाशने पाहावीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel