माझे मत ट्रॅक्टरसारखी यांत्रिक शेतीची अवजारे, मोठी यंत्रसामग्री वापरावी असे आहे, आणि माझी अशी खात्री झाली आहे की, शेतीच्या धंद्यात झालेली गर्दी कमी करण्याकरिता दारिद्र्य कमी करून लोकांचे राहणीचे मान वाढविण्याकरिता, देशाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अवश्य ती सामग्री तयार करण्याकरिता व अशा इतर अनेक उद्देशांनी देशात यंत्राच्या साहाय्याने झपाट्याने उद्योगधंद्यांची वाढ करणे अवश्य आहे.  पण त्याचप्रमाणे माझी अशीही खात्री झाली आहे की, या यांत्रिकीकरणापासून होणारा लाभ पुरा आपल्या पदरात जाडून घ्यावयाचा असला व त्यात असलेले अनेक धोके टाळावयाचे असले तर अगदी जपूर योजना केली पाहिजे, त्याकरिता अवश्य ते फेरफार करून नीट जम बसविला पाहिजे, तसे झाले तरच उपयोग.  चीन व हिंदुस्थानसारखे स्वतंत्र जुनी परंपरा उद्याप भरभक्कम कायम असलेले परंतु देशाची सर्वांगीण वाढ काही ऐतिहासिक कारणामुळे खुंटलेले जे देश आहेत, त्यांतून आजच्या स्थितीला या असल्या योजनांची फारच गरज आहे.

चीनमध्ये चालू असलेल्या 'उद्यांगधंद्यांच्या सहकारी संस्था' मला विशेष आवडल्या व मला असे वाटते की, अशा तर्‍हेच्या संस्था हिंदुस्थानला फार विशेष सोयीच्या आहेत.  हा प्रकार हिंदुस्थानातील पार्श्वभूमीशी जमेल, त्यामुळे लहान लहान धंद्यांतून लोकशाहीच्या पायावर प्रगती करता येईल, व लोकांना सहकार्याची सवय लागेल.  मोठमोठ्या कारखान्यांना जोड म्हणून ह्या प्रकाराचा उपयोग होईल.  हिंदुस्थानात प्रचंड कारखान्यांची वाढ कितीही झपाट्याने झाली तरी लहानसहान खेडोपाड्यांतून करता येण्याजोग्या हस्तव्यवसायाच्या धंद्यांना वाटेल तेवढे भरपूर क्षेत्र मोकळे राहणारच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.  खुद्द रशियात मालक तोच कारागीर या प्रकारे चालविलेल्या अनेक धंदेदुकानांच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांना देशाच्या उद्योगधंद्यांच्या वाढीत महत्त्वाचा भाग घेता आला आहे.

यांत्रिक शक्तीसाठी विजेचा उपयोग वाढत चालला आहे, त्यामुळे लहान प्रमाणावर चालविलेल्या धंद्यांची वाढ सुलभ होते व अशा छोट्या धंद्यांना, आर्थिक दृष्ट्या, मोठ्या धंद्यांशी चढाओढ करणे शक्य होते.  शिवाय मोठे कारखाने एकाच ठिकाणी वाढवीत बसण्यापेक्षा ते अनेक ठिकाणी पांगून असावेत असे पुष्कळांचे मत होत चालले आहे.  प्रत्यक्ष हेन्री फोर्ड याचेही असेच मत आहे.  प्रचंड यांत्रिक कारखान्यांनी गजबजलेल्या मोठ्या शहरातून राहावे लागल्यामुळे खेडेगावाची शेतीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागेनाशी होते व ह्या हानीमुळे मानसशास्त्रदृष्ट्या व प्राणिजीवनशास्त्रदृष्ट्या मनुष्याला अशा राहणीत जे अनेक धोके आहेत ते हल्ली विज्ञानशास्त्रज्ञ दाखवून देऊ लागले आहेत.  काही शास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की, खेडेगावातून राहून काळीची मोकळी माती माणसाच्या अंगाला लागत राहिली तरच मानववंश टिकणार, म्हणून मानववंश जगण्याकरता खेडेगावात राहून धरणीमातेच्या मांडीवर लोळणे अवश्य आहे.  लोकवस्ती विरळ पांगून राहून जमिनीशी दाट संबंध राखूनही आधुनिक सुधारणा व संस्कृती यात असलेल्या सुखसोयींचा उपभोग घेणे आजकालच्या शास्त्रीय शोधांमुळे उपलब्ध झालेल्या साधनांमुळे शक्य झालो आहे हे एक सुदैवच म्हणायचे.

शास्त्रीय व आर्थिक दृष्ट्या हे सारे जे काय असेल ते असो, पण अलीकडच्या काळात गेली काही दशक वर्षे हिंदुस्थानात आमच्यापुढे प्रश्न आहे तो असा की, आहे त्या परिस्थितीत, परकीय सत्तेचे व त्याबरोबरच त्या सत्तेच्या हितसंबंधी गोतावळ्यांचे जोखड मानगुटी बसलेले असताना, देशातल्या सर्वसामान्य जनतेत पसरलेले दारिद्र्य हटवावे कसे, स्वावलंबनाची स्वत:च्या बळावर काही उद्योग करण्याची वृत्ती या जनतेत आणावी कशी?  कोणताही काळ घेतला तरी, हस्तव्यवसायाचे छोटे धंदे खेडोपाडी चालविण्याच्या बाजूने पुष्कळ समर्थन करता येण्याजोगे आहेच, पण त्यातल्या त्यात आमची जी देशातली परिस्थिती होती ती पाहता निव्वळ व्यवहार दृष्टीने आम्हाला करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे हे छोटे धंदेच होते.  आम्ही हा उपक्रम चालविताना ज्या रीतीने चालविला ती रीत सर्वोत्तम किंवा सगळ्यांत सोईची नसेलही.  तो सारा प्रश्न फार मोठा, कठीण व गुंतागुंतीचा होता, व आम्हाला वेळोवेळी सरकारच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागत होते.  आम्हाला वेगवेगळे प्रयोग करीत राहून त्यात ज्या चुका होतील त्यांचा अनुभव घेतघोत हळूहळू शहाणे होण्याचा मार्ग काय तो मोकळा होता.  आरंभापासूनच सहकारी संस्थांवर आम्ही भर देऊन त्यांना उत्तेजन दिले असते व घरोधरी खेड्यापाड्यातून वापरता येण्याजोग्या छोट्याछोट्या यंत्रांत सुधारणा करण्याच्या दृष्टीने यंत्रविद्या व विज्ञानशास्त्र यांतील तज्ज्ञांचे साहाय्य जास्त घेतले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.  आता ह्या ग्रामोद्योग संस्थांमधून सहकारी तत्त्व अमलात आणले जात आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel