त्यांनी एक पत्रक काढून या शिक्षणाधिकार्‍यांना सुनावले की, ''आधिभौतिकवाद किंवा जडवाद आम्हाला माहीत आहे, ही काही नवीन गोष्ट नाही आणि आमच्यातील संप्रदायाने तर जडवादाचे दर्शनच बनविले  आहे.''**

या सर्व प्रकारावरून अध्यात्मात शिरणे म्हणजे एकंदरीत धोक्याचे आहे असे बुध्द म्हणत त्याची सत्यता दिसून येते.  परंतु मानवी मनाला स्वत:चा एक तुरुंग निर्मून त्यात कैदी म्हणून राहायला आवडत नसते.  स्वत:च्या शक्तीपलीकडे असलेल्या ज्ञानाचे फळ चाखण्यासाठी त्याची अखंड धडपड सुरू असते.  बौध्द तत्त्वज्ञानात अध्यात्माचीही वाढ झाली, परंतु पध्दती मानसशास्त्रीय होती.  तसेच मन कोणत्या निरनिराळ्या दशांतून जात असते, मनाचे गुणधर्म काय, हे सर्व शोधून काढण्यातील त्यांची अंतदृष्टी अपूर्व आहे.  अर्वाचीन मानसशास्त्रातील सुप्त मनाची त्यांना स्वच्छ कल्पना होती.  त्याची त्यांनी चिकित्साही केली आहे.  प्राचीन ग्रंथातील एक अद्‍भुत उतारा मला दाखविण्यात आला.  अर्वाचीन मानसशास्त्रातील ईडिपस काँप्लेक्स प्रकाराशी तेथे मला साम्य आढळते.  अर्थात प्राचीन मार्ग निराळ्या रीतीने तेथे येऊन दाखल झाला आहे.

बौध्दधर्मातील तत्त्वज्ञानाचे एकूण चार संप्रदाय आहेत.  हीनयान पंथात दोन आहेत आणि दोन महायान पंथात.  ही सारी बुध्ददर्शने उपनिषदांतील विचारातूनच निघाली आहेत, परंतु बौध्द वेदांना मानीत नाहीत.  त्याच काळात झालेल्या हिंदु तत्त्वज्ञानापासून बौध्द तत्त्वज्ञान वेदप्रामाण्य न मानल्यामुळे वेगळे पडले.  वेदप्रामाण्य मानणारी हिंदू
--------------------------
**  प्राध्यापक स्ट्चरबात्स्की हे या विषयातील अधिकारी पुरुष आहेत.  निरनिराळ्या भाषांतील मूळचे सर्व ग्रंथ त्यांनी पाहिले आहेत.  तिबेटी भाषेतीलही मूळ ग्रंथ त्यांनी पाहिले आहेत.  आणि अभ्यासानंतर त्यांनी आपले असे मत दिले आहे की, बौध्दधर्मीय तत्त्वज्ञानातील शून्यता म्हणजे सापेक्षतावाद होय.  सारे सापेक्ष व परस्परावलंबी असल्यामुळे निरपेक्ष असे काही नाहीच, म्हणून ते शून्य.  तसेच उलटपक्षी या दृश्य सृष्टीपलीकडे काहीतरी आहे; ते या सृष्टीतही भरून आहे.  तसेच निरुपाधिक तत्त्व या सान्त आणि कल्पनागम्य जगातील शब्दांनी त्याचे वर्णन करणे अशक्य आहे.  म्हणून त्याला 'तथात्व' असे नामाभिधान देण्यात आले आहे.  या 'तथात्वाचे', या निरुपाधिक तत्त्वाचे 'शून्यता' या संज्ञेनेही वर्णन केलेले आहे.

दर्शनेही श्रुतिवचन निरपवाद मानतातच असे नाही.  वेदप्रामाण्याची घोषणा करीत ते वेदांकडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या बुध्दीला पटेल तिकडे जाताना दिसतात.  मागून येणार्‍यांना यातील एखादा विचार घेऊन, त्यावरच जोर देऊन निराळे दर्शन उभे करता येत असे. *

या चार संप्रदायांत बौध्दधर्मीय विचाराची कसकशी वाढ झाली, त्याचे तार्किक पर्यवसान कसे झाले याचे आचार्य राधाकृष्णन यांनी विवेचन केले आहे.  ते म्हणतात, ''आरंभी येथे द्वैतवाद होता.  ज्ञान म्हणजे वस्तूंचे प्रत्यक्ष भान असे प्रथम समजत.  परंतु पुढे वस्तू लोपल्या, वस्तूसंबंधीच्या कल्पना ज्या आपणांस असतात, त्यांतून आपणास यथार्थता कळते असे मत प्रतिपादण्यात आले.  आपली बुध्दी आणि हे वस्तुजात यांच्यामध्ये असा हा कल्पनांचा पडदा उभा केला गेला.  हीनयान पंथी तत्त्वज्ञानात असे हे दोनच टप्पे आहेत.  परंतु महायान पंथ आणखी पुढे गेला.  कल्पनांच्या पाठीमागे असणार्‍या वस्तुजाताचे अस्तित्व न मानता ते पार सोडून देऊन सारा अनुभव म्हणजे मनातील नाना कल्पनांची एक साखळी असे सांगण्यात आले.  येथेच सापेक्षतेची व सुप्त आत्म्याची कल्पनाही आली आहे.  बौध्दधर्मीय तत्त्वज्ञानातील हा तिसरा टप्पा होता, आणि शेवटचा टप्पा म्हणजे नागार्जुनाच्या माध्यमिक तत्त्वज्ञानाचा, मन म्हणजेही एक कल्पनाच असे सांगण्यात आले.  म्हणजे शेवटी असंबध्द अशा काही कल्पना व अनुभव एवढेच शिल्लक राहतात.  परंतु त्यांच्या बाबतीत निश्चित असे आपणांस काहीच सांगता येणार नाही, ते अशक्य आहे.''

अशा रीतीने मानसशास्त्रीय व मानसिक पृथक्करण पध्दतीने जरी आपण शून्यावर येऊन पोहोचलो, ते अतीन्द्रिय तत्त्व केवळ शून्य किंवा केवळ चिन्मय (शब्दच वापरायचे झाले तर असेच काहीतरी वापरायचे) असे जरी ठरले,
------------------
* ''पाचव्या शतकात पूर्वीची सारी मते व परंपरा एकत्र संग्रहित करण्यासाठी वसुबंधूने जो अभिधर्मकोश रचना, त्यात हा उतारा आहे.  मुळातील संस्कृत ग्रंथ नष्ट झाला आहे परंतु चिनी आणि तिबेटी भाषांतून त्याची भाषांतरे आहेत.  चिनी भाषान्तर प्रसिध्द प्रवासी ह्युएनत्संग याने केलेले आहे.  या चिनी भाषान्तरावरून पुढे एक फ्रेंच भाषान्तर १९२६ मध्ये प्रसिध्द झाले.  अहमदनगरच्या किल्ल्यातील माझे सहकारी स्नेही आचार्य नरेन्द्र देव फ्रेंचमधून त्याचा हिंदीत अनुवाद करीत आहेत व इंग्रजीतही एक करीत आहेत.  सदरहू उतारा त्यांनी मला दाखविला.  तिसर्‍या प्रकरणात तो आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel