हिंदुस्थानात फेरबदल होऊ लागले. नव्या प्रेरणांमुळे कला, वास्तुशास्त्र आणि इतर सांस्कृतिक अंगोपांगे यांच्यात नवजीवन संचरू लागले. तसेच पाहिले तर हा सारा परिणाम अखेर दोन जुनाट संस्कृतींच्या संगमामुळे होऊ लागला. वास्तविक हिंदी संस्कृती आणि मोगलांबरोबर आलेली इस्लामी संस्कृती दोहोंतही आरंभीचा रसरशीतपणा व नव्याची स्फूर्ती नाहीशी झाली होती. दोन्ही संस्कृती वज्रलेप झालेल्या होत्या, त्यांचे ठराविक साचे होते, ठराविक प्रकार होते. हिंदी संस्कृती फार पुरातन आणि श्रांत झालेली होती. अरबी-इराणी संस्कृतीचा परमोच्च विकास होऊन गेलेला होता आणि उतरती कळा लागली होती. अरबांमधील ती आरंभीची जिज्ञासा, बौध्दिक साहस हे सारे नाहीसे झाले होते. असे असूनही या दोन जुन्यापुराण्या संस्कृतींच्या भेटीतून पुन्हा नवीन भरारी दिसून आली.
बाबर मोठा उमदा पुरुष होता. त्याच्याविषयी एक प्रकारचे आकर्षण वाटते. युरोपात संस्कृतीचा पुनरुज्जीवन काल आला होता त्या काळातल्या राजांच्या नमुन्याचा तो धाडशी, हिम्मतबहादूर व कला, वाङ्मय, खाणेपिणे यांचा षोकीन होता. परंतु या आजोबांपेक्षा त्याच्या नातवाकडे अधिकच लक्ष जाते. अकबराच्या अंगी अधिक थोर गुण होते. साहसी, बेडर आणि कुशल असा तो सेनानी असूनही सौम्य आणि दयाळू होता. ध्येयवादी आणि स्वप्नसृष्टीत वावरणारा असूनही तो स्वत: पराक्रम प्रत्यक्ष करून दाखविणारा, अनुयायांना स्वामिभक्तीचा छंद लावणारा थोर नेता होता. तो महान योध्द होता आणि मोठमोठे प्रदेश त्याने जिंकले. परंतु या विजयाहून अधिक चिरपरिणामी आणि संस्मरणीय असे विजय त्याला मिळवायचे होते. त्याच्या दरबारातील पोर्तुगीज जेसुइट लोकांनी, ''उन्हात चमकणार्या समुद्राप्रमाणे त्याचे डोळे चमकत'' असे वर्णन करून ठेवले आहे. अकबराचे ते डोळे दुसर्यांस जिंकून घेत. अखंड भारताचे ते प्राचीन स्वप्न, केवळ राजकीय दृष्ट्याच एक नव्हे, तर सर्वस्वी एकजीव राष्ट्राची कल्पना त्याच्यात साकार झाली.
पन्नास वर्षांच्या स्वत:च्या दीर्घ कारकीर्दीत इ.स. १५५६ पासून पन्नास वर्षे या ध्येयासाठीच तो धडपडला. कोणापुढेही मान व वाकवणारे, शरण न जाणारे कितीतरी अभिमानी रजपूत राणे अकबराने आपल्या बाजूला वळवून घेतले. रजपूत राजकन्येशी त्याने विवाह केला. त्याच्या मुलाच्या-जहांगीरच्या अंगात निम्मे हिंदू रक्त होते, निम्मे मोगल रक्त होते. जहांगीरचा मुलगा शहाजहान याची आई हिंदूच होती. अशा रीतीने तुर्की-मोगल असे हे घराणे तुर्की-मोगल असण्यापेक्षा आधिकाधिक हिंदीच होत गेले.
अकबराला रजपुतांचे मोठे कौतुक होते, त्यांच्याविषयी त्याला आपलेपणा वाटे. लग्ने करून आणि इतर धोरणांनी त्याने त्यांची पक्की मैत्री जोडली आणि त्यामुळे त्याच्या साम्राज्याला फार बळकटी आली. पुढील कारकीर्दीतूनही मोगल-रजपूत सख्य राहिले आणि त्याचा परिणाम राज्यकारभार, सरकार, लष्कर यांच्यावरच नुसता झाला असे नाही, तर कला, संस्कृती, जीवनाचे प्रकार यांच्यावरही झाला. मोगली सरदार अधिकाधिक हिंदी झाले आणि रजपूत व इतर सरदार यांच्यावर इराणी संस्कृतीचे संस्कार झाले.
अकबराने अनेकांना आपल्या पक्षाला वळवून तेथे त्यांना टिकविले. परंतु अकबराला परधर्मी विजयी वीर मानणारा व अशा राजाचे नुसते शब्दानेसुध्दा स्वामित्व पत्करण्यापेक्षा रानावनात पाठलाग होत असताना हालअपेष्टांत सारा जन्म काढणारा मेवाडचा राणा प्रताप ह्याच्या मानधन, अजिंक्यवृत्तीपुढे त्याला हार खावी लागली.