डरायसच्या ताब्यातील हिंदी प्रांत त्याच्या साम्राज्यातील सर्वांत समृध्द व अधिक लोकसंख्या असलेला होता.  अर्वाचीन सिंधप्रमाणे त्या वेळचा सिंध रूक्ष नव्हता.  हिंदी लोकसंख्या किती दाट होती, आणि डरायसला काय खंडणी दिली जात असे हे हिराडोटसने लिहून ठेवले आहे.  तो म्हणतो, ''आपल्या माहितीच्या सर्व देशांच्या लोकसंख्येहून हिंदी लोकसंख्या अधिक आहे आणि म्हणून ते जो करभार देतात त्याचे प्रमाणही त्या मानाने सर्वांहून अधिक आहे.  जवळजवळ ३६० सोन्याच्या टॅलेंट ते देतात. (आजकालचे १० लाख पौंड)  पर्शियन सैन्यात हिंदी सैन्यविभागही होता.  रथी, घोडेस्वार आणि पदाती ही तीनच अंगे हिंदी विभागात होती असेही हिराडोटसने लिहिले आहे.  पुढे नंतरच्या काळात हत्तींचाही उल्लेख येतो.

ख्रि. पूर्व सातव्या शतकाच्या जरा आधीपासूनच पुढे पुष्कळ शतकेपर्यंत पर्शिया आणि हिंदुस्थान यांच्या दरम्यान व्यापारी देवघेव असल्याचे काही पुरावे आहेत.  विशेषत: इराणी आखातामार्फत बाबिलोनशी फार प्राचीन काळापासून व्यापार होता.*  पुढे सायरस आणि डरायस यांच्या स्वार्‍यांमुळे प्रत्यक्ष संबंध ख्रि.पूर्व सहाव्या शतकापासून अधिकच येऊ लागले.  अलेक्झांडरने इराण जिंकून घेतला, आणि पुढे बराच काळ ग्रीकांचीच सत्ता तेथे होती.  हिंदुस्थानशी संबंध चालूच राहिला, आणि असे म्हणतात की, पार्सिपॉलिसच्या शिल्पाचा अशोकाच्या वास्तुनिर्मितीवर परिणाम झालेला होता.  हिंदुस्थानच्या वायव्य भागात आणि अफगाणिस्थानात जी ग्रीको-बुध्द कला विकसली, तिच्यात इराणी छटाही होती.  इसवी सनाच्या चौथ्या आणि पाचव्या शतकात हिंदुस्थानात गुप्त राजवटीतील कलांचा सुवर्णकाल होता, कलात्मक आणि सांस्कृतिक चळवळी भरपूर चालू होत्या, त्याही काळात इराणशी संबंध सुरूच होते.

काबूल, कंदाहार, सीइस्तान हे जे सीमाप्रान्त पुष्कळदा राजकीय दृष्ट्या हिंदुस्थानचेच भाग होते, तेथे हिंदी आणि इराणी लोकांची गाठ पडे.  नंतरच्या पार्थियन काळात या भागाला श्वेत हिंदुस्थान असेही नाव होते.  फ्रेंच महापंडित जेम्स दार्मेस्तेलर हा या प्रदेशांना उद्देशून म्हणतो, ''या प्रांतातून हिंदू संस्कृती चालू होती; ख्रिस्तपूर्वीच्या दोन शतकांत आणि नंतरच्या दोन शतकांत या प्रदेशांना श्वेत हिंदुस्थान अशी संज्ञा होती.  मुसलमानांनी हे प्रदेश जिंकून घेईपर्यंत हे प्रदेश इराणी म्हणण्यापेक्षा हिंदी होते असेच म्हटले पाहिजे.''
-----------------------
*  प्रो. ए. व्ही. वुइल्यम जॅक्सन, केंब्रिज, हिंदुस्थानचा इतिहास, भाग पहिला/ पृष्ठ ३२९.

उत्तर हिंदुस्थानात बाहेरून जे प्रवासी येत ते खुश्कीच्या मार्गाने येत.  दक्षिण हिंदुस्थान समुद्रावर अवलंबून होता.  दर्यावर्दी व्यापारामुळे त्याचे इतर देशांशी संबंध येत.  इराणातील सस्सनद राजे आणि दक्षिणेकडील चालुक्य राजे यांचे वकील एकमेकांच्या दरबारात असत.

तुर्की, अफगाण आणि मोगल स्वार्‍यांमुळे हिंदुस्थानचे मध्य-पश्चिम आशियाशी अधिकच झपाट्याने संबंध येऊ लागले.  युरोपात पंधराव्या शतकात नवयुगाचा उदय होत असताना इकडे समरकंद, बुखारा व टापूत तैमुरी नवयुग भरभराटीत होते.  या तैमुरी नवयुगावर इराणची छाप चांगलीच होती.  बाबर हा तैमूरच्याच कुळातला, तेथलीच संस्कृती घेऊन आला, आणि पुढे दिल्लीच्या सिंहासनावर बसला.  सोळाव्या शतकाच्या आरंभी ही गोष्ट झाली.  त्या वेळेस इराणमध्ये सफवी राजघराणे होते.  त्या काळात इराणमध्ये कलांचे पुनरुज्जीवन झाले.  इराणी कलेचे सुवर्णयुग असे या काळाला म्हणतात.  बाबरचा मुलगा हुमायून सफवी राजाकडेच आश्रयार्थ गेला होता व त्याच्याच मदतीने तो हिंदुस्थानात परत आला.  मोंगल सम्राटांनी इराणशी निकट संबंध ठेवले होते आणि सरहद्दीपलीकडून विद्वान, कलावान लोकांचा प्रवाह दिल्लीच्या वैभवशाली सम्राटांच्या दरबारात संपत्ती आणि कीर्ती मिळविण्यासाठी सारखा येत राहिला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel