हिंदुस्थान देशातील प्रश्नांचा (मग ते प्रश्न आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, कृषिविषयक, जातीय किंवा हिंदी संस्थानांबाबत किंवा इतर कोणतेही असले तरी) विचार करताना आपल्या विचारसरणीला मुख्य अडचण पडते ती आपण त्या प्रश्नांचे उत्तर चालू परिस्थितीच्या चौकटीत बसविण्याच्या दृष्टीने विचार करतो म्हणून पडते.  ह्या चालू स्थितीच्या चोकटीत व त्या चौकटीचे भाग बनलेले निरनिराळे हक्क व विशेष अधिकार जसेच्या तसे अबाधित ठेवून, हे प्रश्न सोडवू म्हटले तर ते शक्य नाही.  परिस्थितीची निकड लागली म्हणून वेळ निभावून नेण्यापुरती काहीतरी ठिगळ जोडल्यासारखी तोड या प्रश्नावर तात्पुरती निघाली तरी ती काही फार काळ टिकत नाही, आणि ती टिकणे शक्यही नाही.  जुने प्रश्न कायमच राहतात आणि त्यांच्या भरीला नवे प्रश्न किंवा जुन्या प्रश्नांची नवी रूपे येऊन पुढे उभी राहतात.  या प्रश्नांची उत्तरे चालू परिस्थितीच्या चौकटीत बसतील अशीच शोधण्याची दिशा आमच्या विचारांना लागते याचे कारण आतापर्यंतची परंपरा व जुनी सवय तशी आहे हे एक अंशत: आहेच, पण राजकीय आर्थिक, सामाजिक, औद्योगिक वगैरे विविध प्रकारच्या जीवनाच्या दृष्टीने हिंदी जीवनाला डोलारा जो अगदी खिळखिळा झाला आहे, त्याला कसेबसे एकत्र उभे ठेवणारी जी ब्रिटिश सरकारची पोलादी चौकट आहे तिच्यामुळेच, खरे म्हणजे आमच्या विचारांना ही दिशा लागते.

हिंदुस्थानात असलेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा भिन्न भिन्न क्षेत्रांतील अनेक विरोधी गोष्टींचा परस्परविरोध या युध्दामुळे अधिक स्पष्ट झाला आहे.  राजकीय क्षेत्रात पाहू गेले तर देशाच्या स्वातंत्र्याची भाषा खूप अघळपघळ चालते, पण ती नुसती बोलण्यापुरतीच, कारण हल्लीच्या काळी चालली आहे इतकी हुकूमशाही व इतकी विस्तृत व तीव्र दडपशाही पूर्वी कधीच चालली नव्हती, आणि पुढे जे काही घडणार ते अर्थातच आज जे काही घडते आहे त्यातूनच निघणार.  आर्थिक क्षेत्रात पाहिले तर ब्रिटिश अर्थसत्तेचे बंधन आज हिंदुस्थानावर पूर्ण आहे, पण हिंदी अर्थव्यवस्थेच्या वाढत्या विस्ताराचा ताण त्या बंधनावर सारखा पडतो आहे, ते बंधन हिंदी अर्थव्यवस्था तोडू पाहते आहे.  हिंदी समाज पाहावा तर देशात दुष्काळ व जिकडे तिकडे दैन्य पसरले आहे, पण त्याच्या उलट काही काही ठिकाणी भांडवलाचा संचय वाढतो आहे.  देशात दारिद्र्याच्या जोडीला श्रीमंतीही दिसते आहे, विनाशबरोबरच विकासही चालला आहे, बेकी वाढते आहे तशीच एकीही वाढते आहे, जुन्यापुराण्यामताशेजारी नवे पुरोगामी विचारही आढळतात.  कितीतरी गोष्टी देशात अशा दिसतात की, त्यामुळे देशाचे रूप पाहताना मनाला खेद होतो, पण देशाचे अंतरंग पाहू गेले तर अंतर्यामी दुर्दम्य जीवनशक्तीचेही दर्शन घडते.

वरवर पाहिले तर असे दिसते की, या युध्दामुळे हिंदुस्थानात औद्योगिक विस्तार होतो आहे, उत्पादन वाढते आहे.  पण याचा अर्थ देशात नवे उद्योगधंदे निघाले असा आहे, का जुन्या उद्योगधंद्यांचाच नुसता पसारा वाढला किंवा त्यांना वेगळे वळण लागले एवढाच आहे, याविषयी शंका आहे.  हिंदुस्थानातील औद्यागिक कार्याचा चिन्हांक या युध्दकाळात जेवढाचा तेवढाच राहिला आहे असे दिसते व त्यावरुन अनुमान असे निघते की, उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात काही विशेष महत्वाचे धंदे असे काही नव्याने निघालेले नाहीत.  इतकेच नव्हे उलट काही तज्ज्ञ निरीक्षकांचे मत तर असे आहे की, हे युध्द व युध्दकालीन ब्रिटिश धोरनामुळे हिंदुस्थान देशाच्या औद्योगिग प्रगतीला प्रत्यक्षात पायबंद बसला आहे.  टाटांच्या कारखान्यांचे एक (डायरेक्टर) चालक असलेले एक विख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ जॉन मथाई यांनी नुकते अलीकडेच असे म्हटले आहे की, ''ह्या महायुध्दामुळे हिंदुस्थानतील औद्योगिक प्रगतीचा वेग खूपच वाढला आहे अशी जी एक सर्वसाधारण कल्पना सर्वत्र आहे तिला फारसा आधार नाही व ती खरी आहे असे सिध्द करणे फार अवघड आहे.  अगोदरच जम बसलेल्या काही काही उद्योगधंद्यांतील उत्पादन या महायुध्दात त्यांच्या मालाला मागणी फार असल्यामुळे वाढले आहे हे खरे आहे, परंतु देशषहताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा नव्या प्रकारच्या उद्योगधंद्याच्या ज्या अनेक योजना या युध्दापूर्वीच ठरविल्या गेल्या होत्या त्यांपैकी काही या युध्दाच्या परिस्थितीमुळे अर्धवट होऊन पडल्या आहेत व काही तर अजिबात सोडून देणे भाग झाले आहे.  माझे स्वत:चे असे मत आहे की, एकंदर साधकबाधक प्रमाणांचा विचार करता या युध्दामुळे कॅनडा किंवा आस्ट्रेलिया ह्या देशात जे काही घडले ते हिंदुस्थानात घडले नाही, युध्दामुळे हिंदुस्थानातील औद्योगिक प्रगतीचा वेग वाढावयाच्या ऐवजी तिला पायबंदच अधिक बसला आहे.  तथापि आपल्या देशातील सर्व उद्योगधंद्यांना लागणार्‍या आधारभूत अशा तयार मालाची गरज भागविण्याला पुरेशी सिध्दता हिंदुस्थान देशात आहे.  करावयचे म्हटले तर हिंदुस्थानला ते करता येईल हे मला मान्य आहे.'' देशातील औद्योगिक कार्य कोठे, कसे व किती चालले आहे याबद्दल जी काही आकडेवार माहिती उपलब्ध आहे तिच्यावरून पाहिले तर डॉ.मथाई यांच्या या मताला आधार आहे; व त्या माहितीवरून असे दिसते की, हिंदुस्थानात युध्दपूर्व कालात औद्योगिक प्रगतीची जी गती होती ती कमी झाली नसती तर होते त्याखेरीज नव्या प्रकारचे उद्योगधंदे देशात निघाले असते एवढेच नव्हे तर देशातील सर्वसाधारण उत्पादन एकंदरीने वाढलेच असते.*

--------------------
* श्री. जे. आर. डी. टाटा यांनी लंडन येथे एका प्रसंगी ता. ३० मे १९४५ रोजी भाषण करताना असे सांगितले की, या युध्दामुळे हिंदुस्थान देशातील उद्योगधंद्यांत खूप वाढ झाली व देशाचे औद्योगिक सामर्थ्य वाढले हे मत आपल्याला मान्य नाही.  ''हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांचा विस्तार होऊन नवे धंदे निघाले असे क्वचित कोठे कोठे घडले असेल, पण शस्त्रास्त्रांचे कारखाने व युध्दोपयोगी वस्तूंचे तेवढ्याच मालापुरते उपयोगी असे धंदे सोडून बाकीच्या मालांचे नवे असे उद्योगधंदे मुळीच निघाले नाहीत.  युध्द झाले नसते तर नवे नवे उद्योगधंदे अनेक निघाले असते.  विटा, पोलाद, यंत्रसामग्री मिळणे अशक्य झाल्यामुळे काही काही नव्या धंद्यांच्या योजना सोडून द्याव्या लागल्या आहेत असे मी स्वानुभवावरून सांगतो.  युध्दकालात हिंदुस्थानात औद्योगिक वाढ झाली आहे व देशाची आर्थिक प्रगती झाली आहे असे जे कोणी म्हणतात त्यांना खरी स्थिती काय आहे याची माहिती नाही.''  त्यानंतर पुन्हा एका प्रसंगी श्री. टाटा म्हणाले, ''हा फुगा फोडून टाकणे मला भाग आहे.  युध्दामुळे हिंदुस्थानाला मोठा लाभ झाला, खूप प्रगती झाली असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.  हिंदुस्थानात उद्योगधंद्यांत प्रगती किंवा वाढ झाली नाही हे खरे, मग त्याला निमित्त केव्हा काही तर केव्हा एखादे दुसरेच काही निघत गेले व उलट घडले आहे ते असे की पीछेहाट मात्र झाली आहे. प्रत्यक्षात घडलेला प्रकार आहे तो हा की, हिंदुस्थानात बंगालमध्ये दुष्काळापायी लाखो लोक मेले व देशात कापडाचाही दुष्काळ झाला.  यावरून पाहिले तर देशाची आर्थिक प्रगती मुळीच झालेली नाही हे सत्य प्रामुख्याने स्पष्ट होते.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel