जीवनाकडे नैतिक दृष्टीने पाहायला पाहिजे हा विचार मला फार पटतो.  कदाचित तर्कशास्त्रदृष्ट्या या विचाराचे, या दृष्टीचे मला समर्थन करता येणार नाही.  गांधीजी सत्यमय साधनांवर जोर देत असतात.  मलाही त्यांचे म्हणणे पटते, आवडते.  साधने शुध्द असावीत यावर गांधीजींनी जो भर दिला आहे, तीच त्यांची सर्वांत थोर अशी सार्वजनिक सेवा आहे.  हा विचार नवीन आहे असे नाही, परंतु हे नैतिक तत्त्व सार्वजनिक जीवनात सर्वत्र आणणे, आपल्या सर्व व्यवहारांत त्याची अंमलबजावणी करू पाहणे ही गोष्ट अर्थातच नवीन आहे, अभिनव आहे.  हे करणे कठीण आहे ही गोष्ट खरी; आणि साधने व साध्य हीही एकमेकांपासून आपण किती म्हटले तरी फारशी दूर करता येणार नाहीत ही गोष्टही तितकीच खरी.  साध्य व साधने दोन्ही मिळून एक प्राणमय असे संपूर्णत्व निर्माण होत असते.  आपण व्यवहारात साध्याचाच अधिक विचार करीत असतो; साधनांचा तितका विचार करीत नाही; आणि म्हणूून साधनशुध्दीवर भर द्यायला आपणास सांगण्यात आले तर ते आपणास जरा चमत्कारिक नि नवीन असे वाटते.  हिंदुस्थानात हा नवीन प्रयोग, साधनशुध्दीचा प्रयोग कितपत यशस्वी झाला आहे ते मी सांगू शकणार नाही.  परंतु कोट्यवधी लोकांच्या मनावर या विचाराचा खोल असा, चिरकालिक परिणाम झाला आहे, ठसा उमटला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे.

मार्क्स आणि लेनिन यांच्या अभ्यासाने माझ्या मनावर अपार परिणाम झाला आहे; इतिहासाकडे, आजकालच्या सर्व घडामोडींकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी लाभायला त्यांची मला मदत झालेली आहे.  त्या अभ्यासामुळे इतिहासाच्या सामाजिक वाढीच्या दीर्घ परंपरेत मला अर्थ दिसू लागला, पौर्वापर्य दिसू लागले, भविष्यासंबंधीची दुर्बोधताही कमी झाली.  रशियाच्या प्रयोगातील प्रत्यक्ष सिध्दीचा माझ्यावर खूपच परिणाम झाला.  तेथील काही गोष्टी, काही घटना मला आवडल्या नाहीत, कधी कधी मी त्या समजू शकलो नाही.  कधी कधी क्षणिक संधिसाधूपणाशी किंवा तत्कालीन सत्तामय राजकारणाशी त्या निगडित आहेत असेही वाटे.  परंतु हे सारे बाजूला ठेवूनही मानवजात सुधारावी या मूळच्या उत्कट ध्येयाला जरी काहीशी विकृतावस्था आली असली तरीही रशियन क्रांतीमुळे मानवी समाजाच्या सुधारणेत एक मोठी उडी मारण्यात आली हे सांगायला मला शंका वाटत नाही.  या क्रान्तीने अशी एक ज्वाला भडकावली आहे की, जी आता कोणालाही विझवता येणार नाही.  ज्या एका नवसंस्कृतीकडे मानवी समाज - जग जाणार आहे त्या संस्कृतीचा पाया या रशियन क्रान्तीने घातला आहे यात शंका नाही.  मी हुकूमशाहीचा भोक्ता नाही.  मी बराचसा व्यक्तिवादी आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा चाहता आहे.  तरी मला कबूल केले पाहिजे की, गुंतागुंतीच्या सामाजिक रचनेत व्यक्तिस्वातंत्र्याला मर्यादा घालायलाच हवी, आणि खरे व्यक्तिस्वातंत्र्यही सामाजिक क्षेत्रात स्वत:ला मर्यादा घालूनच उपभोगता येणे शक्य आहे.  अधिक व्यापक स्वातंत्र्यासाठी लहान वैयक्तिक स्वातंत्र्याला मुरड ही घातलीच पाहिजे.

मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानातील बराचसा भाग मी सहज स्वीकारू शकलो.  मला त्यात फारसे कठीण काही वाटले नाही.  जड आणि चित् या वस्तू अलग नसून क्रियाप्रतिक्रियात्मक अशी त्यांची एकरूपताच आहे हा सिध्दान्त.  जडात सारखा बदल होत आहे हा विचार.  कधी उत्क्रांतीने तर कधी क्रान्तीच्या उड्यांमुळे विरोधविकासवादी पध्दतीने सृष्टीचा घडत जाणारा इतिहास, कार्यकारणभाव, सिध्दान्त, प्रतिसिध्दान्त आणि समन्वय तत्त्वज्ञानाची मीमांसा मी सहज स्वीकारू शकलो.  अर्थात त्यामुळे माझे संपूर्ण समाधान झाले असे मात्र नाही.  माझ्या मनातील सर्व प्रश्नांना त्यामुळे उत्तरे मिळत होती असेही नाही.  कधी कधी मार्क्सवादात रंगलेला असतानाही हळूच मला नकळत माझ्या मनात अद्वैत तत्त्वज्ञानासारखे विचार, सार्‍या मुळात असणार्‍या चित्-तत्वाचा हा विस्तार आहे असा ध्येयवादी विचार येऊन जाई.  बाहेरची जडसृष्टी व आतली विचारसृष्टी या दोन्हीमधील भेदाचाच हा नुसता प्रश्न नसून विचारसृष्टीपलीकडे काही आहे असे वाटे.  तसेच नीतीचे काय करायचे हाही प्रश्न असेच.  माझ्या दृष्टीसमोर तर नीतीची पार्श्वभूमी सदैव असते.  अर्थात नीतीही बदलत असतेच.  उत्तरोत्तर सुसंस्कृत होत जाणार्‍या समाजावर, विकसित होणार्‍या मनावर, वाढत्या सुधारणेवर ती अवलंबून असते.  त्या त्या युगातील मनोविकासाच्या वातावरणाने नीती मर्यादित असते.  परंतु असे असले तरी नीतीमध्ये अधिक काहीतरी आहे.  सारेच युगस्थितीवर नाही.  मानवी मनात मूलभूत अशा खोल प्रेरणा आहेत.  त्या पदोपदी बदलत नसतात.  त्या नैतिक प्रेरणा, ही जी शाश्वत तत्त्वे त्यांच्यापासून व्यवहार संपूर्णपणे अलग करण्याची जी वृत्ती कम्युनिस्ट व इतर काही संप्रदायांतून आढळते ती मला मुळीच आवडत नसे.  माझ्या मनात अशा प्रकारे एक विचित्र संमिश्रण होत होते, की त्याचा मी बौध्दिक रीत्या उलगडा करू शकत नसे.  मानवी बुध्दीच्या पलीकडे असणार्‍या अशा काही मूलभूत प्रश्नांचा फार विचार करायचा नाही असे मी ठरवी, आणि जीवनाच्या प्रश्नांवर मी माझी बुध्दी अधिक स्थिर करी.  या क्षणी काय करायचे, कसे करायचे अशा प्रकारच्या मर्यादित व संकुचित प्रश्नांवरच मी माझी सारी शक्ती केंद्रित करी.  ते अंतिम सत्य काहीही असो, त्याचे स्वरूप अंशत: वा संपूर्णपणे आपण कधी काळी समजू शकू की नाही हरी जाणे; परंतु एक गोष्ट खरी की, मानवी ज्ञान उत्तरोत्तर वाढत जाण्याची कितीतरी शक्यता दिसत आहे, आणि हे ज्ञान जरी थोड्याफार अंशाने व्यक्तिनिष्ठ असे असले तरी मानवी जीवन सुधारण्यासाठी, सामाजिक रचना सुधारण्यासाठी त्या ज्ञानाचा उत्तरोत्तर अधिक उपयोग करता येणे शक्य आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel