काँग्रेसने केलेली आणखी एक सुचना व तिचा ब्रिटिश सरकारने केलेला अव्हेर-मि. विन्स्टन चर्चिल.

आठ प्रांतांतून एका व्यक्तीच्याहाती एकतंत्री राज्यकारभार चालविला जावा, असे हे जे स्थित्यंतर झाले ते नुसते एक मंत्रिमंडळ जाऊन त्याच्या ऐवजी दुसरे आले तर जशी केवळ वरची प्रमुख मंडळी जाऊन त्या जागी दुसरी यावयाची त्यातला प्रकार नव्हता.  ह्या प्रकाराने राज्यशासनयंत्रात आमूलाग्र कायापालट होऊन त्यामुळे सर्व राज्यकारभाराची घडी बदलली व राज्यकर्त्याची वृत्ती, धोरण, राज्यपध्दती या एकूण एक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला.  सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचा प्रत्यक्ष कारभार चालविणार्‍या कायमच्या अधिकारीवर्गावर लोमताचे कायदेमंडळांच्याद्वारे व इतर संस्थांच्याद्वारे जे नियंत्रण होते ते नाहीसे झाले, व जनतेकडे पाहण्याची सरकारी दृष्टी वरपासून खालपर्यंत, गव्हर्नर, सनदी नोकरशाहीतील अधिकारी, पोलिस अधिकारी, या सार्‍यांची पार बदलून गेली.  हे चक्र उलटे फिरून अधोगती सुरू झाली ती काँग्रेसने सत्ता हाती घेताना जी स्थिती होती तेथपर्यंतच जाऊन थांबली नाही, त्यापेक्षाही फार वाईट अवस्था आली.  ज्या न्यायनिर्बंधांच्या आधाराने, निदान कशाला तरी कायदा असे नाव देऊन त्याच्या आधाराने राज्याचा कारभार चालावयाचा त्या कायद्यांची स्थिती पाहिली तर ते कायदे एकोणिसाव्या शतकात अनियंत्रित एकतंत्री कारभार ज्या कायद्यान्वये चाले तसले कायदे अमलात आले, कायद्यांची परिस्थिती इतकी मागे फिरून गेली.  आणि हे कायदेही नुसते नावापुरतेच, प्रत्यक्षातला कारभार त्या पूर्वीच्या जुन्या काळच्या मानाने फार करडा होऊ लागला.  कारण पूर्वी अधिकार्‍यांना रयत म्हणजे आपली लेकरे असे वाटे, व रयतेच्या अधिकार्‍यांच्यावर माबाप सरकार म्हणून विश्वास असे, ते सारे जाऊन, फारा काळाची आपली मिरास आपल्या हातची जाऊ म्हणते म्हणून मिरासदाराला जी भीती वाटावी, जो त्वेष यावा, त्या भीतीने व त्वेषाने ब्रिटिश अधिकारीवर्ग ग्रासून गेला होता. काँग्रेस मंत्रिमंडळाच्या सत्तेखाली कारभार करीत सव्वादोन वर्षे काढणे त्यांना मोठे कठिण वाटले होते.  ज्या लोकांना त्यांनी काही गडबड केली तर सहज केव्हाही तुरुंगात घातला येत होते त्याच लोकांच्या धोरणाने वागणे, त्यांच्या हुकमाप्रमाणे कामगिरी पार पाडणे हे काही सुखाचे नव्हते.  आता काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे देऊन गव्हर्नरच्या एकतंत्री कारभार सुरू झाल्यावर या ब्रिटिश नोकरशाहीची इच्छा नुसते जुन्या वहिवाटीप्रमाणे चालण्याने पुरी होत नव्हती, त्यांना या चळवळ्या लोकांना चांगला हात दाखवून त्यांचा नक्षा उतरावयाचा होता.  शेतीवरचे शेतकरी, कारखान्यातले कामकरी, कारागीर व दुकानदार, मोठमोठे उद्योगपती, वकील डॉक्टर यांच्यासारखे पांढरपेशे, धंदेवाले, कॉलेजातले तरुण विद्यार्थी व विद्यार्थिनी, दुय्यम अधिकारी, एवढेच नव्हे तर वरिष्ठ अधिकारीवर्गापैकी ज्या हिंदी अधिकार्‍यांनी लोकपक्षाच्या राज्यकारभाराबद्दल काही आस्था दाखविली असेल ते वरिष्ठ हिंदी अधिकारी, या एकूण एक सार्‍या मंडळींना, ब्रिटिशांचे राज्य अजून चालू आहे, त्या राज्याशी अजूनही दोन हात या मंडळींना करावे लागतील, हे पक्के पटवून द्यावयाचे होते, प्रत्येकाचे पुढे जन्मभर काय होणार, बरे दिवस कोणाला दिसणार ते ब्रिटिश अधिकार्‍यांच्या हाती आहे, चार दिवस उपरी सत्ता चालविणार्‍या उपटसुंभांच्या हाती नाही याचे प्रत्यंतर त्यांना आणून द्यावयाचे होते.  मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे चिटणीस म्हणून ज्यांनी काम केले ते अधिकारी आता फक्त गव्हर्नराचा अधिकार मानणारे मालक झाले व पुन्हा पूर्वीच्या तोर्‍यात बोलू लागले; जिल्ह्याचे कलेक्टर (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) आपापल्या जिल्ह्यापुरते सर्वसत्ताधीश सुभेदार पूर्वीसारखे बनून आपली हुकुमशाही चालवू लागले; आपण वाटेल तसा धुमाकूळ घातला तरी सरकार आपल्यालाच उचलून धरणार, पाठीशी घालणार हे नक्की माहीत झाल्याने पोलिसांना मनमोकळेपणे त्यांची जुनी चाल पुन्हा धरता आली.  वाटेल त्या गोष्टीवर पांघरूण घालायला युध्दाचे धुंद वातावरण हाताशी होतेच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel