ह्या अर्वाचीन काळात मानवाने किती किती प्रगती केली म्हणून या आपल्या अर्वाचीन काळाचा आपण अभिमान बाळगतो.  पण आपण ह्या काळाचे निव्वळ गुलाम बनलो हेही शक्य आहे.  प्राचीन व मध्ययुगातले लोक त्या त्या काळाचे गुलाम होते.  ते पूर्वीचे लोक जसे आपल्या भ्रमात राहात तसे आपण आपल्या भ्रमात तर नाही ?  आमची दृष्टीच योग्य, हीच सत्याकडे घेऊन जाईल असे आंधळेपणाने नि अहंकाराने ते म्हणत, तसेच कदाचित आपणही म्हणत असू.  या तुरुंगातून आपणही पूर्णपणे मुक्त होऊ शकणार नाही; या भ्रमजालातून-जर तो भ्रमच असेल तर-आपलीही संपूर्णपणे सुटका अशक्य आहे.

परंतु एक गोष्टमात्र निर्विवाद की शास्त्रीय पध्दतीमुळे विज्ञानाचा दिवा हातात घेतल्यामुळे पूर्वी कशानेही झाली नव्हती इतकी क्रांती आज मानवी जीवनात झाली आहे.  अधिक अधिक महत्त्वाचे फरक होत जातील अशी लक्षणे दिसत आहेत, नवीन नवीन क्षितिजे उत्तरोत्तर दिसत आहेत, नवीन दारे उघडत आहेत, आतापर्यंत अज्ञात अज्ञात म्हणून संबोधण्यात येई त्या अज्ञातातून बाहेर दरवाजापर्यंत जवळ जवळ आपण जाऊन पोचणार अशी चिन्हे दिसत आहेत.  विज्ञानाचे यांत्रिक विजय तर स्पष्टपणे दिसत आहेत.  उद्योगधंद्यात, उत्पादनात केवढी क्रांती होत आहे, दुर्मिळ वस्तुंचा सुकाळ होत आहे.  आतापर्यन्त जे प्रांत तत्त्वज्ञानाचे म्हणून खास समजण्यात येत, त्या प्रांतांवरही विज्ञानाने आज सहज नजरेत भरण्यासारखी स्वारी केली आहे.  दिक् काल सापेक्ष आहेत हा आइनस्टीनचा सिध्दान्त, त्याचप्रमाणे परमाणुवाद, यामुळे या सर्व सृष्टीचे भौतिक जगाचे रूपच अजिबात वेगळे दिसू लागले आहे.  जड सृष्टीच्या स्वरूपाचे नवे नवे संशोधन, अणुरचनेचे शोध, मूलभूत भूतांचे परिवर्तन, विद्युत नि प्रकाश यांचे एकमेकात परिवर्तन, या सर्व गोष्टींमुळे मनुष्याचे ज्ञान कितीतरी पुढे गेले आहे.  आता निसर्ग आपणापासून निराळा आहे असे मानवास वाटत नाही.  निसर्गातील तालबध्द शक्तीलाच मानवी भवितव्य जोडले गेले आहे.  त्या शक्तीचाच मानवी भवितव्य हा एक भाग आहे असे दिसून येत आहे.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे विचारांतील ही प्रचंड उलथापालथ होत आहे;  आणि ही वैचारिक क्रांती शास्त्राज्ञांना नवीनच एका प्रांतात— जवळजवळ अध्यात्मात— घेऊन जात आहे.  शास्त्रज्ञ परस्परविरोधी भिन्न भिन्न असे सिध्दान्त आज मांडू लागले आहेत.  काही शास्त्रज्ञांना विश्वाची उभारणी केवळ योगायोगाने झालेली नसून त्यात एक नवीन प्रकारचे अद्वैत, एक प्रकारची सुसूत्रता आहे असे दिसते.  याच्या उलट बर्ट्रांड रसेल म्हणतो, ''प्राचीन काळापासून, पार्मेनिडिसच्या काळापासून, केवळ पुस्तकी चर्चापांडित्य करणार्‍या तत्त्वज्ञान्यांची जग एकतत्त्वमय आहे या सिध्दान्तावर श्रध्दा होती.  परंतु माझे तर मूलभूत सूत्र आहे की, असे म्हणणे केवळ मूर्खपणा आहे, किंवा पुन्हा शेवटी काय निष्पन्न व्हावयाचे याची आरंभी कल्पना नसलेल्या (चित्तत्त्वरहित) कारणातून पृथ्वीवर मानव उत्पन्न झाला.  कसातरी आकस्मिक रीतीने हा प्राणी संभवला.  मनुष्यप्राण्याचा उगम, त्याचा विकास, त्याच्या आशा, त्याच्या निराशा, त्याचे रागद्वेष, त्याची श्रध्दा, त्याची भीती ही सर्व आकस्मित रीत्या एकत्र येणार्‍या काही अणुपरमाणूंचा परिणाम आहे झाले.  याच्या उलट अगदी नवीन असे सृष्टिशास्त्रातील शोध असे दाखवीत आहेत की, निसर्गात मूलभूत असे ऐक्य आहे.  सर्व वस्तुजात एका मूलतत्त्वापासून उत्पन्न झाले ही श्रध्दा मनुष्य विचार करू लागला तेव्हापासूनची जुनी आहे.  पण निव्वळ धर्ममत म्हणून आधार नसतानाही, वेड्या आशेने, या सिध्दान्तावर विश्वास न ठेवता आज माहीत असलेल्या कोणत्याही कसोटीला उतरणार्‍या स्वच्छ निर्विवाद पुराव्याने हे शास्त्रीय तत्त्व म्हणून सिध्द झालेले पाहणे पहिल्याने इतिहासात आज आपल्याच पिढीला शक्य झाले आहे.

युरोपात नि आशियात हा विचार फार जुना आहे. *  विज्ञानातील काही अलीकडील सिध्दान्तांची अद्वैततत्त्वज्ञानातील काही मूलभूत विचारांशी तुलना करणे मोठे मौजेचे आहे.  अद्वैत सिध्दान्तातील मूलभूत गोष्टी कोणत्या ?  त्या अशा : हे विश्व एका वस्तूचा पसारा आहे.  ते जे मूलभूत तत्त्व ते सारखे बदलत आहे, आणि गंमत ही की सर्व शक्तींची बेरीज ही नेहमी सारखीच असते.  तसेच पदार्थाची कारणमीमांसा त्या त्या पदार्थाच्या धर्मातच सापडते.  विश्वात काय चालले आहे त्याचे विवरण करायला बाह्य गोष्टींची, बाह्य जीवांची, बाह्य अस्तित्वांची आवश्यकता नाही, कारण हे विश्व स्वयंविकासी आहे.

-------------------
* कार्ल के. डॅरो : सृष्टशास्त्राचे नवयुग (रेनेझान्स ऑफ फिजिक्स), न्यूयॉर्क, १९३६, पान ३०१

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel