ज्या रस्त्याने ह्युएनत्संग आला होता, त्याच रस्त्याने, मध्यआशियातील मार्गाने तो परत गेला.  बरोबर त्याने पुष्कळ हस्तलिखित ग्रंथ नेले होते.  त्याने केलेल्या वर्णनावरून खोरासार, इराक, मोसल आणि पुढे थेट सीरियाच्या सरहद्दीपर्यंत बौध्दधर्माची किती सर्वगामी सत्ता चाले त्याचे हुबेहूब चित्र डोळ्यांसमोर येते.  परंतु तसे पाहिले तर या प्रदेशातून याच काळात बौध्दधर्माला उतरती कळा लागली होती आणि अरबस्थानात खाली इस्लाम उदयास येत होता, तो पुढे लौकरच या सर्व देशांतून पसरला.  इराणी लोकांविषयी ह्युएनत्संग मार्मिकतेने लिहितो, ''त्यांचे विद्येकडे फारसे लक्ष नाही, सदा कलाकुसरीच्या जिनसा बनविण्यात अगदी पूर्ण गढून गेलेले असतात.  ते जे काही बनवितील त्याची आसपासच्या देशांत फार किंमत आहे.''

त्या वेळी व त्याच्या अगोदर व नंतरही इराणचे सारे लक्ष जीवन अधिक सौंदर्यपूर्ण, अधिक डौलदार करण्यात गुंतले होते व इराणचा प्रभाव आशिया खंडात दूरवर पसरला होता.  गोबीच्या वाळवंटाच्या कडेला असलेले एक लहानसे मजेदार तुर्फान राज्य होते.  ह्युएनत्संगने त्याची सुरेख हकीकत लिहून ठेवली आहे आणि अलीकडील उत्खननामुळे पुष्कळच नवी माहितीही मिळाली आहे.  तुर्फान हे नाना संस्कृतींचे मीलन-स्थान होते.  चीन, हिंदुस्थान, इराण एवढेच नव्हे, तर ग्रीक संस्कृतिप्रवाह येथे येऊन हे सर्व एकमेकांत मिसळून या सर्वांतून एक नवीनच संमिश्र मनोहर संस्कृती तेथे फुलली.  तेथील भाषा इंडो-युरोपियन कुळातील होती, ती हिंदुस्थान, इराण यांतून संमिश्र स्वरूपात मिळाली होती व युरोपातील कोल्टिक भाषांशी काही बाबतींत त्या भाषेचे साम्य होते.  धर्म हिंदुस्थानातून मिळाला, चालरीत चीनची, कलाकुसरीच्या वस्तू इराणातून यायच्या.  बुध्दाचे आणि इतर देवदेवतांचे जे पुतळे, लेण्यांतील ज्या मूर्ती आहेत, त्यांची शिरोभूषणे ग्रीक पध्दतीची आहेत, तर इतर वस्त्रभूषा भारतीय आहे.  या देवदेवतांच्या मूर्ती पाहून मोशर ग्राऊसेट म्हणतो, ''या मूर्ती म्हणजे हिंदू मूर्तीतील लवचिक वळण, ग्रीक शिल्पातील भावदर्शन आणि चिनी मोहकता यांचा अपूर्व सुंदर संगम आहे.''

ह्युएनत्संग स्वदेशी परतल्यावर सम्राटाने आणि जनतेने त्याचे स्वागत केले.  नंतर आपल्या प्रवसाचा ग्रंथ तो लिहू लागला.  तसेच बरोबर आणलेल्या अनेक संस्कृत ग्रंथांचे भाषांतरही त्याने सुरू केले.  कित्येक वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या यात्रेस तो जेव्हा निघाला त्या वेळची ही गोष्ट आहे.  सम्राट टँगने एका पेल्यात चिमूटभर माती मिसळून त्याला ते पेय प्यायला दिले आणि सांगितले, ''हे पेय पी, कारण परदेशांतील लाखो सोन्याच्या नाण्यांपेक्षा स्वदेशातही मूठभर माती अधिक मोलाची आहे असे पूर्वज सांगत नाही का आले ?''

ह्युएनत्संगला चीन व हिंदुस्थान या दोन्ही देशांत प्रतिष्ठा होती.  त्याच्याविषयी दोन्ही देशांना आदर वाटत असल्यामुळे त्याच्या भेटीने दोन्ही देशांतील राज्याकर्त्यांमध्ये राजकीय संबंधही निर्माण झाले.  हर्षवर्धनाने चीनकडे वकील पाठविला; आणि टँग घराण्यातील चिनी सम्राटाने हर्षाकडे वकील धाडला.  ह्युएनत्संगने भारताशी जोडलेला संबंध सोडला नाही.  त्याचा व भारतातील त्याच्या मित्रांचा पत्रव्यवहार सुरू होता, त्याला हस्तलिखित ग्रंथ पोचत होते.  मुळात संस्कृतात लिहिलेली दोन पत्रे चीनमध्ये अद्याप संभाळून ठेवण्यात आली आहेत.  त्यांतील एक पत्र एक भारतीय बौध्द विद्वान स्थविर पज्ञादेव याने इ.स. ६५४ मध्ये ह्युएनत्संगला लिहिलेले आहे.  त्या पत्रात आरंभी नमस्कार व उभयतांच्या मित्रांचे कुशल वर्तमान व त्या मित्रांच्या साहित्यनिर्मितीचा वृत्तांत देऊन पुढे तो लिहितो, ''आम्ही विसरत नाही याची खूण म्हणून श्वेतवस्त्रांची एक जोडी पाठवीत आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel