त्यांनी एकदा लिहिले, ''मी समाजवादी आहे, तो समाजवाद एक निर्दोष तत्त्वज्ञान आहे म्हणून नव्हे; तर मुळीच भाकरी नसण्यापेक्षा अर्धीही बरी.  इतर पध्दतींची परीक्षा झाली व ती निकामी ठरली.  आता या उपायाची कास धरून बघू या.  दुसरे काही नाही तरी एक नवीन प्रयोग तरी होईल.''

विवेकानंदांनी अनेक गोष्टी सांगितल्या.  परंतु त्यांच्या लेखांतून व भाषणांतून एक मुख्य सूर कोणता असेल तर तो 'अभय, निर्भय व्हा, बलवान व्हा, हा त्यांचा संदेश' आहे.  मनुष्य म्हटला की अधम, पापात्मा अशी त्यांची विचारसरणी मुळीच नव्हती.  उलट मनुष्य म्हणजे परमेश्वराचा अंश, त्याला भय कशाचे ? ''जगात एकच पाप आहे ते म्हणजे दुबळेपणा.  सर्व प्रकारचे दौर्बल्य झडझडून दूर फेका; दौर्बल्य म्हणजे पाप, दौर्बल्य म्हणजे मरण.'' उपनिषदांची हीच थोर शिकवण आहे.  भीतीतूनच पाप, विलाप, आक्रोश जन्माला येतात. हे सारे प्रकार झाले तेवढे खूप झाले.  की मिळमळीत शांती, मनाचा कोवळेपणा, हा मनाचा सौम्यपणा आजवर झाला तो पुरे.  आपल्या देशाला आज जर कशाची जरूर असेल तर ती लोखंडी बाहूंची, पोलादी स्नायूंची, दुर्दम्य, दुर्धर्ष अशा प्रचंड इच्छाशक्तींची.  तुमची इच्छा, शक्ती सारे विरोध झुगारून विश्वाची सारी रहस्ये उलगडायला सर्वत्र घुसायला हवी; अगम्य अप्राप्य असे काहीच वाटता कामा नये.  समुद्राच्या तळाशी जाणे असो; मृत्यूशी समोरासमोर उभे राहणे असो; आम्ही आमचे उद्दिष्ट मिळविणारच अशी दुर्दान्त इच्छाशक्ती आज हवी आहे.'' सिध्दी, मंत्रतंत्र, गूढविद्या, असल्या प्रकारावर ते निष्ठुर टीका करीत.  ते म्हणतात, ''मंत्रतंत्र, सिध्दी, अनुभूतिविद्या असल्या या लपतछपत करायच्या भीतीने अंगावर शहारे आणणार्‍या गूढविद्या आहेत.  त्यात मोठे तथ्य असेलही, पण या प्रकारामुळे आपल्या लोकांचे जवळजवळ मरण ओढवले आहे.  सत्याची कसोटी हीच आहे की ज्यामुळे शरीर, बुध्दी, मन कमकुवत बनते.  ते सारे असत्य समजून विषासारखे टाकून द्या.  कारण त्यात चैतन्य नाही, ते सत्य असणे शक्य नाही.  सत्याने सामर्थ्य वाढते, दुबळेपणा नव्हे.  सत्य म्हणजे पावित्र्य, सत्य म्हणजे संपूर्ण ज्ञान. या गूढवादातून, सत्याचे काही कण असतीलही, पण त्याने मन दुबळे बनते.  एकंदरीत तुमच्या उपनिषदांकडे पुन्हा वळा.  त्यांतील धगधगीत, तेजस्वी बलदायी तत्त्वज्ञानाकडे जा.  या सार्‍या गूढ गोष्टी, दुबळेपणा आणणार्‍या गोष्टी सोडून द्या.  उपनिषदांचे तत्त्वज्ञान घ्या, महान सत्ये ही अत्यंत साधी असतात; तुमचे अस्तित्व हे जितके साधे, सहज आहे, त्याप्रमाणे ती सत्य असतात.'' ''आणि आंधळेपणाने, बावळटपणाने काहीतरी मानणे ही श्रध्दा मुळीच नको.  अगदी नास्तिक झालात तरी चालेल; परंतु अंधश्रध्दा ठेवणारे मूर्ख होऊ नका, कारण नास्तिक झाला तरी त्याच्या ठायी जिवंतपणा असतो.  त्याचे काहीतरी आपल्याला करता येईल.  परंतु अंधश्रध्दा शिरली म्हणजे बुध्दीच मेली, मंद होत चालली.  आणि बुध्दी गेली म्हणजे सारेच गेले, जीवनाचा अध:पात झाला.  गूढगुंजन आणि अंधश्रध्दा या नेहमीच दुबळेपणाच्या खुणा आहेत.'' *

-----------------------

* 'कोलंबो ते अल्मोरा'- व्याखाने या पुस्तकातील आहेत.  काही उतारो ''स्वामी विवेकानंदांची पत्रे'' (लेटर्स ऑफ स्वामी विवेकानंद) १९४२; ''लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा'' बाय विवेकानंद १९३३.  दोन्ही पुस्तके-अद्वैत आश्रम, मायावती अल्मोरा, हिमालय या संस्थेने प्रसिध्द केलेली आहेत.  'पत्रांमध्ये' ३९० पानावर विवेकानंदांनी एका मुसलमान मित्राला लिहिलेले एक विलक्षण पत्र आहे.  त्या पत्रात ते लिहितात :

'' त्याला वेदान्त म्हणा किंवा दुसरे कोणतेही नाव द्या.  धर्म आणि विचार यांतील शेवटचा शब्द म्हणजे अद्वैत हा होय यात शंका नाही.  अद्वैताच्या भूमिकेवरूनच सर्व धर्म आणि सर्व पंथ यांच्याकडे आपण प्रेमाने पाहू शकू.  भविष्यकाळातील सुसंस्कृत मानवजातीचा हाच धर्म होईल अशी आमची श्रध्दा आहे.  हिब्रू किंवा अरब लोकांहून हिंदू अधिक प्राचीन असल्यामुळे हा धर्म इतरांपेक्षा हिंदूंनीच आधी शोधला असे श्रेय त्यांना मिळणे शक्य आहे.  परंतु व्यावहारिक प्रत्यक्ष आचरणात वेदान्त म्हणजे सर्वांच्या ठायी आपणच आहोत, तोच एक परमात्मा सर्वत्र भरला आहे अशी भावना ठेवून सर्वांशी तसे वागणे हे सर्वसाधारणपणे हिंदूंच्या सर्वत्र अंगवळणी पडलेले नाही, तो गुण अपुरा आहे.

'' याच्या उलट आमचा अनुभव आहे की रोजच्या व्यवहारात थोडी तरी समानता कोणत्या धर्माचे अनुयायी दाखवीत असतील तर ते केवळ इस्लामचे आणि इस्लामचेच होत.  या वर्तणुकीच्या मुळाशी असलेले तत्त्व, त्यातील खोल अर्थ इस्लामीयांस माहीत नसेल, हिंदूंना तो अधिक समजत असेल, इस्लामी बंधू सामान्यत: सहजपणे तसे वागत असतील...

'' आपल्या मातृभूमीसाठी हिंदू धर्म आणि इस्लाम या दोहोंच्या मीलनाची जरुरी आहे.  इस्लामी धर्माच्या शरीरात वेदान्ताचा आत्मा वेदान्ताची बुध्दी ओतणे—हीच एक आशा आहे.

'' मी माझ्या मनश्चक्षूंसमोर भविष्यकाळातला निर्दोष, अव्यंग हिंदुस्थान बघत आहे.  आजची भांडणे व गोंधळ जाऊन अजिंक्य व देदीप्यमान असा भारत माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे.  वेदान्ताची बुध्दी आणि इस्लामी धर्माचे शरीर घेतलेल तो भारत दिसत आहे.''

हे पत्र अल्मोर्‍याचे आहे.  तारीख १० जून १८९८

अशा रीतीने दक्षिणेच्या कन्याकुमारी टोकापासून ते थेट हिमालयापर्यंत विवेकानंद ही घनगर्जना करीत गेले, आणि या अविश्रांत श्रमाने ते थकून वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी १९०२ मध्ये निधन पावले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel