दुष्काळ

दुष्काळ आला.  कल्पना करता येणार नाही असा भयंकर दुष्काळ आला.  अंगावर शहारे उभे करणारा, अगदी शब्दांपलीकडचा भीषण-रौद्र दुष्काळ आला.  मलबार, ओरिसा, विजापूर इतकेच काय पण सस्यश्यामल अशा समृध्द नि सुपीक बंगाल्यात सुध्दा दुष्काळाने एकच कहर उडाला.  अन्नावाचून हजारो स्त्रीपुरुष आणि मुलेबाळे मृत्युमुखी पडत होती— कलकत्त्यातील प्रासादांसमोर आणि खेड्यापाड्यांतील लहान लहान झोपड्यांसमोर हजारोंच्या संख्येने प्रेते पडत होती.  खेडोखेडी वाटा प्रेतांनी नुसत्या भरून गेल्या होत्या.  शेतांतूनही प्रेतांचे खच पडले होते.  अवघ्या जगभर लोक युध्दात मरत होते, एकमेकांना मारीत होते.  ते युध्दातील तडकाफडकी मरण-शूराचे मरण, हेतुपूर्ण ध्येयार्थ मरण.  या वेड्या जगात अशाच घटना घडतात की, शेवटी त्यातून मरण हे अपरिहार्यच ठरते.  ज्या जीवनाला आपण वळण देऊ शकत नाही- ज्यावर आपली सत्ता चालू शकत नाही त्याचे अकस्मात अवसान होते.  मृत्यू सर्वत्र सारखाच.  त्यात फरक काहीच नाही.

परंतु हे दुष्काळातील मरण ! येथे ना हेतू ना ध्येय-अपरिहार्यता नाही की आवश्यकता नाही.  माणसाच्या नालायकीमुळे व बेफिकिरीमुळे हे मरण ओढवले होते.  कोठे आधार नाही की गती नाही.  अजगरासारखा तो भयाण मृत्यू संथपणे त्यांना व्यापीत होता, जीवनाचे हळूहळू मरणात शिरून विसर्जन होत होते.  निस्त्राण शरीरावरील खोल गेलेल्या डोळ्यांतून मृत्यूने डोकावीत राहावे.  थोडा वेळ जिवाची अखेरची धुगधुगी जाणवावी की सारा खेळ खलास !  अशा मृत्यूचा नुसता उल्लेख करणेही अयोग्य व रीतभात सोडून.  कारण कटू गोष्टी बोलणे शिष्टसंमत नसते.  त्यातूनही बोलू म्हटले तर या दुर्दैवी घटनांचे काय नाटक चालवले आहे असा शेरा मिळायचा.  यासाठीच तर अधिकार्‍यांनीं हिंदुस्थानात आणि इंग्लंडमध्ये खोट्या बातम्या पसरविल्या—खोटे अहवाल प्रसिध्द केले.  परंतु प्रेतांचे डोंगर झाले होते.  ते डोळ्यांपुढून सहजासहजी कसे हालणार ?  ते आडवे आले.

बंगालची नि इतर ठिकाणची जनता त्या दुष्काळरूपी यमयातनांच्या आगीतून जात असता वरिष्ठ अधिकारीमात्र आधीच आम्हाला सांगून टाकीत होते की, युध्दकालीन भरभराटीमुळे हिंदुस्थानातील बहुतेक भागांत शेतकर्‍यांजवळ भरपूर खायला आहे, नव्हे पुरून उरेल इतके आहे !  मात्र नंतर असे सांगण्यात आले की, या दुष्काळाची सर्व जबाबदारी प्रांतिक स्वायत्ततेवर आहे.  हिंदुस्थान सरकार किंवा विलायतेतील हिंदी कार्यालय प्रांतिक सरकारच्या कारभारात ढवळाढवळ करू शकत नाही.  छान !  सनदशीरपणाच्या मर्यादांना चिकटून बसणारे शहाणे आता असे बरळू लागले.  हिंदुस्थानचा व्हाईसरॉय स्वत:च्या अमर्याद हुकूमशाहीच्या जोरावर दररोज सनदशीर कारभाराचा मुडदा पाडीत होता. शेकडो वटहुकूम आणि फर्माने काढून या प्रांतिक स्वायत्ततेचा बट्ट्याबोळ करण्यात येत होता—घटनेत हरघडी फेरबदल करून ती पायदळी तुडविण्यात येत होती.  हिंदुस्थानातील घटना म्हणजे शेवटी एका व्यक्तीची अनियंत्रित नि अमर्याद हुकूमशाही हाच अर्थ होता.  ती व्यक्ती हिंदुस्थानात कोणाला जबाबदार नाही.  जगातील कोणत्याही हुकूमशहापेक्षा तिच्या हातात अधिक सत्ता नि अधिकार असत.  अशी ही घटना कायमच्या सनदी नोकरांकडून चालविण्यात येते.  ते गव्हर्नरांना जबाबदार असतात; आणि हे गव्हर्नर म्हणजे व्हाईसरॉयसाहेबांचे हस्तक.  मंत्री असले तरी गव्हर्नर त्यांच्या स्वत:च्या इच्छेप्रमाणे धाब्यावर बसवू शकतो.  मंत्री, भले वा बुरे सरकारचे बंदे सारे.  त्यांची छाती नव्हती की ते वरून आलेले हुकूम मोडतील किंवा नावालाही त्यांच्या हाताखालचे दिसणार्‍या अधिकार्‍यांची मर्जी मोडतील.

अखेरीला काही थोडेफार करण्यात आले.  थोडा आधार देण्यात आला, मदत दिली गेली.  परंतु मेले किती ? दहा, वीस की लाख ? त्या भीषण काळात भुकेने किंवा रोगाने किती मेले ते कोण सांगणार ?  शिवाय मरणाच्या दाढेतून कशीबशी वाचलेली लाखो बालके, त्यांची ती अस्थिपंजर खुरटी शरीरे व मेलेली मने याची तरी कोणाला कितीशी माहिती असणार ? आणि अद्यापही सर्वव्यापी दुष्काळाचे सावट हिंदुस्थानावर आहेच !

अध्यक्ष रुझवेल्ट यांचे चतुर्विध स्वातंत्र्य ! त्या चार स्वातंत्र्यांपैकी कशाचीही वाण नसणे हे एक स्वातंत्र्य होते.  हिंदुस्थानातील लाखो लोकांना अन्न मिळत नव्हते परंतु धनाढ्य इंग्लंड अमेरिकेपैकी कोणीही लक्ष दिले नाही.  हिंदी लोकांच्या हृदयातील स्वातंत्र्याच्या ज्वालेकडे ज्याप्रमाणे त्यांनी लक्ष दिले नाही त्याप्रमाणे शारीरिक भुकेकडेही त्यांनी लक्ष दिले नाही.  सबबी मात्र अशा सांगितल्या की, दुष्काळात द्रव्याची जरुरी नसून अन्नाची आहे.  ते अन्न पाठवायला बोटी कोठून आणायच्या ? सार्‍या बोटी महायुध्दात गुंतलेल्या.  बंगाल्यातील ती पराकाष्ठेची दारुण स्थिती लपविण्याचा—त्या परिस्थितीला किरकोळ स्वरूप देण्याचा सरकारने किती जरी प्रयत्न केला तरी इंग्लंड, अमेरिका नि इतर देश यांतील काही उदार नि सहृदय स्त्रीपुरुष विरघळून हिंदी जनतेच्या मदतीला आले.  त्यांतल्या त्यांत चीन आणि आयर्लंड सरकारांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.  एकतर त्यांच्या जवळची साधनसंपत्ती थोडी, त्यात त्यांना स्वत:च्याच अडचणी खूप.  परंतु दुष्काळ, दु:ख, दैन्य यांचा त्यांना अनुभव असल्यामुळे, हिंदी जनता कोणते शारीरिक नि मानसिक क्लेश भोगीत आहे याची त्यांना कल्पना आली.  त्यांनी उदारपणे मदत पाठविली.  उपकाराची आठवण आमच्या देशाला पक्की असते.  इतर काही विसरुही, पण मित्रत्वाच्या नात्याने दिलदारपणे केलेली ही मदत तो कदापि विसरणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel