हल्ली रसायनशास्त्राच्या बळावर प्रयोगशाळेतून वाटेल तो पदार्थ तयार करण्याची आपली शक्ती उत्तरोत्तर वाढते आहे याचा आपल्याला अभिमान वाटत असतो. बाष्पयुगातून आपल्या मानवजातीचे विद्यतयुगापर्यंत प्रगती केली व आता प्राणिजीवनशास्त्रातील तंत्रविद्या व विद्यतपरमाणुशास्त्र यांचे युग प्रवर्तले आहे. त्यापुढे समाजशास्त्राचे युग उभे राहिले आहेच आणि त्यामुळे आपल्याला अगदी जिव्हाळ्याचे असे अनेक त्रासदायक प्रश्न सुटतील अशी आशा आपण बाळगतो आहोत. आजकाल आपल्याला असेही सांगण्यात येते की, आता आपण अल्युमिनियम व मॅग्नेशियम युगाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उभे आहोत, हे धातू जगभर सर्वत्र विपुल पसरलेले आहेत, तेव्हा मला अमुक एक गोष्ट मिळत नाही अशी स्थिती कोणाचीही राहणार नाही. ह्या नव्या रसायनशास्त्रामुळे मनुष्याचे जीवनही अगदी नवे होत चालले आहे, चराचरावर सत्ता चालविण्याची मानवी शक्तीची साधने अजस्त्र प्रमाणावर वाढण्याच्या अगदी बेतात आहेत, हेच काय, असले कितीतरी प्रकारचे युगप्रवर्तक शोध मानवाच्या भविष्य काळाच्या आसमंतात घिरट्या घालताहेत.
हे सारे ऐकले की मनाला मोठे समाधान वाटले खरे. पण माझ्या मनाला एक शंका हळूच येते. आतापर्यंत मानवजातीचे बिघडले ते काही शक्ती नव्हती म्हणून बिघडले असे नाही, होती ती शक्ती भलत्या कामाकडे लावली गेली, किंवा योग्य कामाकडे लावली तरी ती नीट लावता आली नाही, म्हणून बिघडले. विज्ञानाची उपासना केली तर विज्ञानाकडून मानवाच्या हाती मानवाच्या इच्छेनुरूप वापरायला शक्ती प्राप्त होते, पण विज्ञानापाशी वैयक्तिक भेदभाव नाही, विज्ञानाला स्वत:चा असा काही हेतू नाही, मानवाच्या हाती दिलेल्या शक्तीचा मानव काय उपयोग करतो त्याचे विज्ञानाला काही सुखदु:ख नाही. विज्ञानविद्येचा विजय अव्याहत होत राहील खरा, पण त्या विद्येने निसर्गाकडे अति दुर्लक्ष केले तर निसर्ग गुप्तपणे मुकाट्याने तिचा सूड घेईल. मानवी जीवन बाह्यत: देहाने, विस्ताराने, विशाल होत चाललेले दिसले तरी, विज्ञानाला अद्यापही उमगून न आलेले असे काही तरी न्यून मानवी जीवनाच्या अंतर्यामी तसेच राहून आतून मानवी जीवनाचा र्हास होत जाण्याचाही संभव आहे.
एका जुन्या प्रश्नासंबंधीची आधुनिक दृष्टी
आधुनिक मानवी मन:प्रवृत्ती, म्हणजे त्यातील त्यातल्या त्यात अधिक चांगल्या लोकांच्या बुध्दीचा नमुना घेतला तर ती बुध्दी व्यवहारी व कार्यचतुर, नीतिप्रिय व समाजप्रेमी, लोककल्याणवादी व मनुष्यत्वाला महत्त्व देणारी मनुष्यैकवादी आहे. सामाजिक उन्नतीला पोषक पण प्रत्यक्ष व्यवहारात आचरता येण्याजोग्या ध्येयावर त्या बुध्दीची निष्ठा आहे. ह्या बुध्दीला ज्या ध्येयामुळे चालना मिळते त्या ध्येयावरून ह्या आधुनिक काळाची अंत:प्रवृत्ती, हल्लीचा युगधर्म काय आहे ते दिसून येते. प्राचीन कालात विचारवंतांनी अंतिम सत्याचा ध्यास घेऊन त्याचा चालविलेला सतत शोध, त्यांची तत्त्वज्ञानी दृष्टी, आणि मध्ययुगीन कालात प्रचलित असलेली भक्तिपर प्रवृत्ती व आत्मप्रचीतीचा गूढवाद, हे बहुतेक सारे या आधुनिक विचारवंतांच्या युध्दाने निरुपयोगी म्हणून सोडून दिलेले आहे. या आधुनिक बुध्दीचा मानवता हा देव आहे आणि समाजसेवा हा धर्म आहे. प्रत्येक युगातील विशिष्ट विचारांना त्या त्या युगातील परिस्थितीच्या मर्यादा पडतात, व प्रत्येक युगातील विचारवंतांना असे वाटत आले आहे की, आपल्याला सत्याचे जे अंशस्वरूप प्रतीत झाले त्यावरून काय ते सत्याचे संपूर्ण स्वरूप सापडणे शक्य आहे. असे असल्यामुळे, ह्या आधुनिक विचारसरणीतही काही न्यून राहिले असण्याचा संभव आहे. प्रत्येक पिढीला, प्रत्येक लोकसमाजाला अशी भ्रांत कल्पना असते की, आपण ज्या दृष्टीने जगाचा विचार करतो तीच काय ती सत्य आहे, निदान सत्याला सर्वांत जवळची आहे. प्रत्येक संस्कृतीची, त्या त्या संस्कृतीने मर्यादित झालेली, त्या संस्कृतीच्या गुणधर्मान्वित अशी विशिष्ट मूल्ये त्या संस्कृतीशी निगडित असतात. त्या संस्कृतीचा अधिकार मान्य असलेले लोक ती मूल्ये स्ययंसिध्दच आहेत असे धरून चालतात व त्या मूल्यांना त्रिकालाबाधित मानतात. तेव्हा आपल्या या हल्लीच्या संस्कृतीला मान्य असलेली मूल्ये शाश्वत किंवा अंतिम असतीलच असे नाही, पण प्रस्तुत तीच महत्त्वाची आहेत, कारण आपण ज्या युगात राहतो त्या युगाची अंत:प्रवृत्ती, हल्लीचे विचार काय आहेत ते त्यावरून दिसते. आधुनिक युगातील काही दुर्मिळ द्रष्टे, कोणी निवडक प्रज्ञावंत भविष्यकाळाकडे पाहू लागले म्हणजे त्यांना, मानवतेचे व विश्वाचे इतरांना जे सर्वसामान्य दर्शन घडत असेल त्या मानाने अधिक परिपूर्ण असे दर्शन घडत असेल, त्यांना होत असलेला साक्षात्कार कदाचित अधिक विशाल असेल; मानवजातीची खरी खरी उन्नती होण्याकरिता अत्यंत आवश्यक असलेल्या चैतन्याचाच ते अंश म्हटले पाहिजेत. पण बहुसंख्य सामान्य लोकांचे हात या आधुनिक काळातल्या मूल्यांना देखील पोचलेले नाहीत, त्यांनी प्रस्तुत काळातील प्रचलित तत्त्वांची कितीही पोपटपंची चालविली तरी त्यांचे जीवन भूतकाळाच्या बंदिवासातच चाललेले असते.