स्वरूपमंदिरीं होतें मी एकली । माया सांज वेळ अविद्येचे बिळीं ।

माझें तुझें चालतां पाउलीं । मोहो भुजंगें धरिली करांगुळी ॥ १ ॥

लोभसर्प डंखला करूं काय । जड झाला पाय ।

आशालहरी तापला माझा देह । तृप्ति वारा घाली वो गुरुमाय ॥ २ ॥

विषय निंब बहु गोडिये आला । भजनगूळ तो मज कडू झाला ।

वित्तहानीचा गळां झेंडु आला । असत्याअशुद्धाच्या येताती गुरुळा वो ॥ ३ ॥

कामिनी--कामाची डोळां आले पित्त । रसस्तुतिनिंदा काळे झाले दांत ।

विकल्पवासनेच्या मुंग्या धांवत । स्त्रीपुत्रलोभें जीवा पडली भ्रांत ॥ ४ ॥

मीतूंपणाची थोर आली भुली । मी येथें कोण वोळखी मोडली ।

अहं विवेकें काया जड झाली । सद्‍गुरु गारुडी बोलवा माऊली ॥ ५ ॥

गुरु गारुडी आला धाउनी । बोधवैराग्याचें पाजिलें पाणी ।

विवेकअंजन घातलें नयनीं । सोहंशब्द वाजवी नामध्वनी ॥ ६ ॥

मिथ्याभूतमय अवघी ब्रह्मस्थिती । अभंगस्वरूपीं लाविली विभूती ।

उतरला सर्प निवारिली भ्रांती । एका जनार्दनीं आलीसे प्रचीती ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel