मी संतां घरचा महार । करितों जोहार ॥ध्रु०॥ विवेक नाईक माझें नांव । मीपण आलें अहंभाव । पंचभूतांचा वसविला गांव ।

रस्ते चार ॥ १ ॥

आत्मा धनी पाटीलबावा । मनाजी पाटील चालवी गांवा । बुधोबा शेट्या बळकट रावा । घरांत बसली असे आवा । खेळवी पोरे ॥ २ ॥

दहा इंद्रियें नऊ वेशी । राहातों दहावे खिडकीशीं । माझा मीच मूळ मिराशी । लक्ष संतांचें चरणापाशीं । सांगतों विचार ॥ ३ ॥

कउल शतवर्षाचे मूळ । कामाजी देशपांड्या खळ । क्रोध देशमुख सबळ । नेणें सरकार ॥ ४ ॥

हिशोब पडेल दमा सरकारीं । येईल यमाजीची स्वारी । जिवाजी धरुनी कारभारी । वोस पडेल नगरी सारी । देतील मार ॥ ५ ॥

शेवटीं नाहीं तुमचें धड । पडेल चौर्‍यांयशीचे कोड । मी तो राहीन एकीकडे । जीवाजीवर पडेल सांकडें । सांगतों सार ॥ ६ ॥

आवडी राखा मजवर हेत । मीच करीन तुमचें हित । नामस्मरणी लावा चित्त । एका जनार्दनीं विठ्ठल विठ्ठल म्हणत ।

हाचि निर्धार ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel