बैसोनी स्वप्न सांगे लोका । नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका ।

अग्नि जो खादाड न मिळे तया इंधन देखा । पनवु पालाणीं बांधिला देखा ॥ १ ॥

स्वप्नाचें नवल जागृती ऐका । जागृती स्वप्न दोन्ही मिथ्या जाहले देखा ॥ ध्रु० ॥

पंचभूतांची मिळणी जाहली परस्परीं । विसरुनी द्वैतभावा समरसले एकसरीं ।

कर्दमीं रुतलें नवल विंदान परोपरी । काय सांगू या स्वप्नाची नसे आज दुरी

॥ २ ॥

एक नारी एक पुरुष उभयतां देखिले । विवाहमंडप चौबारा घातलें ।

सोहळा औट प्रकार न दिसोनी देखिलें । वर्तन करूं सांगू जातां जागृत मी जाहलें ॥ ३ ॥

ऐसें स्वप्न देखिलें जनार्दन दृष्टि । मिथ्यामय सर्व भासलें उघडली सृष्टी ।

एका जनार्दनीं पायीं पडली मिठी । अहंता ममता यांची सुटलीसे गांठी ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel