डुग डुग डुग डुग । डुगडुगोनि गेले चार युग । कामक्रोधाचेनि लागवेगें । या मनामागें धांवत ॥ १ ॥

हित नोहे गा सर्वथा । गेले हरपोनी पाहतां । भुललें मायेनें सर्वथा । यमपंथासी जाती ॥ २ ॥

यमपुरीच्या वाटे । जीवासी आघात आहेत मोठे । संचित -क्रियामाणाचे सांठे । ते वांया जाऊं पाहे ॥ ३ ॥

जे भले सात्त्विक संत । जे निशिदिनीं हरिभक्त । त्यांसी माझा नमस्कार येत । गुरूसी शरण जा वेगीं ॥ ४ ॥

गुरुसी गेलिया शरण । काय करील जन्ममरण । स्वरूपीं लागेल अनुसंधान । निज निधान प्रगट होय ॥ ५ ॥

आतां एक सांगतों शकुन मोठा । तुज लागला एक्या बायकोचा चपेटा । तिच्या चांगुलपणाला सुभटा । भुलूं नका सर्वथा ॥ ६ ॥

आणीक ऐक तिची करणी । विष्णूस लाविलें वृंदेच्या स्मशानीं । नारदाची नारदी करुनी । साठ पुत्र जन्मविले ॥ ७ ॥

यालागीं तिचा पदरू नोहे बरा । अंती दगा देईल सारा । अजून तरी हित विचारा । दान करा पीडा टळे ॥ ८ ॥

तिनें बहुतांसी दगा दिधला । ईश्वरासारिखा भुलविला । ब्रह्मयासी वेध लाविला । रत झाला कन्येशीं ॥ ९ ॥

नवा ठायीं फाटला झगा । तो न ये उपयोगा । विषय भोगीत अंगा । तो मज दान पिंगळिया ॥ १० ॥

काळीमीच काळें चिरगुट । पदरा बांधून मीतूंपणाचें मीठ । त्रिवर्ग करोनी रोकडें नीट । ओंवाळून टाकी आतां ॥ ११ ॥

तेणें टळेल तुझी पीडा । चुकेल मीतूंपणाचा झगडा । स्वरूपीं होईल आनंद गाढा । श्रीजनार्दन प्रसादें ॥ १२ ॥

एका जनार्दनीं प्रेमबोध । पिंगळा भाकीतसे प्रबोध । प्रगट होय सोहं बोध । श्रीजनार्दन प्रसादें ॥ १३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel