जोहार मायबाप जोहार । मी जनार्दनाचा एका महार । सांगतों तुमचे नगरीचा समाचार । तो ऐका की जी मायबाप ॥ १ ॥

नगररचना केली । बारा वेशी तया ठेविली । नव खिडक्यांची चाली । तेथें ठेविली की० ॥ २ ॥

गांवची रचना जाहली पूर्ण । कळस आणि पाया एकचि जाण । जागोजाग वेशीला राखण । मज ठेविले की० ॥ ३ ॥

जीवशिव अधिकारी । नगराचे मुख्य कारभारी । जिवाजी तेथें वहिवाट करी । शिवाजी उगेच पाहती की० ॥ ४ ॥

जिवाजीचे कारभारी । कामक्रोधादि अधिकारी । मना वाटेल तैशा परी । गांवांत नाचती की० ॥ ५ ॥

जिवाजीचें न चाले कांहीं । मनाजी देती ग्वाही । दंभाजीची भलभलाई । सहज जाहली की० ॥ ६ ॥

मिळाले एकमेकांचे मिळणीं । गेले माझ्या धन्यास विसरुनी । शेवटीं परिणाम बरवेपणीं । न दिसे की० ॥ ७ ॥

येती यमाजीची चिठी । जिवाजीसी धरुनी उठाउठी । नेतील जेव्हां शेवटीं । मग दुःख वाटेल की० ॥ ८ ॥

हे अवघे राहती एकीकडे । जिवाजीसी पडेल कोडें । पायीं ठोकतील खोडे । मग रडों लागतील की० ॥ ९ ॥

एका जनार्दनीं म्हणे । सावधपणें तुम्ही राहणें । जन्ममरणाचें पेणें । चुकवावे की जी मायबाप ॥ १० ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel