यलमा आली यलमा आली । मच्छरूपीं यलमा आली । शंकासुराचे वधासी गेली । चारी वेद घेऊन आली । माता माझी यलमा भली ॥ १ ॥

धरा रसातळासी चालली । कूर्मरूपें यलमा आली । माझे बयेन धरली । जयदेवी अंबा स्थापिली ॥ २ ॥

अंबा वराह रूप होऊन । क्षिती दाढेवर धरून । दैत्य अघोर वधून । करिती भक्तांचे पालन ॥ ३ ॥

अंबा नारसिंह रूप होऊन । स्तंभामाजीं गुरुगुरून । हिरण्यकश्यपाचा घेतला प्राण । भक्त प्रल्हादाकारणें ॥ ४ ॥

अंबा झालीसे कृतघ्न । बया बैसली कपाट लावून । मंजुळ बोले हास्यवदन । अष्टभुजा सौभाग्य जाण । दार उघडून पाहे वदन ॥ ५ ॥

वामनरूपें अंबा होऊन । बसली पाताळीं घालून । द्वारपाळ पुन्हा राहून । शुक्र गुरूचा डोळा फोडून । दातृत्व भक्त जाण ॥ ६ ॥

अंबा परशराम होऊन । कामधेनु आली घेऊन । रेणुकेचा वध करून । आपल्या पितृची आज्ञा पाळून ॥ ७ ॥

अंबा झाली असे राम । लंका विभीषणा स्थापून । इंद्रजिताचा घेतला प्राण । अंबा सुवेळ नाचून । अंबेनें केलें रणकंदन ॥ ८ ॥

देवकीचे उदरा जाऊन । गर्भयासी अंबा जाऊन । कंसाहातीं गेली निसटून । गोकुळीं केलें गमन । अंबा शेषावर करी शयन । करी यश्वदेचें स्तनपान । करी कंसाचें छेदन ॥ ९ ॥

अविनाश पंढरी जाण । अंबेने पाहिलें दिंडिरवन । भक्त पुंडलिकाकारण । समचरण कटी ठेवून । दृष्टी नासाग्री ठेवून । न्याहाळी ती भक्तजन । बौद्धरूप अंबा जाण ॥ १० ॥

अंबा दशभुजा नटली । दैत्य दानव मारून आली । कलीरूप प्रगट झाली । जळमय करूं गेली । चंद्र सूर्याशीं आज्ञा दिली । वटपत्रीं शयनीं झाली । त्रिविधताप अंबा माउली । एका जनार्दनीं अंबा पाहिली ॥ ११ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel