जो जो जो जो रे रघुनामा । निज बाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामी दावीन तुम्ही ॥ध्रु०॥

जोगी दिसतसे विचित्र । त्याला तीन नेत्र । चर्मावेगळें नाहीं वस्त्र । म्हणवितो तुझा मित्र ॥ १ ॥

अंगीं लावुनियां विभुती । अर्धांगी पार्वती । वृषभारूढ तो पशुपती । त्रिशुळ डमरू हातीं ॥ २ ॥

आणिक नवल दयाळा । कंठ दिसे निळा । मस्तकीं गंगा वाहे झुळझूळा । नेत्री अग्निज्वाळा ॥ ३ ॥

भस्म चर्चुनी सर्वांगीं । वेष्टिला भुजंगीं । भूतें मेळवूनियां बहु जगीं । आलासे प्रसंगीं ॥ ४ ॥

जोगी आलासे अंगणीं । तुळशी वृंदावनीं । तुजला देखूनियां नयनीं । घाली लोटांगणीं ॥ ५ ॥

गोकुळीं जन्मलें निधान । जगदीश तो जाण । त्याचे चरणीं शरण । एका जनार्दन ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel