सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका ॥ १ ॥

भूत सभेची कारटीं । विषय गोवर्‍या चोरटी । उतरी कुकर्माची राहाटी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ २ ॥

जागोजागीं थांबा । अवघ्या मिळोनी मारा बोंबा । न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ३ ॥

गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी । तुमची पाजाळूं द्या होळी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ४ ॥

ओटींत घेउनी गुलाल । सख्या मेहुणीसंगें भुलाल । तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥५ ॥

एका जनार्दनीं पोस्त । गाणें गातां हालमस्त । नाहीं तर भडवे समस्त । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel