अनादि निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुरमर्दना लागुनी ।
भक्‍ता लागोनि पावसि निर्वाणी ॥ १ ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥ २ ॥
नवविध भक्‍तिच्या करीत नवरात्रा ।
करून पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥ ३ ॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वण्डी ।
अद्‌भुतरसाची भरीन दुरडी ॥ ४ ॥
आता साजणी झाले मी नि:संग ।
विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥ ५ ॥
ऎसा जोगवा मागुनि ठेविला ।
जाऊनि महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel