अनादसिद्ध नवलाई झालें । स्वानंदें कुरकुला घेऊन शकुन सांगूं आलें । प्रेमाचें कुंकू भाळीं लाविलें । सद्भक्ती बोराठी हातीं धरिले ॥ १ ॥

बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल ॥ध्रु०॥

चार युगांची काखे पोतडी । दशावतार खेळे परवडी । सोहं शब्द बोलती चोखडी । माझा शकुन ऐके आवडी ॥ २ ॥

मच्छाबाई बुरगुंडा होईल । कर्माईबया० ॥ वर्‍हाईबया० ॥ नरसाईबया० ॥ वामनाईबया० ॥ बोधाईबया० ॥ कलंकाईबया० ॥ शकुन सांगूं आले बुरगुंडा होईल ॥ ३ ॥

गंगाईबया० ॥ भागाईबया० ॥ यमुनाईबया० ॥ कृष्णाईबया० ॥ येमाईबया० ॥ तुकाईबया० ॥ लक्ष्मीआईबया० ॥ मच्छ कच्छ वराह नारसिंह रूपिनी । भक्तालागीं स्तंभ फोडुनी । दैत्यांचा अंत करुनी । प्रल्हाद कुरकुला रक्षिलासे ॥ ५ ॥

वामन परशराम रूपिनी । हनुमंत कुरकुला सवे घेउनी । शकुन सांगावया लंका भुवनीं । सीतेकारणें गेलीस ॥ ६ ॥

कौरव पांडव सर्व मिळाले । शकुन सांगावया तुज पाचारिलें । अर्जुन रथीं बैसविलें । शकून कुरकुला घेउनी ॥ ७ ॥

ज्ञानदेव निवृत्ति सोपान । नामदेवादि संतजन । हे कुरकुले सवें घेऊन । भीमातटी आलीं असे ॥ ८ ॥

पुंडलिक कुरकुला पाहून । समचरण विटेवर ठेवून । भक्तालागीं आनुदिन । करकटीं राहिलासे ॥ ९ ॥

ऐसा शकुन सांगितला । एका जनार्दनीं आनंद झाला । संतीं जयजयकार केला । शकुन कुरकुला ऐकोनी ॥ १० ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel