मी जो जांगतों गांव निजला सारा । कोणी हुशार नाहींत घरा । अवघे निजले भ्रमले संसारा । कांहीं तरी पुढिलाची सोय धरा ॥ १ ॥

मी जागून जागवितों लोकां । निजेनें व्यापिलें काळ ग्रासील देखा । यांसी कोठवर मारूं तरी हांका । कैसे भुलले म्हणती माझे माझे देखा ॥ २ ॥

रात्र झाली दोन प्रहर सारी । आतां येईल बा चोराची फेरी । जिवाजीपंत तुम्ही जतन करा निर्धारी । नाहीं तरी हिरोनी नेतील गांठोडीं सारी ॥ ३ ॥

तुमचें हित वो तुम्ही करा । जागाल तरी चुकेल फेरा । सुखें निजतांना चोर नागवतील घरा । एका जनार्दनीं सद्‌गुरु पाय धरा ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel