समस्त राजकर्ते धुरंधर । परगणे शरीराबाद सुभा । सुमातैन लोली प्रवाहे । ताकीदपत्र दिधलें कीं । कायापुरास जिवाजी नामें गृहस्थ । त्यास कौल देऊन देहगांवची वस्ती । आबाद रक्षावया निमित्त । पाठविले आहेत । तर कोण्याही गोष्टीचा ताप न लागेल । हरएकविषयीं साहित्य करावें । मनाजीराव सुभेदार । बुधाजीपंत फडणसी । चित्ताजीपंत चिटणीस । हे थोर मनुष्य असतात । अहंकाराजीपंत सबनीस । यांचे हवाली सर्व देहगांवाचा कारभार दिधला । त्याच्या पट्ट्याच्या घरचे मुत्सद्दी घरीं नसून नवीन मुत्सद्दी कामगार उभे केले तेही चांगले नव्हेत । विकल्पाजी महाजन । मोहाजी शेटे । कामाजी कोतवाल । क्रोधाजी नाईकवाडी । द्वेषाजी जमेदार । विकारपंत जकातदार । लोभाजी पोतनीस । मत्सरजी मेहेत्रे । कुतर्काजी गस्तदार । उन्मत्तजी पाटील कुबुद्धी कुळकर्णी । भ्रमाजी शिपाई । मदाजी देशपांडे । दंभाजी देशमुख । प्रपंचपंत मजूरदार । मूर्खाजी हुजुरे । स्वार्थाजी खिजमतदार । अविवेक पुराणीक । अज्ञान मशालजी । हे नवीन कामगार उभे केलें । तेही चांगले नव्हे । पहिल्या दासी । त्या नवविधा त्यागून । दुसर्‍या दासी उभ्या केल्या । आशा मनीषा तृष्णा कल्पना ममता माया प्रीति भुक्ति भ्रांति इच्छा वासना भ्रमणा कुबुद्धी निंदा अहंता चिंता निद्रा मोहनी । ह्या कामकर्त्या वादी । अहंकारपंत सबनीस यांनी उभ्या केल्या । त्यानें दारोबस्त परगणा बुडविला । आणि यमाजीपंत कमाविसदार । याचे घरीं एकान्त स्थळ स्थापन केलें । त्यावरून हें ताकिदपत्र सादर केलें कीं । नवीन मसुदे व कामगार आहेत ते त्यागावे । सरकर हुजूरचे मुत्सद्दी कामगार आहेत ते त्यागावे । सरकार हुजूरचे मुत्सद्दी कामगार आहेत । तर त्यांचे हातेंकाम घ्यावें । मुत्सद्दी तपशील । शुद्ध सत्त्व भाव विवेक वैराग्य बोध परमार्थ आनंद समाधान निर्वैर स्वानुभव धैर्य सत्त्व भजन पूजन हे कारभारी । कार्यकर्त्या सुशीला सुबुद्धी उन्मनी प्रतिष्ठा । नवविध मर्यादा । दया शांति क्षमा नम्रता समाधी । ह्या कार्यकर्त्या व ते मुत्सद्दी त्याचे हातीं काम घ्यावें । ह्या विषयीं सरकारांतून ताकीद झाली आहे । तर लिहिल्याप्रमाणें वहिवाट करावी । सबनीज मजकूर यांचे मुत्सद्दी कामगार दरम्यान ह्या कामांत आल्यास । पारिपत्य केलें जाईल । स्पष्ट समजावें । सरकार कामगार उभे करावे । त्यांचे हातें काम घ्यावे । एका जनार्दनीं शरण । बहुत काय लिहिणें ताकीदपत्र ॥ १ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel