महाराज ऐका माझी मुखजबानी । तुम्ही कांट्यांत पडला येउनी । बरें होता तये वनीं । हिशेब देणें लागेल की जी माय सखया ॥ १ ॥

जिवाजी शेट्याचा पळपळाट । बुधाजी कारकून मोठा भाट । शरीरा बाजीचा आटाआट । ऐसा आहे की जी मायसखया ॥ २ ॥

तरी कायापुर अंकितात । परगणें मजकुरास आडवितात । हिशेब देणें लागेल की जी मायसखया ॥ ३ ॥

तुम्ही म्हणाल ही महारीण । या प्रसंगीं कुळ अगत्यारीण । जिवाजी पाटलाची प्राण-मैत्रीण । लोभ मजवर फार आहे की जी मायसखया ॥ ४ ॥

आतां मी सांगतें तें करा । केली कमाई नेऊं नका घरा । एकांतीं नेऊन पाय धरा । विठुरायाचे की जी मायसखया ॥ ५ ॥

विठुरायाचा दूत । त्याचे फार अंकितात । आहे की जी मायसखया ॥ ६ ॥

तरी आतां व्हावें सावधान । विठ्ठलासी जावे शरण । गुरुकृपेचे ध्यान धरून । जिवलग पाहेन की जी मायसखया ॥ ७ ॥

राघवासी शरण जातां । यमाजीपंताचे न चले तत्त्वतां । एकाजनार्दनीं विनविता । मुख जबानी की जी मायसखया ॥ ८ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel