जोहार मायबाप जोहार । मी तो सूर्यवंशीं रामाजी बाजीचा महार । माझें नांव आत्मनाक महार ।

सारा कारभार धन्याचे रजेनें करितों की जी मायबाप ॥ १ ॥

खोपटामाजीं काय काय राहाय । हाडाचे खोड्यांत पडतील पाय । तोंड चुकवितां विज्जत जाय । मग वांचू करावें काय की० ॥ २ ॥

तल्लफ वाढवी फार । लक्ष चौर्‍यांयशी वरातदार । यमाजी हुजूरचा महालदार । त्याचा मार पुरे पुरे की जी मायबाप ॥ ३ ॥

जोहार पाटील बाजी । तुम्ही दरबारासी काय राजी । बाकी शेकली आजी । सांगूं आलें की जी मायबाप ॥ ४ ॥

मुदत जवळ आली । ताकीद पाहिजे केली । कित्येक मारीत झोडीत नेली । माझी साच बोली नोहे की जी मायबाप ॥ ५ ॥

टाकून देहेगांव । डोई बोडून पालटाल नांव । घर सोडून देवळीं राहाव । हातीं काठी असूं द्यावी की जी मायबाप ॥ ६ ॥

एका जनार्दनीं महार । संतसभेसी केला जोहार । तेणें जन्ममरणाची वेरझार । चुकेल की जी मायबाप ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel